विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 19 July 2022

मायनाक भंडारी यांचे अजोड साहस

 


मायनाक भंडारी यांचे अजोड साहस
सतराव्या शतकात पोर्तुगीज आणि इंग्रजांचे व्यापारी दृष्टीने आरमारी वर्चस्व होते शिवाय मोगल किंवा अदिलशाह यांची सत्ता समुद्रावर जास्त काही चालत नसे हि गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण प्रदेश काबीज केल्यावर लक्षात घेतली तसेच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीय लोकांपासून हि स्वराज्यास धोका आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराची आवश्यकता वाटू लागली आणि याच कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७-१६५८ सालापासून आरमार बांधणीस प्रारंभ कल्याण भिवंडी येथे केला.
फक्त आरमार बांधून उपयोग नव्हता कारण आरमरावर देखरेख व लक्ष ठेवण्यासाठी जलदुर्ग बांधणीस सुरुवात केली. त्यातील काही जलदुर्ग आजही समुद्रात महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत.
या आरमारांचे सुभेदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांची नेमणूक केली. शत्रू ला जमिनीवर येण्यापूर्वीच त्याचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६७९ चे सुमारास मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या.
मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.
नुकत्याच सागरी आरमारात उतरलेल्या स्वराज्याच्या हा छोट्याश्या आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करू शकतो, अशा फाजील आत्मविश्वासात इंग्रज होते. महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला.
मायनाक भंडाऱ्यांना रवाना केले. मायनाक भंडारी यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सैनिकांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा अक्षरशः हाणून पाडला. आणि स्वराज्याच्या आरमाराची ताकद दाखवून दिली.
मराठ्यांनी हा हल्ला परतून लावल्या नंतर, ‘खांदेरी’ बेटावर किल्ला मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक १५० माणसे देऊन ऐन पावसाळयात खांदेरी दूर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. या कामी महाराजांच्या आरमारात असलेल्या उथळ तळाच्या छोटया होडयांनी महत्वाची भूमिका निभावली.
ओहोटीच्या वेळी उथळ पाण्यातून या बोटींच्या हालचाली चालू असताना इंग्रजांच्या खोल तळ असलेल्या बोटी समुद्रात खोल पाण्यात अडकून पडल्यामुळे इंग्रजांना हात चोळत बसावे लागले. शेवटी इंग्रजांनी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला.
पुढे मायनाक भंडारी यांचा पराक्रम पाहून त्यांना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली. महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले. त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता. या मोहिमेमध्ये भंडाऱ्यांचा पुतण्या धारातीर्थी पडला. मात्र मायनाक भंडाऱ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जीवावर सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला.
शिवरायांचे अजोड तंत्र आणि मायनाक भंडारीचे अजोड साहस आपल्याला चकीत करते. मायनाकाला सलाम करण्यासाठी खांदेरी उंदेरी च्या किल्याला भेट नक्की द्या.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...