इ.स. १६५९ मध्ये औरंगजेबने शाहिस्तेखानास दक्खनचा सुभेदार म्हणून नेमले. शिवरायांना शह द्यावा म्हणून शाहिस्तेखानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला. इ.स. १६६०-१६६३ ह्या ३ वर्षात स्वराज्य अतिशय बिकट परिस्थितीत पोहोचले होते. दुष्काळ पडला होता. राजे स्वतः पन्हाळ गडच्या वेढ्यात अडकले होते. १६६३ साली शिवरायांनी शाहिस्तेखानला शासन केले. मुघलांमुळे झालेले स्वराज्याचे आर्थिक नुकसानाची भरपाई म्हणून महाराजांनी जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटले.
सुरत लुटून शिवाजी महाराजांनी आपले आलमगीर औरंगजेबशी (आलम म्हणजे दुनिया आणि गीर म्हणजे गिरफ्त करणारा; औरंगजेबाने स्वतःला ही उपाधी लावून घेतली होती) उघड युद्ध जाहीर केले. त्यामुळे शिवरायांचे नामोहरण करण्यासाठी औरंगजेबने दरबारातील सर्वात पाराक्रमी सरदार म्हणजे मिर्झाराजे जयसिंगची दक्खन मोहिमेवर निवड केली.
(मिर्झाराजे जयसिंग)
मिर्झाराजेंच्या शब्दाला आलमगीर औरंगजेब खूप मान देत असे. वारसा-हक्काच्या लढाईपासून त्याची औरंगजेबला मदत झाली होती. मिर्झाराजा जयसिंग अत्यंत करड्या शिस्तीचा होता. प्रत्यक्ष राजपुत्रांना त्याने शिक्षा दिल्याचा उल्लेख आहे. औरंगजेबाशी नात्याने निकट असणाऱ्या व जनानखान्यात वजन असणाऱ्या एक सरदाराला मिर्झाराजेंनी उन्हात उभे करून छड्या मारल्या; पण आलमगीरने ही वेळ आणल्याबद्दल त्या सरदाराची कानउघाडणी केली.
मिर्झाराजे जयसिंग दक्खन मोहिमेवर निघाले आणि ३ मार्च, १६६५ साली पूणे येथे तळ ठोकला. त्यांच्याबरोबर औरंगजेबने दिमतीला पठाण सरदार दिलेर खानास पाठवले. शिवरायांच्या स्वराज्यावर पहिला घाला घालण्यासाठी मिर्झाने पुणेपासून जवळ असलेल्या किल्ले पुरंदरची निवड केली. ३१मार्च १६६५ रोजी दिलेरखान पुरंदरच्या पायथ्याशी पोहोचला आणि युद्धाला सुरवात झाली. पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडेनी नेटाने किल्ला लढविला. १ महिन्याच्या अथक परिश्रमानंतर पुरंदरला लागून असलेला छोटेखानी किल्ला वज्रगड दिलेरखानास पाडण्यात यश मिळाले. मिर्झाराजे पुढे आपला प्रतिकार टिकणार नाही हे ताडून शिवरायांनी १८मे, १६६५ रोजी रघुनाथपंतांस बोलणी करण्यास पाठविले. मुरारबाजींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली, जीवाचे बलिदान दिले,पण त्यांना पुरंदर राखता आला नाही. जून मध्ये पुरंदर किल्ला पडला.
शिवरायांनी संपूर्ण क्षरणगती पत्कारली. योग्यवेळी घेतलेली माघार ही विजयाची सुरुवात असते. तहाच्या बोलणीला सुरुवात झाली. ह्या काळात शिवरायांनी मिर्झाराजेंना भेटून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मिर्झाराजे हे कसलेले सेनानी होते. मिर्झाराजे पुढे शिवाजी महाराजांचा निभाव लागला नाही.
११जुन १६६५ साली पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या मिर्झाराजेंच्या तळावर दोघांची भेट झाली. मिर्झाच्या बाजूने उग्रसेन कछवाह तर शिवरायांच्या बाजूने राजे स्वतः व ६ ब्राम्हण होते. मुघलांच्या तोफा पुरंदर किल्ल्यावर आग ओकत होत्या. युद्ध अजून शमले नव्हते. २ जून, १६६५ साली किल्लेदार मुरारबाजींना वीरमरण आले होते. राजा मिर्झाच्या गोटात अडकला आणि किल्लेदार धारातीर्थी पडले, आशा बिकट परिस्थितीत देखील मावळे मोठ्या धीराने किल्ला लढवत होते. शिवरायांनी युद्ध थांबविले आणि तहाचे कलम ठरवण्यात आले.
इतिहासात हा तह "पुरंदरचा तह" म्हणून प्रसिद्ध झाला. पुरंदरच्या ह्या तहात पुढील कलम समाविष्ट होती:
- शिवाजी महाराजांकडे १२ किल्ले आणि १ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश राहणार.
- मुघलांना गरज लागेल तेव्हा शिवरायांनी ससैन्य मदतीस येणे.
- संभाजीस मुघल दरबारातील पंच हजारी मनसबदारी बहाल करण्यात आली.
- मुघलांस स्वराज्यातील २३ किल्ले आणि ४लाख होन वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश देण्यात येईल. ते किल्ले पुढीलप्रमाणे: पुरंदर, वज्रगड उर्फ रुद्रमाळ, कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भांडरदुर्ग, पालसखोल, रुपगड, बख्तगड, मरकगड, माणिकगड, सरूपगड, सकरगड, अंकोला, सोनगड, मानगड.
ह्याच बरोबर शिवरायांना बादशहाच्या भेटीस आग्रा येथे पाठवण्यात आले. तह पूर्ण होईपर्यंत ९ वर्षांच्या संभाजीस १८जून पासून ओलीस ठेवण्यात आले. शिवरायांना भेटीसाठी आग्ऱ्यास बोलवावे, हा सल्ला मिर्झाराजेंचाच. तो बादशहाने मान्य केला. शिवरायांना तिथेच कैद करून ठेवावे आणि त्यांच्या जीवाला धोका पोहोचू नये, हा सल्ला देखील मिर्झाराजेंचाच.
हाच तो पुरंदरचा लांब-लचक तह आहे. जवळ पास २२फूट लांबीचा हा तह आहे आणि ह्यात तहातील सर्व कलम, सर्व किल्ल्यांबद्दल माहिती दिलेली आहे. सध्या हे दस्तऐवज राजस्थान मधील बिकानेर येथील archive मध्ये ठेवलेले आहे.
No comments:
Post a Comment