विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 9 July 2022

स्वराज्याचे बाहुबली संभाजी कावजी कोंढाळकर

 




स्वराज्याचे बाहुबली संभाजी कावजी कोंढाळकर
पोस्त सांभार ::Vivek Dalave

संभाजी कावजी कोंढाळकर या आपल्या स्वराज्यातील शिलेदारांचा मृत्यू अतिशय दुर्दैवी झाला.

संभाजी कावजी यांचा जन्म १६२५ सुमारास कोंडवळे या गावी झाला. कावजी कोंढाळकर यांनी कान्होजी जेधे यांच्या हाताखाली युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. व त्यांच्याच आदेशावरून छत्रपती शिवरायांच्या सेवेत रुजू झाले. १६४५ साली हिंदवी स्वराज्याची शपथ घेताना संभाजी कावजी हे सुद्धा महाराजांसोबत होते. ते स्वराज्यातील सर्वांत उंच शिलेदार होते. उंचीच्या बाबतीत ते सरसेनापती नेताजीराव पालकरांना देखील मागे टाकत होते. ताकदीच्या बाबतीत तर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मागे टाकत होते. आणि काटकतेमध्ये तर येसाजी कंक यांच्यापुढे होते.

या ३ ही शिलेदारांची स्वराज्यात वेगळी ओळख होती. म्हणजे नेताजीराव हे स्वराज्यातील सगळ्यात उंच म्हणजे धिप्पाड देहाच्या तटबंदीचे होते. त्या बाबतीत त्यांचा हात कुणीही धरत नसे. तानाजी मालुसरे यांच्या एवढे बलदंड शरीर स्वराज्यात कुणाचेच नव्हते. एका वेळेला सुभेदार ६४ भाकऱ्या कुचकारून खात होते. येसाजी कंक यांच्या एवढे स्वराज्यात कुणीही काटक नव्हते. येसाजी कंक यांची हाडे इतकी मजबूत होती की त्यांच्या हातावर किंवा शरीरावर कुठेही तलवारीचा वार केला तरी सहजासहजी त्यांच्या नसा फुटत नव्हत्या. त्यामुळे एका वारात ते रक्त बंबाळ होत नव्हते. त्यांच्या नसा फार तग धरणाऱ्या होत्या.

व या सर्व गोष्टी एकट्या संभाजी कावजी कोंढाळकर यांच्याकडे होत्या. १६४५ साली ते स्वराज्यात आले तेव्हा.. सर्वांत उंच शिलेदार म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले…सर्वांत बलदंड शरीरयष्टी ही त्यांच्याकडे होती व सर्वांत काटक म्हणून देखील सगळे मावळे त्यांच्याकडे बोट दाखवू लागले. सगळे विक्रम त्यांनी मोडीत काढले.

१६५६ साली शिवरायांनी जावळी प्रांत जिंकून घेतला. चंद्रराव मोरे याचा वध केला. पण त्याचा भाऊ हणमंतराव मोरे हा जावळीच्या जंगलात लपून बसला. मात्र त्याचा जास्त विचार शिवरायांनी केला नाही. पण १६५७ च्या सुमारास त्याने जावळीत पाय ठेवला. व पुन्हा रयतेचा छळ सुरू केला. तेव्हा याचा शेवट करण्यासाठी शिवरायांनी संभाजी कावजी कोंढाळकर यांना जावळी मोहीम दिली. अवघे ७० मावळे घेऊन संभाजी कावजी हे जावळी खोऱ्यात शिरले. आणि तिथल्या जंगलात त्या हणमंतराव मोरे विरुद्ध संभाजी कावजी असं युद्ध सुरू झालं. ७० मावळे हे १०० जणांना भिडले. सर्वांचा शेवट संभाजी कावजी यांनी केला. या लढाईमुळे जंगलातील वाघ बिबटे देखील बिथरून गेले होते. पण त्या जंगलातून हणमंतराव मोरे हा संभाजी कावजी कोंढाळकर यांना हुलकावणी देऊन पळून गेला. जवळ जवळ ४ महिने त्याचा पत्ता लागला नाही. मावळे म्हणत होते पुन्हा माघारी राजगडी जाऊ…

मात्र संभाजी कावजी म्हणाले, अरे राजगडी जाऊन काय उत्तर देणार राजांना.. ते काही नाही हा हणमंतराव मोरे मारूनच आपण राजगड गाठायचा अन्यथा स्वतःचा जीव देऊन टाकायचा. आणि पुढच्या एका महिन्यात हणमंतराव मोरे संभाजी कावजी यांना सापडला. वाई येथे तो त्यांच्या नजरेस पडला. पडता क्षणी त्याच्यावर कावजी कोंढाळकर यांनी झडप घातली आणि त्याचा वध केला. जावळीच्या मोऱ्यांची वळवळणारी शेपटी संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापून काढली.

