विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

शितोळे घराण्याचे ऐतिहासिक गाव रोटी,श्री रोटमलनाथ आई जोगेश्वरी आणि श्री तुकाईदेवी मंदिर,रोटी.

 

शितोळे घराण्याचे ऐतिहासिक गाव रोटी,श्री रोटमलनाथ आई जोगेश्वरी आणि श्री तुकाईदेवी मंदिर,रोटी.
-------------------------------------------------------
पोस्तसांभार ::प्रसाद शिंदे 




































पाटसपासुन साधारणपणे 5-6 किमी अंतरावर पाटस-बारामती रोडलगत रोटी हे गाव आहे.रोटी हे शितोळे घराण्याच्या प्रसिद्ध ऐतिहासिक गावांपैकी एक असलेले गाव.शितोळे घराण्याचे कुलदैवत असलेले श्री रोटमलनाथ मंदिर येथे पार पडणाऱ्या शितोळे घराण्याच्या जावळविधीसाठी खुप प्रसिध्द आहे.महाराष्ट्र व तसेच देशभरात विविध ठिकाणी वास्तव्यास असलेली शितोळे मंडळी आपल्या पहिल्या मुलाचा जावळविधी करण्यासाठी रोटी येथे येतात.एखाद्या लग्नकार्याप्रमाणे वाजत-गाजत,भव्यदिव्य असा जावळचा कार्यक्रम केला जातो.श्री रोटमलनाथांच्या मंदिरातील कासवावर मामाच्या मांडीवर बसवून बाळाचे जावळ काढले जाते.त्याचबरोबर आईलासुद्धा आपले केस द्यावे लागतात.शितोळे घराण्याचा हा जावळविधीचा कार्यक्रम नातेवाईक,आप्तेष्ट व भावकीच्या उपस्थित पार पडतो.
श्री रोटमलनाथ व आई श्रीजोगेश्वरीचे मंदिर खुप जुने तसेच ऐतिहासिक आहे.सध्या मंदिराचे नुतनीकरण चालू आहे.मंदिराला भव्य असे प्रवेशद्वार आहे.प्रवेशद्वाराला लागुनच संपुर्ण मंदिराला तटबंदी आहे.प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दोन्ही बाजूस देवड्या पहायला मिळतात. या देवड्यांमधून प्रवेशद्वारच्या वरील बाजुस जाण्यासाठी छोट्या दगडी पायऱ्या आहेत.मंदिराचा परिसर प्रशस्त आहे.मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे,या दीपमाळेवर श्री हनुमंताचे शिल्प कोरले आहे.मंदिराचा सभामंडप संपूर्ण दगडी खांबावर बांधला गेला आहे.सभामंडपातुन आत गेल्यावर बाह्य गाभाऱ्यात देवी-देवतांच्या मुर्त्या जतन करून ठेवल्या आहेत.मुख्य गाभार्यातील श्री रोटमलनाथसाहेब व आई जोगेश्वरीच्या प्रसन्न मुद्रेतील रूपाचे दर्शन घेतल्यावर मनाला आत्मिक समाधान मिळाल्याची अनुभुती होते.
मंदिराच्या आतील परिसरात फिरताना आपल्या विविध मुर्त्या,शिल्प नजरेस पडतात त्याचबरोबर शिवपिंड,चौथरे,तुळशीवृंदावन पहायला मिळते.मंदिरच्या मागील बाजुस छोटे जुने शिवमंदिर आहे.या शिवमंदिरापुढे दगडी नंदी आहे.मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देशाच्या विविध भागात वास्तव्यास असणाऱ्या शितोळे मंडळींनी त्याचबरोबर शितोळे घराण्याच्या पाहुणे मंडळींनी मदत केल्याची नोंद ग्रामस्थांनी मंदिर परिसरातील भिंतीफलकावर करून ठेवली आहे.या नोंदींमध्ये मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर,इंदोर,गुजरात मधील बडोदा पासुन महाराष्ट्राभर राहणाऱ्या शितोळे मंडळींच्या गावांचा उल्लेख आपल्याला आढळतो.मंदिराच्या मागील बाजुस बाहेर पडण्यासाठी दगडी बांधकामातील द्वार आहे.
श्री रोटमलनाथ मंदिराच्या दुसऱ्या बाजुस गावातुन जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच आई श्री तुकाईदेवीचे भव्य प्रवेशद्वार व महाकाय तटबंदी असलेले मजबुत दगडी बांधकामातील मंदिर आपल्याला खुणावते.श्री तुकाईदेवी मंदिरासमोर उभे राहिल्यास आपल्याला मंदिराचा विस्तार किती मोठा असेल याची प्रचिती येते.साधारणपणे 10-15 दगडी पायऱ्या चढुन आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो.कमानबद्ध मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस कमलदले तसेच पायरीवर कीर्तीध्वजाचे मुख कोरण्यात आले आहे.प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा अजूनही मजबुत आहे.आतमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दीपमाळ आहे तसेच याठिकाणी एक नागशिल्प कोरलेली शिळाही पहायला मिळते.मंदिराचा सभामंडप प्रशस्त व संपूर्ण दगडी बांधकाम असुन हे संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.गर्भगृहात प्रवेश केल्यावर आपल्याला श्री तुकाईदेवीचे मुळस्वरूपातील म्हणजेच दगडी शिळा स्वरूपात आई प्रकट झाली त्या मूळ शिळेचे दर्शन होते.वरील बाजूस श्री तुकाईदेवीच्या प्रसन्न व मंगलमुर्तीची स्थापना केली आहे.
मंदिराच्या दोन्ही बाजूस भाविक-भक्तांच्या निवासासाठी तसेच इतर धार्मिक कार्यांसाठी भल्या मोठ्या ओवऱ्या बांधल्या आहेत.याच ओवऱ्यांच्या बाजुने असणाऱ्या छोटया दगडी जिन्यातुन आपल्याला मंदिराच्या तटबंदीच्या वरील बाजूस जाता येते.तटबंदीच्या वरील बाजूस गेल्यावर साधारणपणे 10 फुट रुंद तटबंदीचे अवाढव्य रूप लक्षात येते.वरील बाजुने मंदिर परिसराचे दृश्य विलोभनीय दिसते.पूर्वाभिमुख मंदिराच्या उत्तरदिशेला अजुन एक मोठे प्रवेशद्वार आहे.आतील बाजूस इतर छोटी-मोठी मंदिरे आणि वास्तू आपले लक्ष वेधुन घेतात. एवढ्या भव्य स्वरूपाच्या मंदिरावर मंदिर निर्मितीचा किंवा मंदिर जीर्णोद्धारचा कोणताच शिलालेख आपल्या निदर्शनास येत नसल्यामुळे हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले असावे याची माहिती आपल्याला मिळत नाही.परंतु या मंदिरावर मराठाकालखंडात निर्माण झालेल्या मंदिरांची छाप दिसते.शितोळे घराण्याच्या ऐतिहासिक रोटी गावात आपल्याला अनेक जुने वाडे तसेच त्यांचे अवशेष पहायला मिळतात.
©प्रसाद शिंदे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...