विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 July 2022

संभाजी शहाजी भोसले

 

शिवछत्रपतींनी आपल्या पहिल्या-वहिल्या मुलाचे नाव थोरल्या भावावरून ठेवले ह्यातच त्यांचे बंधुप्रेम दिसून येते. थोरले संभाजीराजे हे प्रौढप्रतापपुरंदर महाराजा शहाजीराजे आणि जिजाऊसाहेबांचे ज्येष्ठ पुत्र होते. कवी परमानंद नेवासकरांनी आपल्या 'शिवभारत'मध्ये 'शहाजींना जिजाबाईपासून सहा शुभलक्षणी पुत्र प्राप्त झाले, पैकी थोरले शंभू आणि शिवाजी हे दोघेच वंशवर्धक झाले' असा उल्लेख (संस्कृतमध्ये) केला आहे.

बखरकारांनी आणि इतिहासकारांनी ह्या राजपुत्राची फार अशी दखल घेतल्याचे दिसत नाही. त्याचे एक कारण म्हणजे अल्पवयात आलेला त्यांचा मृत्यू. कनकगिरीमधील लढाईत अफझल खानाने संभाजीराजेना मारविले. सभासद बखरीमध्ये संभाजीराजेंच्या जन्माचा देखील उल्लेख आढळत नाही, फक्त अफझल खान प्रकरणात सभासदांनी पुसटसा उल्लेख केला आहे. चित्रगुप्त, ९१ कलमी बखर, श्री शिवदिग्विजय, शेडगावकर भोसले बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर मध्ये संभाजीराजेंचे थोडेफार उल्लेख आलेले आहेत. फक्त बृहदीश्वरमध्ये सापडलेल्या शिलालेखात (हा शिलालेख त्यांच्या सुनबाई मकाऊसाहेबांनी बनवून घेतला) त्यांच्याबद्दल विस्ताराने माहिती आढळते.

ह्या पराक्रमी राजपुत्रापासून आजदेखील अवघा महाराष्ट्र अनभिज्ञ आहे. त्यांचा बहुतेक काळ हा कर्नाटकमध्ये गेल्याने महाराष्ट्राशी त्यांचा फारसा संबंध आला नाही. शहाजी महाराजांच्या दरबारात असलेल्या कवी 'जयराम पिंड्ये ' लिखित 'राधामाधवविलासचंपू' मध्ये थोरल्या संभाजीराजेंचा उल्लेख 'युवराज संभाजी' असा केलेला आहे. कनकगिरी येथे संभाजीराजे मारले गेले नसते तर आज राज्याभिषेकासकट संपूर्ण मराठा इतिहास वेगळा असू शकला असता..!

९१ कलमी बखरीत संभाजीराजेंच्या पुत्र उमाजीचा उल्लेख आहे. इतर बखरकारांनी त्यांच्या पुत्राचा उल्लेख केलेला नाही. अफझल खान वधाच्या पोवाड्यात उमाजीराजेंचा उल्लेख 'जतन भाईनु करा संभाजी राजाला सराईत उमाजी राज्य होईल तुम्हाला' असा केला आहे. एवढेच नव्हे तर, 'राज सांगे पुतण्या उमाजीला' असाही उल्लेख आढळतो. बृहदीश्वर शिलालेखात उमाजीराजेंचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ह्याशिवाय उमाजीपुत्र परसोजीराजेंचा जन्म झाल्याची सुद्धा नोंद त्यात आढळते. शिलालेखातील नोंदीनुसार संभाजीराजेंना जयंतीबाईखेरीज गौरीबाई आणि पार्वतीबाई अशा आणखी दोन स्त्रिया होत्या. संभाजीराजेंना उमाजीशिवाय सुरतसिंग आणि मतोजी असे अजून दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात.

मावळखोऱ्यातील जेधे-देशमुखांच्या 'जेधे शकावली'मध्ये उमाजीराजेंबद्दल माहिती मिळते ती अशी की, उमाजी हे संभाजींचे दत्तक पुत्र नसून त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ साली झाला. उमाजीस विजपुरकरांतर्फे जहागिरी मिळाली होती. उमाजींच्या पराक्रमाबद्दलचे उल्लेख १६८३च्या मजहरामध्ये आलेला आहे. उमाजीराजेंचा पुत्र बहादूरजीचा २५ डिसेंबर १६८९चा हुकूम आज उपलब्ध आहे.