पुढे १६५८ साली महाराजांनी त्यांना जुन्नर किल्ला हस्तगत करण्यास पाठवले. सोबत सुभेदार तानाजी मालुसरे यांना देखील पाठवले. त्या लढाईत तर त्यांनी फार मोठे शौर्य गाजवले. या लढाईत त्यांनी तलवारीचा वापर अजिबात केला नाही. लाथा बुक्क्यांनी मोगली हशमांचे जीव घेतले. त्यांच्या एका बुक्कीत शत्रूचा जीव जात होता. एवढंच काय तर त्यांनी या लढाईत शत्रूचा घोडा स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतला. व तोच घोडा ते गनीमांच्या दिशेने फेकून देऊ लागले. एका घोड्यामध्ये २०-२० गनिम घायाळ होऊन पडू लागले.(विचार करा त्यांच्या ताकदीचा मग)

संभाजी कावजी कोंढाळकर यांनी जुन्नरचा किल्ला स्वराज्यात आणला. व ते राजगडी गेले. तिथे पोहोचताच तानाजींनी सगळी हकीकत महाराजांना सांगितली. छत्रपती शिवरायांनी त्यांना "स्वराज्याचे बाहुबली" हा किताब दिला. व जुन्नरचे किल्लेदार म्हणून नेमणूक केली.

त्यांच्या या पराक्रमामुळे महाराजांनी त्यांना १० नोहेंबर १६५९ रोजी अफझलखान भेटीवेळी अंगरक्षक म्हणून सोबत घेतले होते. खानाचा वध केल्यावर संभाजी कावजी यांनी खानाची पालखी घेतलेल्या भोयांचे पाय कलम केले. पालखी खाली कोसळली आणि मग संभाजी कावजी कोंढाळकर यांनी जखमी खानाचे मुंडके तलवारीने धडावेगळे केले. या पराक्रमामुळे छत्रपती शिवराय फार खुश झाले. कारण या युद्धात सगळ्यात मोठी कामगिरी ही संभाजी कावजी कोंढाळकर यांनी केली होती. जर हे झाले नसते तर खानाला त्याच्या फौजेने जीवंत विजापूरला नेले असते. व छत्रपती शिवरायांचा खानाला संपविण्याचा हेतू हा साध्य झाला नसता.

१६६० साली महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात सापडले. तेव्हा शाईस्तेखान लाल महालात तळ ठोकून बसला. त्या काळात त्याने वतने देऊन स्वराज्यातील अनेक सरदार मंडळी फोडायला सुरुवात केली. सर्जेराव गाढे, जसवंतसिंह कोकाटे हे सरदार खानाला जाऊन मिळाले. वतनासाठी त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली. व किल्लेदार संभाजी कावजी यांचा पराक्रम देखील खानाच्या कानावर पडला होता. त्यांना स्वराज्यातून कस फोडायचे असा प्रयत्न स्वतः शाईस्तेखान करू लागला. म्हणून त्याने संभाजी कावजी कोंढाळकर यांचा भाऊ बाबाजी राम कोंढाळकर याला वतनाचे आमिष दाखविले. वतनाला भुलून बाबाजी राम हा खानाला जाऊन मिळाला.

१६६१ साली महाराज राजगडी आले. तेव्हा त्यांना ही घटना कळाली. त्यांनी किल्लेदार संभाजी कावजी कोंढाळकर यांना बोलावून घेतले.

"आपल्या बंधूराजास आपण कैसे जाऊ दिलेत." असा जाब विचारला. आणि राजगडावरून गडउतार होण्यास सांगितले. ही शिवरायांची नाराजी योग्य होती. मात्र याचा चुकीचा अर्थ संभाजी कावजी कोंढाळकर यांनी घेतला. व मनात राग धरून स्वराज्याशी फितुरी केली. संभाजी कावजी कोंढाळकर हे शाईस्तेखानाला जाऊन मिळाले. त्याने संभाजी कावजी यांचा फार मान सन्मान केला. ४००० ची मनसबदारी दिली. व संभाजी कावजी कोंढाळकर यांना चाकणचे किल्लेदार देखील बनवले.

ही खबर महाराजांना लागली. शिवरायांनी त्यांची जुन्नरची किल्लेदारी रद्द करून टाकली. त्यांच्या मनाला फार वाईट वाटले. त्यांनी प्रतापराव गुजर म्हणजे तेव्हाचे कुडतोजी गुजर यांना चाकणची मोहीम दिली. व

"संभाजी कावजी कोंढाळकर यांची समजूत काढा.. त्यांना स्वराज्यात पुन्हा घेऊन या.. असे आदेश महाराजांनी प्रतापराव गुजर यांना दिले."

१६६२ साली आनंदराव गुजर यांना घेऊन प्रतापराव चाकणच्या किल्ल्यावर गेले. प्रतापराव गुजर यांनी चाकणला वेढा दिला. फार मोठी कापाकापी झाली. संभाजी कावजी कोंढाळकर यांची ४००० ची गनिम फौज प्रतापराव गुजर यांनी कापून काढली.

व संभाजी कावजी कोंढाळकर यांना स्वराज्यात येण्याचे आवाहन केले.

