विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 22 July 2022

बाळाजी विश्वनाथ भट

 

बाळाजी विश्वनाथ भट 

 सातारच्या शाहूमहाराजांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची आज जयंती (१ जानेवारी १६६२ – २ एप्रिल १७२०). (प्रधान –पेशवा हा मूळ फारसी पेसवा शब्दाचा मराठी उच्चार )
भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते. पूर्ण नाव बाळाजी विश्वनाथ भट. याच्या पूर्वजांविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; तथापि कोकणातील महाल दंडा राजपुरी आणि श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिऱ्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. त्याच्या जुलमास कंटाळून बाळाजी व त्याच्या समवेत नाना फडणीसाचे पूर्वज भानु १६९० च्या सुमारास साताऱ्याकडे आले. पुढे धनाजी जाधव याजकडे बाळाजी नोकरीस राहिला. स्वकर्तृत्वाने धनाजीकडे पुणे, दौलताबाद या प्रदेशांवर सुभेदार, सर सुभेदार इ. पदावर त्याने काम केले.

 

मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, या करिता चाललेल्या १७०५ मधील खटपटीत तो मध्यस्थी करीत असावा असे दिसते. खंडो बल्लाळ चिटणीस आणि बाळाजी यांच्यामुळे खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर धनाजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. १६९०-१७०७ दरम्यान मराठी कारभार आणि राजकारण यांचा अनुभव घेतलेल्या बाळाजीपंताला शाहूने राज्याभिषेकसमयी सेनाकर्ते ही पदवी बहाल केली. शाहूने बाळाजीचा पक्ष घेतल्यामुळे धनाजीचा मुलगा चंद्रसेन महाराणी ताराबाईस मिळाला. दुसरेही काही सरदार ताराबाईस जाऊन मिळाले. त्याच वेळी काही मोगल अधिकाऱ्यांनी शाहूला विरोध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शाहूला शत्रूने वेढले होते. बाळाजीने कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा उपशम केला. सेनाकर्ते ही पदवी त्याने सार्थ केली. कान्होजी आंग्रे हा त्या वेळी ताराबाईला मिळाला आणि लोहगड घेऊन पुण्यावर त्याने स्वारी केली. शाहूने त्याचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण पेशव्याचा पराभव होऊन तोच कान्होजीच्या कैदेत पडला. अशा बिकट परिस्थितीत बाळाजीने मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहूच्या पक्षात ओढले आणि त्यास सरखेलपद बहाल करविले. शाहूने बाळाजीस पेशवेपद दिले. (१७१३).

आंग्र्यांशी झालेल्या करारनाम्याने बाळाजी पेशव्याने एक मोठा प्रश्न निकालात काढला. १६८१ पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात जाधव, घोरपडे, भोसले, दाभाडे, आंग्रे इ. सरदारांनी आपापल्या हिमतीवर फौजा उभारून मुलूख जिंकून त्यांवर अंमल बसविला होता. या सरदारांना त्याने एकत्र आणले व नवीन सरदार उत्पन्न केले. या प्रबळ सरदारांचे आणि छत्रपतींचे संबंध कसे असावे, हा गुंतागुंतीचा प्रश्न होऊन बसला होता. सरदार-जाहगीरदारांचे महत्त्व वाढत चालले होते. एकतंत्री राजसत्ता जाऊन मराठी सत्तेला सरंजामी सत्तेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा वेळी आंग्र्यांशी झालेला करार हा या बदलत्या राजकारणाचा पहिला आविष्कार होता. यामुळे एक एक सरदार शाहूच्या आधिपत्याखाली येत गेला आणि स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी यांच्या सनदांनी जो मुलूख आणि जे हक्क छत्रपतींस प्राप्त झाले, ते अष्टप्रधान आणि इतर सरदार यांत शाहूतर्फे वाटले गेले.

बाळाजीने दुसराही असाच एक महत्त्वाचा प्रश्न सोडवून मराठी राज्याला स्थैर्य आणले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांचे वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्याच्या बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले. दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजीमहाराजांचे स्वराज्य बिनशर्त शाहूला देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्क मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहूने पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गेला. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९ च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी दक्षिणेत परतला. संभाजीची पत्नी येसुबाई आणि इतर मंडळी मोगलांच्या कैदेत होती. त्यांना घेऊन जुलै महिन्यात पेशवा बाळाजी साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटला.

अशा रीतीने शाहूच्या सत्तेला मान्यता आणि स्थैर्य बाळाजी विश्वनाथने मिळवून दिले. बाळाजी विश्वनाथाने सय्यद बंधूंशी तह करून मोगली राजकारणात प्रवेश मिळविला. या प्रवेशामुळे बाजीराव पेशव्यांस उत्तरेकडे मराठी राज्याचा विस्तार करता आला. चौथ-सरदेशमुखीचे जे हक्क पेशव्याने मिळविले ते वसूल करण्याच्या निमित्ताने मराठी फौजांचा संचार दक्षिणेत चोहोकडे सुरू झाला व त्यांच्या वाढत्या पराक्रमास वाव मिळाला.

बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून परत आल्यावर दक्षिणेत कोल्हापुरच्या बंदोबस्तासाठी गेला. काही दिवस कोल्हापुरला वेढा देऊन तो १७२० च्या मार्च महिन्यात साताऱ्यात आला आणि तेथून सासवडला गेला. तेथेच त्याचे निधन झाले. त्याची पत्नी राधाबाई त्याच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे जिवंत होती. त्याला पहिला बाजीराव आणि चिमाजी आप्पा असे दोन मुलगे होते. ते मराठेशाहीत स्वपराक्रमाने प्रसिद्धीस आले.(मराठी विश्वकोश )

श्री.माधव विद्वांस यांच्या फेसबुकाच्या फलकावरून साभार


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...