पुराणात सांगितल्या प्रमाणे शिवस्वाती नंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा बाविसावा नृपती गादीवर आला. हा इ.स. १२४ च्या दरम्यान गादीवर आला असावा. हा सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. असे असले तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सातवाहन राज्य मोडकळीला आले होते. कारण उत्तर भारताचा बव्हंशी भाग हा सम्राट कानिषकाने आपल्या ताब्यात घेतला होता. सोबतच क्षत्रप राजा नहपान याने जुन्नर पर्यंत धडक मारून सातवाहनांना तेथून हुसकावून लावले व तेथे आपले सत्ताकेंद्र निर्माण केले होते. नंतरच्या काळात तर सातवाहनांची राजधानी असणारे प्रतिष्ठान हे सुद्धा क्षत्रपांनी जिंकून घेतलेले दिसते. अश्या परिस्थितीत गौतमीपुत्राने सातवाहनांच्या राज्याचे रूपांतर पुनः साम्राज्यात केले.
त्याने प्रथम विदर्भावर आक्रमण करून वेणातिराच्या क्षत्रपांचा बीमोड केला आणि स्वतःला ' वेणाकटकस्वामी ' असे घोषित केले. क्षत्रपांचा राजा असणाऱ्या नहपानाला नाशिकच्या गोवर्धन परिसरात गाठून गौतमीपुत्राने त्याचा प्रचंड मोठा पराभव केला. आणि नहपानाला सह्याद्रीचा आश्रय घेण्यास भाग पाडले. युद्धानंतरच्या पंधरवड्यातच सह्याद्रीच्या रांगानमध्ये नहपानाचा पाठलाग करून गौतमीपुत्राने त्याचे समूळ उच्चाटन केले, म्हणूनच गौतमीपुत्राला 'क्षहरातवंशनिर्वंशकर ' ( नहपान क्षत्रपाचे क्षहरात कुळ नष्ट करणारा ) म्हणून गौरविले आहे. सोबतच क्षत्रपांकडून सातवाहनांचे असणारे मूळ प्रदेश जिंकून घेतल्याने गौतमीपुत्राचा 'सातवाहनयशप्रतिष्ठाकार ' असा गौरव पूर्वक उल्लेख करण्यात आला आहे. त्या काळी गौतमीपुत्रा एव्हढा बलाढ्य नृपती भारतात अन्य कोणी नव्हता. त्याने मध्यभारतात व दक्षिणापथात मोठा दिग्विजय केला. त्यामुळे त्याला 'त्रीसमुद्रतोयपीतवाहन ' ( ज्याच्या घोड्यांनी तीनही पूर्व, पश्चिम आणि दक्षिण समुद्राचे पाणी प्यायले आहे ) असे बिरूद लावले गेले.
गोतमीपुत्राच्या कारकीर्दीत दक्षिणेकडील बरीचशी राज्ये, अवंती, सुराष्ट्र, महाराष्ट्र, मध्य भारत, राजस्थान असा मोठा प्रदेश सातवाहनांच्या ताब्यात आला. उत्तरेतील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव या परकीय राज्यकर्त्याशी युद्ध करून त्यांचा निः पात केला म्हणून ' शक - यवनपल्हवनिदुसन' असा त्याचा गौरव करण्यात आलेला आहे.
जसा तो बलाढ्य योद्धा होता तसाच एक कुशल प्रशासकही होता. प्रजेवर त्याने योग्य तेच कर लावलेले होते. प्रजेत त्याच्या विषयी प्रेम व दरारा होता. त्याच्या काळात वैदिक धर्माला महत्त्व प्राप्त झाले. त्याला ' वेदांचा आश्रयदाता ' आणि ' एक ब्राह्मण ' म्हणजेच वैदिक धर्माचा अभिमानी म्हणले गेले आहे.
नहपानाचा पराभव केल्या नंतर त्याच्या नाण्यांचे साठे गौतमीपुत्राने जप्त केले आणि ते आपल्या नावाने पुनर्मुद्रित करून प्रचारात आणले. अश्या प्रकारची पुनर्मुद्रित नाणी पश्चिम महाराष्ट्रात आणि पैठण, अजमेर, उज्जैन, बाळापूर येथे मिळालेली आहेत. सोबतच गज, अश्व आणि कमानी छापाची अन्य नाणीही प्रचारात होती.
गौतमीपुत्राबद्दलची माहिती त्याची आई असणाऱ्या गौतमी बलश्री हिने नाशिक येथील लेण्यांमध्ये कोरून ठेवलेली आहे. नागनिके नंतरची ही अजून एक महत्त्वाची राणी सातवाहन घराण्यात होऊन गेली.
संदर्भ :-
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचिकर
२) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमानपूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
३) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
No comments:
Post a Comment