महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे -'नागपूरकर भोसले'
भाग १
पोस्तसांभार :: सतीश राजगुरे
'नागपूरकर भोसले' हे महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे होते. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्याची स्थापना' केली तर नागपूरकर भोसल्यांनी 'हिंदवी स्वराज्याचा विस्तार' केला. एके काळी थेट ओरिसापर्यंत नागपूर राज्याची सीमा पसरली होती.
तसं बघितलं तर भोसल्यांच्या काळात असलेला 'नागपूर प्रांत' कोणत्याही दृष्टीने एकजिनसी नव्हता. भौगोलिक रचना, भाषा आणि पूर्वेतिहास सर्व भिन्न होते. नागपूरकर भोसले व पुढे इंग्रजांच्या काळात वेगवेगळे प्रांत आणि मुलुख त्यांच्या वर्चस्वाखाली येत गेले व ते नागपूर प्रांताचा भाग बनले!
पहिला रघुजी
बंगाल आक्रमणानंतर पहिला रघुजी याने 'देवगड' हे गोंड संस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेऊन खालसा केले. त्यानंतर चंद्रपूर, नरनाळा, गाविलगड, माणिकदुर्गही ताब्यात घेतले. तसेच नागपूर-बंगालला जोडणारा छत्तीसगड हा भागही आपल्या नियंत्रणाखाली आणला. इ.स. १७४५ च्या दरम्यान रायपूर, संबलपूर, रतनपूर या छोट्या राज्यांसह छत्तीसगडही घेतले. उत्तर हिंदुस्थानात स्वारी करून 'गढा-मंडला' या प्रांतावर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
याशिवाय बिहार व बंगालची चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सुमारे ४०% उत्पन्नाचा भाग रघुजीस मिळत असे. रघुजी भोसल्यांनी आपले राज्य शून्यातून निर्माण केले होते. केवळ एका माणसाने इतका मोठा राज्यविस्तार क्वचित केलेला आढळतो. रघुजी भोसले यांना त्याकाळच्या मराठे सरदारात एका दृष्टीने सर्वात श्रेष्ठ सरदार म्हणावे लागेल.
रघुजींनी बांधलेल्या 'नागार्धन' किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार- नागपूर शहर
(चित्रस्रोत: विकिपीडिया)
जॉर्ज फॉस्टर या इंग्रज वकिलाने भोसल्यांच्या राज्याचे सविस्तर वर्णन केले आहे. दुर्दैवाने मराठ्यांनी अशी माहिती कुठे लिहून ठेवल्याचे दिसत नाही. फॉस्टर म्हणतो-
"भोसल्यांचे मुलुखाची उत्तरेकडील सरहद लखनादौनच्या उत्तरेस चार कोसांवर शेरनदी ही आहे. पलिकडेस काल्पीचे बाळाजीचा म्हणजे गोविंदपंत बुंदेल्याचा मुलगा बाबाजी गोविंद खेर याचा मुलूख आहे. पूर्वेस रतनपूरच्या प्रदेशापर्यंत तसेच संबलपूर व इतर संस्थाने धरून कटकपर्यंत त्यांचा अंमल आहे. दक्षिणेस गोदावरीच्या उत्तरेस दहा कोसापर्यंत भोसल्यांचा अंमल चालतो. पश्चिमेस सर्व वऱ्हाड प्रांत भोसल्यांच्या अंमलाखाली आहे. एकंदरीत दक्षिणेस गोदावरीपासून उत्तरेस नर्मदेपर्यंत त्यांचा अंमल आहे."
इ.स. १८०० हा नागपूरकर भोसल्यांच्या वैभवाचा अत्युच्च काळ समजला जातो. याकाळात नागपूरच्या भोसल्यांची सत्ता उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस गोदावरी पर्यंत आणि पश्चिमेस वऱ्हाडपासून ते पूर्व दिशेला पूर्व समुद्र किनाऱ्यापर्यंत कायम झाली
No comments:
Post a Comment