अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे.
बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते.
येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
Burgess, James & Bhagwanlal, Indraji, Inscritions From The Cave -Temples Of Western India, Archaeological Survey of Western India, Bombay, 1881.
Fergussion, James & Burgess, James, The Cave Temples Of India, London,1880.
Lad, Bhau Daji, ‘Ajunta Inscriptionsʼ, Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society, Vol. 7, pp. 53-74, 1863.
मिराशी, वासुदेव विष्णु, वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
- रुपाली मोकाशी
No comments:
Post a Comment