!!शालिवाहन शके १५९२ चे महाराजांचे विजई पर्व संपल्यावर गडकोट किल्ल्यांच्या डागडुजीसाठी शिवाजी महाराजांनी केलेली तरतुद.!!
शिवाजी महाराजांचे इ.स. १६७० हे साल विजई पर्व बनले. महाराजांनी पुरंदर च्या तहात गेलेले जवळपास सर्वच किल्ले या एका वर्षात जिंकले शालिवाहन शके १५९२ सालि महाराजांनी १७ ते १८ किल्ले जिंकून सुरतेची दुसरी लुट केली. विस्तीर्ण प्रदेश स्वराज्यात दाखल झाला. हा महापराक्रम गाजवून स्वराज्यावर मोगलांचे आक्रमक हे मोठ्या प्रमाणात होणार हे अपरिहार्य होतेच. त्याच मुळे स्वराज्यातील गडकोट किल्ले हे मजबूत व झुंजते असणे गरजेचे होते तर स्वराज्याची राजधानी हि टुमदार व्हायला हवी. या नविन वर्षात महाराजांनी स्वराज्याच्या गडकोट किल्ले यांच्या साठी नवा खजिना उभा करण्यास तरतुदा केल्या. अर्थ संकल्प तयार केला. या साठी चे दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र उपलब्ध आहे. ते पत्र राजवाडे खंड ८ लेखांक २१ व २२ मध्ये व शिवछत्रपतींची पत्रे खंड १ पत्र क्र. ४१ मध्ये प्रकाशित केले आहेत. ते पत्र महालो महालीच्या अधिकाऱ्यांना रवाना केले.
'राजश्री साहेबी तह केला की जो आपला वतन मुलुक आहे त्यापैकी माहालोमाहालीहून खजाना करावयास पैके आणावे त्याचा खजानाच करून ठेवावा. जे वख्ती मोगलांशी झगडा सुरू होईल आणि मोंगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरूर आणिकी करून ऐवज जुडेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे. नाही तन्ही एन्हवी राज्यभागास सर्वही खर्च न करावा. ऐसा साहेबी तह केला असे. आणि खजाना करावयाची मोईन केली होन १,२५,००० मा एक लाख पंचवीस हजार होन रास. पैकी २०,००० प्रत्येकी कुडाळ, राजापूर, कोळे, १५,००० दाभोळ, १३,००० पुणे, १०,००० नागोजी गोविंद, ५,००० प्रत्येकी जाऊली, कल्याण, भिवंडी, इंदापूर व कृष्णाजी भास्कर (चौलचा सुभेदार) २,००० सुपे येणेप्रमाणे एक लाख पंचवीस हजार होन खजाना करावयाचा तह केला.
खजिन्याप्रमाणेच गडांची दुरुस्ती करणेही आवश्यक होते. महाराजांनी विचार केला की, गबाळ हुन्नरवंद लावून पैका पावत नाही. हुन्नरवंद गवगवा करिता काम करीत नाहीत.' म्हणून त्यांनी ठरविले की, नेमस्तच इमारत करावी. काटेकोरपणे खर्चाचा अंदाज घेऊन महाराजांनी कोणत्या किल्ल्यासाठी किती खर्च करावयाचा तेही लिहून ठेवले. त्यानुसार ५०,००० होन रायगड दुरुस्तीसाठी खर्च व्हावयाचे होते. त्यापैकी २०,००० होन दोन तळ्यांसाठी, १०,००० होन गच्चीसाठी. ५,००० होन किल्ल्यांची डागडुजी व १५,००० होन तट दुरुस्तीसाठी खर्च करण्याचे ठरले. याशिवाय सिंहगढ़, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, पुरंदर, राजगड या किल्ल्यांसाठी प्रत्येकी १०.००० होन, प्रचंडगड, प्रसिद्धगड, विशालगड, महिपतगड, सुधागड, लोहगड, सबळगड व श्रीवर्धनगड (आणि मनरंजनगड हे दोन मिळून) प्रत्येकी ५,००० होन, कोरीगडासाठी ३,००० होन, सारसगड, महीधरगड यासाठी प्रत्येकी २,००० होन, मनोहरगडासाठी १,००० होन व किरकोळ खर्चासाठी ७,००० होन असे एकूण १ लक्ष ७५ हजार होन किल्ला-दुरुस्तीसाठी खर्च व्हावेत असे महाराजांनी फर्मावले. येने प्रमाणे किल्ले दुरुस्ती करुन स्वराज्याचा महाराजांनी पुरता बंदोबस्त करुन ठेवला.
संदर्भ:-
¤ राजवाडे खंड ८ लेखांक २१ व २२
¤ शिवछत्रपतींची पत्रे खंड १ पत्र क्र. ४१
संपादिका- डाॅ.सौ.अ.गों. कुलकर्णी
¤ शककर्ते शिवराय खंड १
लेखक- शिवकथाकार विजय देशमुख
No comments:
Post a Comment