शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा घाट घातला तेव्हा सुरवातीला पायदळ स्थापिले व त्या सहाय्याने कार्य सुरु केले. तद्नंतर कालानुरूप घोडदळ असणे अपरिहार्य होते. पायदळाने मुलखाचा बंदोबस्त चोखट होतो तर घोडदळाने राज्याची वृद्धी होण्यास महत्वाची भुमिका बजावते. घोडदळाच्या सहाय्याने स्वराज्य विस्ताराचे काम होते. या कारणे घोडदळ हे आवश्यक होते. घोडदळात दोन प्रकार असतात एक म्हणजे बारगिर व दुसरा शिलेदार. बारगिर हा धन्याचाच घोडा व धन्याचेच शस्त्र घेऊन हुजूर चाकरी करी. तर शिलेदार हा स्वताचाच घोडा व स्वताचेच शस्त्र घेऊन हुजूर चाकरी करी. त्या बदल्यात घोड्याच्या खर्चा दाखल सरकारातुन त्याला काहि रक्कम भेटत असे. शिलेदार हा कमि श्रमदाखल मिळत असला तरी शिवाजी महाराजांचे कटाक्ष हा बारगिरावरच जास्त होता. याचे कारण हि तसेच होते शिलेदारास इतर राज्याच्या अधिकाऱ्याने जास्त रक्कम दिल्यास तो त्याच्याकडे हुजूर चाकरीस जात असे. मोहिमेवर गेल्यावर शिलेदार सोडून जाण्याची भिती पण असे. म्हणून महाराजांचा कटाक्ष जास्तीचा हा बारगिराकडे होता. बारगिर जास्त असल्या कारणे शिलेदारास पागेच्या शिस्तीत रहावे लागे. घोडदळाच्या सैनिकास राऊत म्हणत. तेने प्रमाणे पागेच्या अधिकाऱ्यांच्या श्रेण्या म्हणजे दर घोड्यास एक बारगीर अश्या २५ बारगीरांवर एक मराठा हवालदार असे व ५ मराठा हवालदारावर एक जुमलेदार असे, अश्या १० जुमलेदारांवर एक हजारी असे, अश्या पाच हजान्यावर एक पंचहजारी व पाच पंचहजाऱ्यांवर एक सरनोबत असे, सरनोबत हाच पुढे प्रधानमंडळात 'सेनापती' झाला. जुमलेदारापासून सरनोबतापर्यंतच्या अधिकाऱ्याच्या दिमतीस मुजुमदार दिलेला असे. हजाऱ्याला व त्यावरील अधिकाऱ्यांना मुजुमदाराव्यतिरिक्त मराठा 'कारभारी' व कायस्थ प्रभू जमेनीस दिलेले असत. जुमलेदार व त्यावरील अधिकाऱ्यांना पालखीचा मान होता.
सामान्य बारगीरास सुमारे ८ रुपये (२ होन) मासिक वेतन मिळे. जुमलेदाराला वार्षिक ५०० होन हजाऱ्यास १००० होन, पंचहजाऱ्यास २००० होन सालीना मिळत. सरनौबतास नेमका किती पगार मिळे ते कुठे नमूद केलेले नसले तरी तो ५००० होनांच्या आसपास मिळत असावा. जुमलेदाराच्या मुजुमदारास १०० ते १२५ होन मिळे, हजाऱ्याच्या मुजुमदारास व कारभाऱ्यास व जमेनीसास प्रत्येकी ५०० होन सालीना मिळत असे. हे अधिकारी आपल्या वरील अधिकाऱ्याला हिशोब ठेवण्याच्या कामात मदत करीत. या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त हजारी, पंचहजारी व सरनौबत यांच्या दिमतीस वाकनिसांचे कारकून, हरकारे व जासूद असत. जासुदांचा नाईक होते बहिर्जी. वाकनिसाचे कारकून युद्धवार्ता लिहून ठेवीत, तर हरकारे व जासूद परमुलुखाची इत्यंभूत माहिती मिळवणे, सैन्याला मार्ग दाखवणे, शत्रूगोटात हेरगिरी करुन खात्रीशीर वार्ता हूजूरास कळवणे ही कामे करीत. पागेच्या व्यवस्थेत दर २५ घोड्यामागे एक पखालजी व एक नालबंद असे. पखालजीकडे चामडी पखालीतून घोड्यांसाठी पाणी वाहून आणण्याचे तर नालबंदाकडे घोड्याची खुरे जायबंदी होऊ नयेत म्हणून लोखंडी नाल ठोकण्याचे काम असे. याशिवाय घोड्याचा दाणागोटा, खरारा, गवतपाणी यासाठीही नोकरवर्ग असे. घोड्यांच्या देखभालीसाठी व औषधोपचारासाठी 'घोडवैद्य' असत. शिलेदारांसाठीचीही अशीच व्यवस्था होती. यात घोडेस्वार वा राऊता यांची शस्त्रे म्हणजे तरवार, भाला (अश्वकुंती), तीरकमठा, तोड्याची बंदूक, जंबिया, पट्टा, गुरगुझ (गुर्ज चिलखत भेदण्यासाठीचेअसरदार वस्त्र, काटेरी गदेसारखे शस्त्र), ही सामान्यपणे असत. हिंदवी स्वराज्याच्या घोडदळाचे पहिले सरनौबत हे माणकोजी दहातोंडे हे होते. मानकोजी काकांनंतर इ.