श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या अखेरच्या क्षणांची साक्षीदार असणारी पुण्यभूमी-शिंदेछत्री वानवडी,पुणे
------------------------------------------------------------
12 फेब्रुवारी 1794
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या पवित्र्य स्मृतीस विनम्र अभिवादन
--------------------------------------------------------------
"सोडूनि सारा राज्य पसारा निघून गेले शिवपुरा"
"पाटीलबाबा महापराक्रमी म्हणून कीर्ती दिगंतरा"
उत्तर हिंदुस्थानातील सत्ताधीशांवर आपला वचक बसविल्यानंतर महादजीबाबांना दक्षिणेत मराठा साम्राज्याच्या सीमेवर लुडबुड करणाऱ्या इंग्रजांना चांगलीच अद्दल घडवायची होती.दिल्लीवर भगवा फडकवून उत्तर हिंदुस्थानची सूत्रे पाटीलबाबांनी आपल्या हाती घेतल्यानंतर ते महाराष्ट्रात आले.पुण्यात वानवडी येथे महादजीबाबांनी आपल्या फौजेसह तळ ठोकला. वानवडी या ठिकाणी महादजीबाबांनी आपला बराचसा काळ घालविला.
पाटीलबाबांनी इंग्रजांना हिंदुस्थानातून कायमचे हाकलून लावण्याचा चंगच बांधला होता. परंतु दुर्दैव हे की त्यांना अपेक्षित अशी साथ कोणाकडून मिळाली नाही उलट धूर्त नाना फडणवीस व इतर महाभागांनी अखंड हिंदुस्थानातील पाटीलबाबांचा वाढता प्रभाव पाहून कटकारस्थाने करायला सुरवात केली.मराठ्यांचे भविष्यातील मुख्य शत्रू इतर सत्ताधीश नसून इंग्रज आहेत हे वेळोवेळी सांगणाऱ्या महादजीबाबांवर इंग्रजांची मदत घेऊन नाना फडनविसाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्राला आपल्या नेतृत्वाखाली एक दिशा देऊन मराठा साम्राज्य एक बलाढ्य व वैभवशाली करण्याचे स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत उतरलेल्या पाटीलबाबांना जर तलवारबहाद्दर सरदारांची,हुशार व मराठा साम्राज्याचे हित जोपासणाऱ्या मुसद्दी मंडळींची साथ मिळाली असती तर पुढील येणारा भविष्यकाळ संपूर्ण हिंदुस्थानासाठी वेगळा असता.
हे सर्व राजकारण चालु असताना 1993 च्या मे महिन्यापासून महादजीबाबांची तब्येत बिघडली.त्यांना सारखा ताप येत होता.अनेक वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले परंतु त्याचा त्यांच्या तब्येतीवर काहीही उपयोग झाला नाही.11 फेब्रुवारीला त्यांची तब्येत खूपच बिघडली व 12 फेब्रुवारी 1994 साली महादजीबाबांची प्राणज्योत मावळली.ज्या महायोध्याच्या पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा डामडौल उभा होता त्यांच्या निघून जाण्याने भक्कम आधारच हरवला. महादजीबाबांनी आपले पुतणे आनंदराव शिंदे यांच्या मुलाला म्हणजेच दौलतराव शिंदेंना दत्तक घेतले होते. वानवडी येथे पाटीलबाबांना मुखाग्नी देण्यात आला व दौलतराव शिंदेंनी महादजीबाबांचे अंतिमकार्य व्यवस्थितपणे पार पाडले.
पाटीलबाबांना ज्या ठिकाणी मुखाग्नी देण्यात आला त्याठिकाणी छोटेखाणी समाधीछत्री बांधली.श्रीमंत दौलतराव शिंदेंना पेशव्यांच्या कडून समाधीछत्रीच्या देखभालीसाठी व खर्चास मौजे उरली प्रांत पुणे हा गाव देण्यात आला.
दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी लिहलेल्या 'POONA IN BYGONE DAYS' पुस्तकामध्ये समाधीछत्री बाबत माहिती आहे,जेव्हा सर जेम्स मॅकिन्टोश या इंग्रजाने 1805 साली पाटीलबाबांच्या छत्रीला भेट दिली त्यावेळी त्याने आपल्या डायरी मध्ये छत्रीचे वर्णन केले आहे.ते पुढील प्रमाणे-"आम्ही स्मारकाला जेव्हा भेट दिली तेव्हा ती बनण्यास सुरुवात झाली होती (बांधकाम चालू असावे).स्मारक छोटेसे असून दगडी बांधकाम खूप कौतुकास्पद आहे. स्मारकाजवळच एक छोटीशी सुंदर झोपडी असून या ठिकाणी रक्षा ठेवण्यात आली आहे.या ठिकाणी काही काळासाठी सरदार मंडळी जमा होतात.या परिसरात छोटे शिवालय आहे.या ठिकाणी महादजी शिंदे यांचे चित्र ठेवण्यात आले असून त्यासमोर दिवे निरंतर जळत राहतील अशी व्यवस्था केली आहे.
पुढे ग्वाल्हेरनरेश माधवराव शिंदे(पहिले) यांनी समाधीछत्रीचा बराच विस्तार केला.स्मारकाच्याभोवती संरक्षण भिंत उभारण्यात आली.1915 साली महादेवाच्या मंदिरासमोर उभारण्यात आलेली नूतन इमारत राजस्थानी व ब्रिटिश स्थापत्यकलेची आठवण करून देते.या वास्तूच्या पायऱ्या,कोरीव नक्षीकाम,व आतील भागात उभे असणारे खांब आणि त्यावरील सुंदर कलाकारी थक्क करणारी आहे.आतील बाजूस असणारे काचेचे भले मोठे झुंबर छत्रीच्या वैभवात अजूनच भर घालते.छत्रीचा परिसर प्रशस्त असून विठ्ठल-रुख्मिनीचे छोटे मंदिर आतील बाजूस आहे.एकंदरीत छत्रीचे वातावरण प्रसन्न आहे.छत्रीच्या प्रवेशद्वारासमोरच हनुमानाचे मंदिर असून माधवराव शिंदेच्या(पहिले) यांच्या कार्यकाळातच हे बांधण्यात आले.समाधी छत्रीच्या उजव्या बाजूस महादजीबाबांचे गुरू मन्सूरशहाअली बाबा यांचा दर्गा आहे.
ग्वाल्हेरच्या पंचांगानुसार दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सिंधिया देवस्थान ट्रस्ट मार्फत महादजीबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.यादिवशी पालखीतून महादजीबाबांची मिरवणूक काढण्यात येते.वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणाऱ्या महादजीबाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ भजन,कीर्तन,प्रवचन तसेच इतर सामाजिक कार्यक्रम सिंधिया देवस्थान ट्रस्ट कडून राबविले जातात.
पानिपतच्या युद्धात मराठा साम्राज्याची मोठी हानी झाली.परंतु या अपयशाने खचून न जाता मराठा साम्राज्याला आपल्या अथक परिश्रमातून, बुद्धीचातुर्याने, प्रबळ महत्वकांक्षेने आणि मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा उभारी देण्याऱ्या या सामर्थ्यशाली,महासेनानीची वानवडी येथील समाधी छत्री केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी एक प्रेरणास्रोत व ऊर्जास्रोत आहे.
श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या पवित्र्य स्मृतीस विनम्र अभिवादन
फोटो साभार-शेखर शिंदे सरकार
प्रसाद शिंदे पानिपतकर
No comments:
Post a Comment