महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जर कोणी विचारले तर क्षणार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. हा दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण इतिहास महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच या लेखा मागील उद्देश आहे.
प्राचीन कालखंड म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २३० चा तो कालखंड होता. संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.
वैदिक धर्मीय असणाऱ्या सातवाहनांनी अश्वमेध, राजसूय, अनारंभनीय इत्यादी यज्ञ करून आपला दरारा संपूर्ण भारत खंडामध्ये निर्माण केला होता. या घराण्याने भारतीय इतिहासाला अनेक वीर राजे दिले आहेत. याच घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने “तीसमुद्दतोयपीतवान” (म्हणजे ज्याच्या वाहनाने घोड्याने तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे) ही बिरुदावली धारण केली होती. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र वैभवाच्या उत्तुंग शिखरावर होता. ही संपन्नता पाहून नहपान नावाचा एक शक राज्यकर्ता महाराष्ट्रावर आक्रमण करु लागला. इसवी सन १२५ च्या सुमारास नहपान आणि गौतमिपुत्रामध्ये नाशिक येथील गोवर्धन परिसरात घनघोर युद्ध झाले. यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा दारुण पराभव केला आणि त्याच्या चांदीच्या व सोन्याच्या सर्व नाण्यांवर आपली विजय मुद्रा उमटवली आणि ती चलनात आणली. नाशिक येथील जोंगलटेंभी येथे झालेल्या उत्खननामध्ये अशा १३,२५० नाण्यांचा संचय सापडला आहे. पराभूत नहपान सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लपून बसला असता, त्याचा पाठलाग करून गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ उच्छेद केला. नहपान शकाच्या नाशामुळे महाराष्ट्रावर आक्रमण करण्याची कोणत्याही परकीय आक्रमकाची छाती झाली नाही. तसेच वायव्येकडील ग्रीक व पह्लवांनी गौतमीपुत्राची चांगलीच धास्ती घेतली होती. गौतमीपुत्राने आपल्या राज्याचा विस्तार मध्यप्रदेशातील विदिषा नगरी पर्यंत वाढवला होता. याच्या कालखंडात दक्षिण व मध्य भारतामध्ये सातवाहनांची प्रबळ सत्ता होती.
सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. अशा उत्तम कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता!
सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती. याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती. तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
बहुतांश सातवाहन राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावत असत. गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र पुळूमावी इत्यादी मातृपदवाचक नावांवरून समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान होते असे दिसते. इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे. सातवाहन राजांनी अनेक गड किल्ल्यांची निर्मिती आपल्या कालखंडामध्ये केली होती. हेच गड-किल्ले पुढील शिलाहार व राष्ट्रकूट वंशी राज्यांनी वापरले. छत्रपती शिवरायांनी ज्या गड-किल्ल्यांच्या जोरावर हिंदवी साम्राज्य उभे केले त्यातील काही किल्ले हे कदाचित सातवाहन स्थापित असतील !
साहित्य, स्थापत्य, शिल्पकला याबरोबरच व्यापार-उद्योग, धार्मिक समन्वय आणि सुनियोजित शासन व्यवस्था अशा अनेक कसोट्यांवर सातवाहन घराण्याने महाराष्ट्राला जागतिक पटलावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले होते. महाराष्ट्र दिन साजरा करताना या सुवर्ण इतिहासाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे!!
संदर्भ ग्रंथ- १. सातवाहन कालीन महाराष्ट्र (रा. श्री. मोरवंचीकर)
२. प्राचीन भारताचा इतिहास (जी. बी. देगलूरकर)
३. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (डॉ. वा. वि.मिराशी)
No comments:
Post a Comment