स. १६५७ ते १६६६ पर्यंत नेताजी पालकर सरनोबत होते, इ.स. १६६६ ते १६७४ पर्यंत प्रतापराव गुजर होते व त्यानंतर हंबीरराव मोहिते हे सरनौबत होते. (प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीत मारले गेल्यावर काही काळ आनंदराव ही जबाबदारी सांभाळताना दिसतात.) हंबीरराव मोहिते हे राज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्याचे पहिले 'सेनापती' झाले. तर प्रारंभी महाराजांजवळ १००० ते १२०० बारगीर व. २००० शिलेदार होते. प्रतापगडच्या युद्धात (इ.स. १६५९ साली अफजलखान मारीला) या लढाईत महाराजांना शत्रूची ४००० उत्तम घोडी सापडली त्यांची पागा करून महाराजांनी घोडदळ वाढवायला सुरुवात केली. अखेरीस घोड संख्या ४५००० बारगीर व ६०,००० शिलेदार मिळून एकूण १,०५,००० एवढी झाली. शिवाजी महाराजांच्या लष्कर भरतीची व मोगल आदिलशही लष्कर भरती वेगळी असे. मोगल व आदिवशाही लष्कर भरती वतनदार, जहागीरदार, इनामदार, सरदार यांच्यावर सोपवली जात. त्या साठी त्याना काहि गावे इनाम दिली जात व गावच्या महसुलातील काही महसुल तोडुन दिला जाई. लष्कर भरती साठी कोणता असा नियम नसे. ते कोणासही वेठीस धरुन सैन्यात भरती करत. २००० हजार लष्कर भरती केले तर सरकारात २५०० दाखवले जाई. वरचे ५०० लष्कराचे पैसे ते स्वताच खाई. असा इस्लामी राजवटीत भ्रष्टाचार होत असे. शिवाजी महाराजांनी सुरतेच्या पहिल्या स्वारी वेळेस सुरतेचा सुभेदार इनायत खान याने औरंगजेबाकडुन लष्कराचा पगार हा जास्तीचा घेत व होते मात्र अगदि थोडके यावरुन हा भ्रष्टाचार कसा होत असे हे उद्धृत होतेच. पण शिवाजी महाराजांची लष्कर भरती ही या पेक्षा पुर्ण वेगळी होती. स्वराज्यात लष्कर भरती ही सरकारातुन होत असे व त्याना तनखा ही सरकारातुन मिळे. ती तनखा दर प्रतिपदेला मिळालाच पाहिजे असा दंडक होता. लष्कर मोहिमेवर निघाले की पहिला पाडाव जेथे पडेल तेथे लष्करी अधिकारी सैन्याची व त्यांच्या सामानाची कसुन तपासनी करुन त्याची नोंद ठेवत असत. मोहिमेवरुन लष्कर परतल्यावर स्वराज्याच्या सीमेवर पुन्हा लष्कराचा कुल झाडा घेतला जाई. कोणी लुटीचा माल चुकून ठेवला तर व त्याकडे आढळला तर त्यास कडक शास्त केले जाई. मोहिमेवर कोणासही बायको, बटक, कलावंतीण कोणीही सोबत असता कामा नये असा सक्त दंडक होता. रयतेच्या कोणत्याच गोष्टीस हात लावु नये मग ति रयत शत्रु च्या मुलाखतील असली तरी. सामान्य जनता, शेतकरी, गोर गरीब, गाई, यांस त्रास देऊ नये वा कैद करु नये. लढाईत जखमी झालेल्या सैनिकास जखम पाहुन २५ होन ५० होन १०० होन वा २०० होन असी रक्कम दिली जाई. जो सैनिक लढाईत कामी आला म्हणजे मृत्यु पावला तर त्याच्या बायकोस वा आईस त्याची आद्धी तनखा आयुष्यभर दिली जात. लष्कराची छावणी हि पावसाळ्यात पडे. ति छावनी साधारण तिन महिन्याची असे. तेथे घोड्यांसाठी चारा पाणि दाणा गोटा रतीब हा चार महिन्याचा जमा केला जाई. छावणी बाबत कडक शिस्त कसी होती हे आमत्यांच्या आज्ञापत्रात स्पष्ट दिसते. अगदि आज्ञापत्र महाराजांनी बारिक सारिक गोष्टीची पण काळजी घेतलेली त्यात दिसते. पावसाळा संपला कि लष्कर पुन्हा मोहिमेवर निघे या मोहिमा साधारण ८ ते ९ महिने असत. पावसाळा आला कि पन्हा छावणी पडे. छावणी बाबत असा एक दंडक होता कि मागील वर्षी ज्या भागात छावणी पडेल त्या भागात चालू वर्षांत छावणी टाकण्यास मनाई असे.
संदर्भ:-
¤ सभासद बखर ¤ आज्ञापत्र
¤ मराठ्यांचा इतिहास खंड पहिला
¤ शककर्ते शिवराय खंड १
लेखक- शिवकथाकार विजय देशमुख
संकलन
दुर्खवेडा कृष्णा घाडगे
No comments:
Post a Comment