जयंतीबाई ह्या विवाहानंतर थोरल्या संभाजीराजेंबरोबर कर्नाटकमधील कोलारप्रांती अखेरपर्यंत वास्तव्यास होत्या. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर १६९३ पर्यंत त्यांनी दान केल्याच्या शिलालेखवरून हे सिद्ध होते.

मकाबाई ह्या संभाजीपुत्र उमाजीराजेंच्या पत्नी होत्या. त्यांना बहादूरजी नावाचा पुत्र होता तसेच त्यांनी भांबोरेकर भोसलेकडून परसोजी हा दत्तक घेतला होता. बहादूरजीस पुढे पुत्र झाले नाही. परसोजी हा शहाजीराजेंचे चुलतबंधू परसोजीचा पणतू होता. भोसले घराण्याची वंशपरंपरागत पाटीलकीची जी गावे होती त्यापैकी 'जिंती' हे देखील होते. परसोजीपासूनच जिंतीकर भोसलेंचा वंश पुढे वाढला. जिंती हे सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील गाव आहे.

मकाबाई म्हणजे 'मकाऊ भोसले' ह्यांनी जिंतीचा कारभार १७४० पर्यंत चालवला. बादशाही कागदपत्रात मकाऊंचा उल्लेख 'मकाबाई पाटलीन जिंतीकर' असा येतो. मकाऊ ह्या नात्याने छत्रपती शाहूंच्या चुलत चुलती लागत होत्या, त्यांचा स्नेह शाहू दप्तरांतील कागपत्रांतून वेळोवेळी दिसून आला आहे. शाहूंनी वेळोवेळी आपल्या ह्या चुलतीचा परामर्ष घेतल्याचे दिसून येते. छत्रपती राजारामांनी मकाऊस धनाजी जाधवरावांकडून एक गाव दिल्याची नोंद ताराबाईकालीन कागदपत्रात सापडते. इ.स. १७४० पर्यंत शाहू दप्तरात मकाऊंचे उल्लेख आढळतात.

इ.स. १७३० मध्ये मोगलांचा करमाळा येथील बंडखोर सरदार राजा रावरंभा निंबाळकरने जिंती गावास व मकाबाईस उपद्रव केला, तेव्हा मकाऊस उपद्रव न देण्याची तंबी बादशहाने निंबाळकरास दिल्याचे पत्र जिंती दप्तरात आहे.

आपल्या आदर्श कारभारामुळे मकाबाई स्वकीय आणि परकीय अशा दोहोंच्या आदरास पात्र झाल्या व दैवत्वास पोहोचल्या. जिंती गावातील लोकांनी मकाईस देवीचा दर्जा दिला आहे, तिथे त्यांच्या पूजा-अर्चाची सोय आहे. जिंती गावात दरवर्षी मकाईदेवीची जत्रा भरते. जिंती गावात आजदेखील मकाऊसाहेबांचा चार बुरुजांनी युक्त असा वाडा आहे. वाड्याच्या तटाची बरीच पडझड झाली आहे. परंतु १७व्या शतकातील वैशिष्ट्ये दाखवणारा महाद्वार अजून देखील चांगल्या अवस्थेत आहे. थोरल्या संभाजी महाराजांचे सध्याचे वंशज 'राजेभोसले' ह्या वाड्यात राहतात.

 

(मकाऊसाहेबांचा वाडा)

जिंती गावाच्या शेजारीच एका चौथऱ्यावर ह्या गावची पाटलीन मकुबाईसाहेब भोसले जिंतिकर उर्फ मकाईची छोटेखानी समाधी आहे.

 एक काळ होता, जेव्हा शहाजी-संभाजी ह्या पिता-पुत्राच्या जोडीने कर्नाटक जवळ जवळ स्वतंत्र केलाच होता. पण मराठ्यांचे दुर्दैव आज इतिहास आपल्याला माहीत आहे. आज अवघ्या महाराष्ट्राला शिवरायांचे वंशज माहीत आहेत, पण थोरल्या संभाजीराजेंचे वंशज माहीत नाहीत. सातारा-कोल्हापूर गादीचा जेवढा अभिमान वाटतो तेवढाच मकाऊसाहेबांचा देखील अभिमान आहे.



No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...