विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 25 July 2022

किल्ले वेलोर.


 किल्ले वेलोर...

दक्षिण दिग्विजयात जिंजीच्या किल्ल्याचा बंदोबस्त केल्यावर शिवाजी महाराज थिरुवंन्नमलाई येथे आले. तेथील समोत्तीपेरुमाल देवतेच्या दोन देवालयांच्या मशिदी करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकांच्या मागणी वरून महाराजांनी त्या मशिदिंचे पुन्हा देवलयांमध्ये रूपांतर केले. त्या मंदिरात गोपुर बांधण्याची तसेच देवालयासमोरच्या टेकडीवर कार्तिक महिन्यातील दीपोत्सव सुरू करण्याची आज्ञा महाराजांनी दिली. त्यानंतर इ.स १६७७ च्या मे महिन्यात मराठ्यांचे सैन्य वेलोरच्या दिशेने निघाले.

वेलोरचा किल्ला तेराव्या शतकाच्या उत्तरर्धात विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला. अत्यंत मजबूत अश्या या किल्ल्याला लष्करी दृष्ट्या प्रचंड महत्त्व होते. त्या काळी हा किल्ला कर्नाटक प्रांतातील एक महत्वाचे आणि बळकट लष्करी ठाणे होते. किल्ल्याला चिलखती तटबंदी होती, त्यात भरभक्कम बुरुज होते. किल्ल्याच्या भोवती  प्रचंड मोठा आणि खोल असा खंदक खोदलेला होता, ज्यात बारमाही पाणी खेळवलेले असे. खंदकामध्ये मगरी - सुसरी मुक्तपणे संचार करीत. अश्या या किल्ल्याचे वर्णन कृष्णाजी अनंत आपल्या सभासद बखरीत करतो की " येरुळकोट यामध्ये इदलशाई ठाणे होते, तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटात जीत पाणियाचा खंदक. पाणियास अंत नाही असे. उदकात दहा हजार सुसरी. कोटाचे फांजियावरून दोन गाडीया जोडून जावे ऐशी मजबुती. पडकोट तरी चार चार फेरियावरि फेरे. ये जातीचा कोट", तर असा हा अभेद्य वेलोरीचा किल्ला जिंकून घ्यायला मराठे निघाले होते.

मराठ्यांचे सैन्य वेलोरच्या किल्ल्याजवळ येऊन पोहचले. त्यावेळी किल्लेदार होता सिद्दी अब्दुल्लाहखान. तो हबशी असला तरी आदिलशाहीशी एकनिष्ठ होता. मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, मात्र न डगमगता तो प्रतिकारासाठी सज्ज झाला. दरम्यानच्या काळात जिंजीचा जुना किल्लेदार असणाऱ्या नसीर मुहंमदखानाने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र अब्दुलाहखानवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याने लढाईची तयारी सुरू केली. किल्ल्यावर गस्ती - पहारे चालू झाले. मोक्याच्या जागी बंदूक धारी सैनिक तैनात केले गेले. स्वतः खान तटबंदीवरुन जातीने फिरून सैन्याला सूचना देत होता. त्याने किल्ल्याचा बंदोबस्त चोख ठेवला होता.

मराठ्यांनी हल्ले करण्यास सुरुवात केली मात्र त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला किल्ल्यावरून प्रतिउत्तर मिळत होते. किल्ला मराठ्यांना चांगलाच झुंजवत होता. किल्ला तसा ताब्यात येणार नाही हे महाराजांच्या लक्षात आले तेव्हा महाराजांनी वेगळीच शक्कल लढवली. किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या डोंगरावर दुर्गबांधणी करून त्याच्या आडून वेलोरच्या भुईकोट किल्ल्यावर तोफांचा मारा करावा. सोबतच किल्ला उंचीवर असल्याने वेलोर किल्ल्यातील हाल-चालिंवर देखील लक्ष देता येईल. बाहेरून काही मदत आली तरी ती देखील वरून दिसू शकेल सोबतच गनिमी काव्याने लढयची वेळ आली तर या किल्ल्याचा फायदाच होणार होता. हे सगळे लक्षात घेऊन महाराजांनी डोंगरावर एक नाही तर दोन किल्ले बांधायला सुरुवात केली. बांधकाम पूर्ण झाल्यावर महाराजांनी किल्ल्याला नावे दिली ' साजरा ' आणि ' गोजरा '.
नव्या गडांवर तोफा चढविण्यात आल्या आणि तेथून मराठ्यांचा तोफखाना चालू झाला. मात्र वेलोरचा किल्ला आणि त्याच्या किल्लेदाराने मारा सहन करीत मराठ्यांना कोणत्याही प्रकारचे यश लाभू दिले नाही. द्राविडी प्रांतात महाराजांची विजयी घोडदौड चालू असताना याच ठिकाणी काय तो प्रतिकार झाला. वेलोरचा किल्ला आपल्याला झुंझावणार हे महाराजांनी ओळखले. एकाच ठिकाणी मराठ्यांची सगळी ताकद एकवटली तर किल्ला ताब्यात आलाही असता मात्र सगळे सैन्य एकच ठिकाणी थांबलेले पाहून इतर पराभूत झालेल्या शत्रूने उचल खाल्ली असती. मात्र महाराजांनी असे होऊ दिले नाही. त्यांनी नरहरी रूद्र यांच्या कडे ५००० पायदळ आणि २००० घोडदळ देऊन वेलोर च्या किल्ल्याची जबाबदारी सोपवली व स्वतः महाराज तिरुवाडीच्या शेरखानावर चालून गेले.

इ.स. १६७८ च्या जून महिन्यात घवघवीत यश संपादन करून महाराज रायगडावर परत आले. तरीही वेलोरचा सिद्धी अब्दुल्लाहखान मराठ्यांशी लढतच होता. तब्बल चौदा महिने मराठ्यांच्या फौजांचा पडलेला वेढा आणि साजिरा गोजिरा वरून होणारा तोफांचा मारा सुरु असताना देखील अब्दुल्लाहखान जिद्दीने लढत होता. तोफेचा प्रत्येक गोळा काही ना काही पाडत होता मात्र किल्लेदार मात्र चिवटपणे उभा होता. बाहेरून मदत येण्याची कोणतीही चिन्हे नव्हती तरी सुद्धा त्याने हार मानली नाही. या लढाईचा शेवट केव्हा आणि कसा होणार ते कोणालाही कळत नव्हते.
अखेर निसर्गानेच युद्धाचा निकाल लावला. किल्ल्यातील आदिलशाही फौजेत साथीचा रोग झपाट्याने पसरला आणि त्यात माणसे व जनावरे पटापट मरू लागली. पिण्याचे पाणी दूषित झाले. अखेर अब्दुल्लाहखानाने २२ जुलै १६७८ ला शरणागती पत्करली आणि किल्ला रघुनाथ पंतांच्या ताब्यात देऊन उरलीसुरली फौज घेऊन तो विजापूर कडे निघून गेला. अश्यारितीने वेलोरवर भगवा ध्वज फडकला

- प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
साद शिवकालीन दुर्गांची - महेश तेंडुलकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...