विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 June 2022

शिवराज्याभिषेकाने काय दिलं?

 


शिवराज्याभिषेकाने काय दिलं?
पोस्तसांभार ::केतन पुरी 
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जहागीरदार पुत्र ते अभिषिक्त सम्राट हा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि सिवबाराजे 'राजा शिवछत्रपती' म्हणून ओळखले जाऊ लागले. 'नवनिर्मिती' या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून 'शिवराय' ओळखले जाऊ लागले.
शिवरायांनी या अतिमंगल प्रसंगी 'शिवशक' सुरू केला. आपण सारे काळाचे अपत्य आहोत. पण तो काळ स्वतःच्या नावे ओळखला जावा, अशी तजवीज शिवरायांनी केली. स्वतःच्या नावाने कालगणना सुरू केली. हा भीष्मपराक्रम होता.
आपले राज्य स्वतंत्र आहे. या स्वतंत्र राज्याचे चलन सुद्धा स्वतंत्र असेल, ही भावना ठेवून त्यांनी स्वतःच्या नावाची नाणी पाडली. 'शिवराई' आणि 'शिवराई होन' बाजारात आणले. अर्थव्यवस्थेला आपल्या नावाभोवती फिरवले.
शिवराय हे स्वयंसिद्ध पुरुष होते. त्यांचा राज्याभिषेक हा केवळ व्यक्तिगत सोहळा नव्हता तर महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या प्रत्येक पिढीला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी उचललेलं मोठं पाऊल होतं. राज्य राखावे, रयतेचे पोटच्या पोराप्रमाणे रक्षण करावे आणि देशकार्य हेच आयुष्याचे उच्च ध्येय असावे ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिली. म्हणूनच, त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा तब्बल 27 वर्षे मुघलांच्या विरोधात अतिशय खडतर परिस्थितीत मराठे लढले. शाहू छत्रपतींनी 'थोरल्या महाराजसाहेबांचे' स्वप्न म्हणून रुमशामपावेतो राज्याची सीमा नेण्याचा मानस मनात बाळगला.
अभिषिक्त सम्राट म्हणून स्वतःचे अस्तित्व निर्माण केल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले आणि त्यांची कितीतरी चित्रे दक्खनेच्या चित्रकारांनी चितारली. मराठयांच्या मूळ पुरुषाचे अस्सल रूप याच राज्याभिषेकाने बहाल केलेल्या सम्राटपदामुळे आपल्यासमोर आले.
मराठ्यांच्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले..
त्या स्वतंत्र राज्याला हक्काचे तख्त लाभले..
त्या तख्तावर बसणारा महापराक्रमी छत्रपती पिढ्यानपिढ्या रयतेचा उद्धार करत राहिला..
इंग्रजांच्या गुलामगिरीतून मायभूमीच्या विरोधात लढण्यासाठी भगतसिंहादी प्रभूतींना प्रेरणा दिली..
साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा 'देशकर्तव्य हेच आद्यकर्तव्य' ही पवित्र भावना तरुण पिढीला दिली..
एवढा मोठा बदल एका राज्याभिषेकासारख्या घटनेमुळे झाला.
मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च अभिमानाचा, शिवरायांना 'राष्ट्रपुरुष' म्हणून मान्यता देणारा सोहळा..
शिवराज्याभिषेक सोहळा..
चित्र साभार : कपिल भगत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...