हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग ५
यानंतर महादजीनें आपली कवायती फौज पुष्कळच वाढविली; त्यांत मराठयांपेक्षां मुसुलमान, रजपूत यूरोपियन यांचाच भरणा जास्त होता. त्यानें आग्रयाच्या किल्ल्यांत यूरोपीय हत्त्यारासारखी हत्यारें तयार करण्याचे कारखाने काढले. वर सांगितल्याप्रमाणें उत्तरहिंदुस्थान आपल्या काबूंत आणल्यावर पाटीलबोवा बारा वर्षांनीं पुण्यास आले (१७९२ जून). यावेळीं नानांच्या मुत्सद्दीपणानें व महादजीच्या शौर्यानें सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्य पसरून साऱ्या हिंदुस्थानभर त्याचा दरारा बसला होता.
पुण्यास आल्यावर पावणेदोन वर्षे महादजी स्वस्थच होता. त्यानंतर शके १७१५ च्या माघ शुद्ध १३ रोजी (१२ फेब्रु. १७९४) एकाएकीं नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथें वयाच्या ६७ व्या वर्षी त्याचा अंत झाला. त्याची छत्री हल्लीं वानवडीस आहे. त्यानें आपला धाकटा भाऊ तुकोजी याचा नातु दौलतराव यास वारस नेमलें होतें. महादजी हा कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, परंतु थोडासा स्वार्थी, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होता. सारांश, नानासाहेब पेशव्यांच्या म्हणण्याप्रमाणें अष्टपैलूपणें राज्यकारभार करणारा असा हा पुरुष होता. त्याच्या वेळी उज्जैनी ही शिंदेसरकारची राजधानी असून ग्वाल्हेर येथें लष्कर असे. महादजीचें सैन्य म्हणजे ३० हजार कवायती पायदळ, ५०० तोफा व एक लाख घोडदळ होतें.
(संदर्भग्रंथः- सरंजामे-शिंदे घराण्याचा इतिास; लोकहितवादी-ऐति. गोष्टी; मल्हार रामराव-धाकटे रामराजे व शाहुराजे यांचीं चरित्रें; भाऊसाहेबांची बखर; रघुनाथ यादव-पानिपतची बखर; होळकरांची कैफियत; मराठी साम्राज्याची छोटी बखर; पेशव्यांची बखर; पत्रें-यादी वगैरे; खरे-ऐतिहासिक लेखसंग्रह; ब्राउटन-लेटर्स फॉम ए मराठा कँप; कॉम्प्टन-मिलिटरी ॲडव्हेन्चरर्स ऑफ हिंदुस्थान; इलियट-हिस्टरी ऑफ इंडिया. भा. ७।,८; फ्रॅकलिन-शहाअलम; फॉरेस्ट-सिलेक्शन्स. भा. १, मराठा सेरीज; ग्रँटडफ; कीनफाल ऑफ दि मोंगल एंपायर व माधवराव सिंधिया; मॅकडोनल्ड-नाना फडणवीस; सीक्रेट कमिटीज फिफ्थ रिपोर्ट; रॉय-ग्वालीयर; नातु-महादजी शिंदे यांचें चरित्र.)
No comments:
Post a Comment