कुडतोजी:- अरे ए कावजी राजांनी तुला परत बोलावलय. तू आमच्यासोबत चल.

संभाजी कावजी:- आता ते होणार नाही. ते माझ्यावर नाराज झालेत. आणि आता मी इथला चाकर नाही तर ४००० च्या फौजेचा मनसबदार आहे. शिवाय खानाकडून रोख रक्कम मला मिळलीय. आता मी कुठेही जाणार नाही.

कुडतोजी गुजर यांनी संभाजी कावजी याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यात अपयशी ठरले. व त्यांनी ओळखलं की "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही."

कुडतोजी:- तुला मी शेवटचं सांगतोय आमच्या स्वाधीन हो. राजांकडे चल. त्यांना तुझी गरज आहे.म्हणून आम्ही शिवरायांच्या इच्छेखातर इथवर तुझ्यासाठी पायघड्या घालत आलोय.नाहीतर मला माझी समशेर उचलावी लागेल.

अस म्हणताच त्या संभाजी कावजी यानेही कुडतोजी गुजर यांना युध्दाचे आव्हान दिले. ते असे होते की युद्ध फक्त संभाजी कावजी कोंढाळकर व कुडतोजी गुजर यांच्यातच होणार. त्याने एकास एक लढण्याचे आव्हान दिले. आणि तेसुध्दा कुडतोजी यांनी स्वीकारले. कुडतोजी गुजर यांनी संभाजी कावजी विरुद्ध बंड पुकारले. मात्र आव्हान स्वीकारण्यापूर्वी अनेक मावळे हे कुडतोजी यांना म्हणत होते की तुम्ही हे आव्हान स्वीकारू नये. मात्र कुडतोजी यांनी कुणाचच ऐकलं नाही. सर्वांना कुडतोजी यांची काळजी वाटू लागली. कारण हा संभाजी कावजी कोंढाळकर अतिशय धिप्पाड शरीरयष्टीचा होता. अहो आपल्या सरसेनापती नेताजीराव पालकर यांनाही तो त्या काळात मागे टाकत होता. पण कुडतोजी गुजर पण खूप चपळ आणि चलाख होते. जेवढा तो कावजी नव्हता.

आणि मग युद्धास सुरुवात झाली. संभाजी कावजी कुडतोजी गुजर यांच्यावर वार करू लागला. त्याचा प्रत्येक वार कुडतोजी गुजर हे उधळून लावत होते. त्यांच्यासोबत असणारे आपले गडातील २५-३० मावळे तोंडात बोटं घालून बसली होती. अनेकांना वाटत होत की कुडतोजी गुजर यांच काही खरं नाही. मात्र युद्धात हस्तक्षेप करता येत नव्हता. पण कुडतोजी स्वतःच संरक्षण बरोबर करत होते. मग कुडतोजी यांनीही त्यांच्या समशेरीचे प्रहार त्या धिप्पाड अंगाच्या कावजी वर करायला सुरुवात केली. पण उंचीअभावी कुडतोजी यांचे वार त्याच्या पर्यंत पोहचू शकत नव्हते. शेवटी त्यांनी एक युक्ती केली. लांब अशी उंच झेप घेतली आणि त्या संभाजी कावजी याच्यावर झडपच घातली. आणि जोरदार असा त्याच्या मानेवर प्रहार केला. आणि संभाजी कावजी याचं मस्तक धडावेगळ केलं. सर्वांना आश्चर्य वाटलं कारण याचा सामना कोण करेल हा फार मोठा प्रश्न पडला होता.पण शेवटी कुडतोजी यांनी आपल्या वाटेतला काटा बाजूला केला. आणि पुन्हा एकदा राहिलेल्या शत्रुसैन्यावर तुटून पडले. कुडतोजीराव आनंदरावांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे आपल्या ५०० मावळ्यांमध्ये १० हत्तींच बळ संचारल. व ठरल्याप्रमाणे कुडतोजी गुजर आणि आपल्या ५०० मावळ्यांनी संभाजी कावजी याची ४००० ची फौज निसत्नाभुत करून टाकली. कुडतोजी गुजर यांनी चाकण संग्रामदुर्ग जिंकून घेतला. व चाकणवर भगवा फडकवला. ही आनंदाची बातमी महाराजांना कळाली. महाराजांनी कुडतोजी गुजर यांना राजगडावर बोलावले. व त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच कुडतोजी गुजर यांना चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांना घोषित केले. व फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी महाराजांनी दिली. मात्र संभाजी कावजी कोंढाळकर यांच्या मृत्यूचे महाराजांना फार वाईट वाटले. कारण तो राजांवर नाराज जरी झाला असला तरी हिंदवी स्वराज्यात त्याचंही योगदान हे फार महत्वाचं होतं. म्हणून शिवराय कुडतोजी गुजर यांना घेऊन संभाजी कावजी यांच्या कोंडवळे गावी गेले. व त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच संभाजी कावजी याच्या घरच्या मंडळींना प्रति महिना वेतन सुरू केले. आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. 🚩🚩


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...