बाजीराव, नादिरशहा आणि दिल्लीची पातशाही:
भाग १
पोस्त सांभार ::- कौस्तुभ कस्तुरे
'हिंदुपदपातशाहीची सिद्धता'
इराणचा
शहा नादिरशाह अथवा ज्याला मराठी कागदपत्रे तोहमास्तकुलीखान म्हणतात तो
दिल्लीवर चालून आला आणि त्याने दिल्लीच्या पातशाहाचा कर्नुळजवळ दि. १३
फेब्रुवारी १७३९ रोजी प्रचंड पराभव केला. बादशहाचा सरदार आणि बाजीरावांचा
कायमच पाठीराखा असलेला खानदौरान, त्याचा भाऊ मुझफ्फरखं आणि त्याची मुले या
युद्धात मारली गेली. जखमी झालेला सादतखान हा दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.
बाजीराव यावेळेस निजामाशी झालेल्या भोपाळच्या युद्धानंतर जिंकलेल्या
प्रदेशाची व्यवस्था लावण्यात गर्क होते. एकीकडे प्रचंड मोठी मराठी फौज वसईत
गुंतली होती. काही फौज बाजीरावांसोबत होती तर काही फौज गोव्याकडे
व्यंकटराव घोरपड्यांच्या दिमतीला होती. नादीरशहाने आक्रमण केल्यावर त्याला
तोंड देण्याची सिद्धता बाजीरावांनी केली होती. यात बाजीरावांचे दोन हेतू
होते.
१)
मुख्य हेतू म्हणजे दिल्लीच्या बादशहाला आपल्या, म्हणजेच मराठ्यांच्या
उपकाराच्या ओझ्याखाली आणायचं. स्वतः थेट राज्य घ्यायचं नाही, कारण
उत्तरेतील संस्थानिक आपल्याविरुद्ध बंड करून उठले तर ते आवरण्याची
परिस्थिती नव्हती.
२)
सहज शक्य झालं तर दिल्लीच्या गादीवर उदयपूरच्या महाराण्याला बसवायचं,
जेणेकरून दिल्लीत हिंदू सत्ता प्रस्थापित होईल आणि बाकीचे राजपूत जे
मराठ्यांना मानत नव्हते त्यांच्याकडे उदेपूरच्या राण्याला मुजरा
करण्यावाचून पर्याय नसेल.
यातील
एकही हेतू बाजीरावांना स्वतःच्या हालचालींनी सिद्धीस नेता आला नाही कारण
बाजीरावांनी काही हालचाल करण्यापूर्वीच नादिरशाह मायदेशी निघून गेला. काही
बातमीपत्रे स्पष्ट सांगतात की बाजीरावांनी युद्धाची प्रचंड तयारी सुरु केली
आहे हे पाहून नादिरशहा अंतस्थ रीतीने घाबरूनच इराणला परत गेला, पण जाताना
त्याने मोठेपणाचा आव आणून बादशहाला कायम केलं आणि शाहू महाराज-बाजीरावांना
कृपेची फर्माने पाठवली.
वर दिलेल्या दोन हेतूंपैकी आधी दुसऱ्या हेतूची पूर्तता करण्यासाठी बाजीरावांची सिद्धता काय होती हे या पोस्टमध्ये सांगतो.
बाजीराव
हे बऱ्हाणपूरला थांबून वसईतून सैन्य केव्हा मोकळं होत आहे याची वाट पाहत
होते. नादीरशहाला या साऱ्या बातम्या समजत होत्या. जयपूरहून धोंडो गोविंद
पुरंदरे वकिलांनी बाजीरावांना काही गोष्टी कळवल्या होत्या त्यात ते
म्हणतात, "आता राहिले राजे (राजपूत), त्यात मातबर सवाईजी. यांचा विचार
स्वामींशी विदितच आहे. यांनी (नादीरशहाला) मुबारकीची अर्जदास्त लिहिली.
आपले सलुखाचे विचारात आहेत. इकडे स्वामींसही बोलावताती. जैसे बनेल तैसा
प्रसंग संपादून घेतील. स्वामींचा प्रताप सर्वांस विदित आहे. तहमासकुलीखानास
आपले (बाजीरावांच्या) प्रतापच्या गोष्टी विदित जाल्या असतील. रोकडी सलाबत
तरी त्याची उमदी पडली. स्वामींशी मालवियात यावे हे मसलतीनिमित्त मोहरा
प्रथम माळवा आहे. यावे तेव्हा बहुत खबरदारीने मातबर फौजेने यावे.
तहमासकुलीखान काही देव नाही, जे पृथ्वीस कापून काढील. तोही शहाणा आहे.
जबर्दस्तांसी सलूख करितील. परंतु स्वामीने पैरवी करून यावे" (इतिहाससंग्रह
ऐतिहासिक चर्चा लेखांक ५).
धोंडो
गोविंदांनीच पुढच्या पत्रात दिल्लीत काय झालं ते बाजीरावांना लिहून कळवलं
आहे. या वेळेस दिल्लीत महादेवभट हिंगणे आणि जयपुरास धोंडो गोविंद पुरंदरे
हे दोघे वकील ही सारी राजकारणं तडीस नेत होते. धोंडोपंत लिहितात, "सादतखान
तर खानेजंगीत जखमी होऊन दुसरे दिवशी मृत्यू पावले. निजाम वाचले, पण
मृत्यूहून विशेष झाले. खेचरावर बसून दरबारात जावे. दक्षिणेत अंमल उठला,
स्वामींसच (बाजीरावांना भोएलच्या युद्धात) यश आले. ऐसे चहूकडून निजाम फजित
पावला. आता विपत्तीने मरणही पावेल. ऐवजाची पातशाही दिसत नाही".
यापुढे
असलेला मजकूर विशेष आहे. गुमानसिंग नावाच्या एका माणसाचा इथे उल्लेख केला
आहे, हा बहुदा उदयपूरच्या जगतसिंह महाराण्याचा वकील असावा. या गुमानसिंगाने
बाजीरावांच्या वकीलांशी बोलताबोलता म्हटलं की, "रायांचे मनी राणाजीस
दिल्लीत तक्ती बसवावे. सबब जे वरकड राजे थोर असल्यासही राऊंस सलाम करणार
नाहीत, आणि राणाजी व राजश्री स्वामी एकच आहेत. बद्दल राणाजींस बसवू. ऐसे
गुमानसिंगांनी जबानी सांगितले". यानंतर खुद्द जगतसिंह महाराणा काय म्हणाले
ते सांगताना वकील लिहितात, "धनसंपनदा जे असे ते रायाची; आणि सवाई व महाराउ
तरी राणाजींचे खरेखुरे लगामी लागले, व (जोधपूरच्या) अभयसिंहाकडेही काळ भला
माणूस पाठवला. धुंधेले (बुंदेले) वगैरे तिकडील सरदार स्वामींच्या आज्ञेने
येतील, परंतु मुख्य गोष्ट स्वामींच्या आगमनावरी आहे. नर्मदेवरी थोडक्याच
दिवसांत वीसपंचवीस हजारांनिशी स्वामी आले, तरी आवई लक्षांची पडेल. या
प्रांताची जागोजागच्या ठाणी बोलावलियाने उदंड जमाव होईल. सेवक (वकील)
नित्यानित्य राणाजींस सांगतो की 'राजश्री राऊ कूच दरकूच येतात' परंतु ऐसे
सांगता सांगता दोन मास झाले, व हिंदू राजे सर्वत्र सवाई आदिकरून स्वामींचे
स्वारीची प्रतीक्षा करितात. स्वामींचे पुष्टीबल होताच जाट वगैरे फौज
दिल्लीवारी पाठवून सवाईजी आपणही जाणार, ऐशी तजवीज आहे. परंतु स्वामींची
स्वारी रेवातीरीं आल्यावाचून काही होत नाही. स्वामींशी तो दक्षिणेचा
बंदोबस्त पुरता झाल्यावाचून येता न ये, ऐसे संकट आहे" (इतिहाससंग्रह
ऐतिहासिक चर्चा लेखांक ७).
वरच्या
या दिल्लीच्या गादीवर कोणी हिंदू, त्यातही महाराणा जगतसिंहांना बसवण्याचा
बाजीरावांचा हेतू होता याला आणखी एका पत्राद्वारे बळकटी मिळते. हे पत्रं
खुद्द बाजीरावांनी जगतसिंहांचा दूधभाऊ नगराज याला लिहिलेलं आहे. हे पत्रं
संस्कृत असून उदयपूरच्या व्यास घराण्याच्या संग्रहातलं असून ज्येष्ठ इतिहास
संशोधक ग. ह. खरे यांनी हे प्रकाशित केलं. या पत्रात बाजीराव नगराजाला
म्हणतात, "इंद्रप्रस्थ येथे घडले ते आपणास समजले असेल. आपल्या प्राधान्याचा
समय प्राप्त झाला आहे. त्यास येथून पतंगावलेल्या पत्राच्या धोरणाने
दिवाणजी स्वधर्मसंरक्षणानुकूल होतील असे करावे. नाहीतर शत्रूचा प्रभाव
पाहून स्वस्थ बसल्यास ऐहिक व पारलौकीकी, दोन्ही प्रकारच्या कल्याणाचा
विघातच होईल. शिवाय, तुम्ही सवाई जयसिंहप्रभुतींचे ऐक्य संपादून सर्व
हिंदूंचा सेनासमुदाय एकत्र करावा म्हणजे आपली सव्वा लक्ष सेना होईल. आमचाही
सर्व सेनासमुदाय एकत्र आल्यावर दोन लक्ष सेना होईल. मग शत्रूपराजयाचा यत्न
करावा. नाहीतर हिंदूंचे शौर्य व स्वधर्म बुडाला ऐसे होईल". यात थेट
जगतसिंहांना दिल्लीच्या तख्तावर बसवावं असं म्हटलं नसलं तरी हिंदूंचा
सेनासमुदाय, स्वधर्म-शौर्य वगैरे पाहता दिल्लीचं तख्त उलथवून टाकण्याचीच
भाषा याही पत्रात दिसते.
पण हे असं का झालं नाही? पाहूया पुढच्या भागात.
माहितीचे मुख्य स्रोत:
१) इतिहाससंग्रह पुस्तक पहिले, अंक नववा: एप्रिल १९०९
२) ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंड ५, लेखांक ६
- कौस्तुभ कस्तुरे
No comments:
Post a Comment