स्मारक उभारण्याची परंपरा भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे असे आपल्याला पाहायला मिळते आजच्या काळात त्याचे स्वरूप जरी बदलले तरी त्याच्यामागची कल्पना एकच आहे हे आपल्याला समजते मग तो एखादा स्तंभ, देवळी, समाधी, वीरगळ, सतीशिळा किंवा मग छत्री असेल या सगळ्याचा इतिहास फार महत्वाचा आहे.
पराक्रमी पुरुषांच्या विरकथा तसेच सत्पुरुष लोकांच्या समाध्या किंवा त्यांचे महत्वाचे संदेश तसेच सतीने केलेले अग्निदिव्य या सर्वगोष्टी आपल्याकडील जनमानसात वेगवेगळ्या स्वरूपात किंवा लोककथांमधून प्रचलित आहेत. आपल्याकडील वेगवेगळ्या लोककथांमधून या सर्व वीरांचे गुणगान केलेले आपल्याला पहायला मिळते. ज्या वीरांनी पराक्रम गाजवला तसेच आपल्या गावचे रक्षण केले त्या वीरांच्या समरणार्थ लोकांनी वीरगळ बनवले. साधू पुरुषांच्या समाध्या बनवल्या तसेच सती गेल्या स्त्री साठी सतीशिळा आणि तुळशी वृंदावन बनविले गेले हे सर्व उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या आठवणी आणि या आठवणीतून चालू पिढीला त्यापासून स्फूर्ती मिळणे हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश.
गुजरातच्या कच्छमध्ये इ.स. 2 ऱ्या शतकात 'क्षत्रप' राजे राज्य करीत होते. 'क्षत्रप' हे मध्य आशिया मधून भारतात आले होते तेव्हा हे क्षत्रप लोकं मृतांच्या स्मृतिसाठी एक स्तंभ उभारीत असत त्यास 'गोत्रशैलिका' असे म्हणत असत. राजस्थान मध्ये यौधेय नावाची जमात होती. राजस्थान मध्ये लोकांना कायम परचक्रांना तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे राजस्थान मध्ये वीरांना सतत युद्धाचा प्रसंग येत असे. राजस्थान मधील भिल्ल, मीन या आदिवासी जमातीमध्ये दहन झाले असेल तर त्या ठिकाणी स्तंभ उभारतात आणि त्याच्यावर छत्री उभारतात. छत्री ही राजस्थानची कला आहे ती पुढे माळव्यात आली आणि माळव्यातून महाराष्ट्रात आलेली आपल्याला पाहायला मिळते.
राजस्थान मध्ये पूर्वी छत्रीच्या आधी वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवळी म्हणजेच देऊळ बांधीत असत. राजस्थान मध्ये 12 व्या ते 13 व्या शतकापासून देवळीचे अवशेष आजही आपल्याला सापडतात. या देवळीवर योध्याचे घोड्यावरचे चित्र तसेच त्याच्यासमोर हात जोडलेले त्याचे अनुयायी दाखवलेले असतात. तसेच त्याच्याखाली दोन पट्टीका असतात त्यामध्ये अप्सरा या जास्त शृंगारिक असतात आणि त्यांच्या हातामध्ये बासरी, मृदुंग अशी वाद्ये दाखवली आहेत तसेच या अप्सरा आपल्याला साडी नेसलेल्या दाखवल्या जातात हा अप्सरांचा पेहेराव महाराष्ट्राशी मिळता जुळता असून आपल्याला यातून संस्कृतीचे लागेबांधे दिसून येतात.
भासाच्या प्रतिमा या नाटकामध्ये प्रतिमामंदिर याअर्थाने 'देवकुल' हा शब्द आलेला आपल्याला दिसतो. नाटकामध्ये भरत देवकुलिकाला भेटतो तेव्हा देवकुलिक भरताला सांगतो की हे पूजस्थान नसून हे प्रतिमामंदिर आहे. त्या प्रतिमा मंदिराच्या शेवटी जो पुतळा असतो तो दशरथाचा असतो. दशरथाच्या पुतळ्यावरून भारतास आपला पिता मृत झाल्याचे समजते. यावरून देखील आपल्याला स्मारकांबद्दल समजायला मदत होते. कुशाण काळामध्ये मथुरेजवळ माट गावामध्ये कुशाण राजांच्या स्मरणार्थ देवकुले उभारली होती तसेच वीरांच्या स्मारकाचा आणखी एक महत्वाचा पुरावा हा गुप्तकाळा मध्ये वीरांच्या स्मरणार्थ, गुरूंच्या स्मरणार्थ शिवलिंगे स्थापन करण्याची प्रथा सुरू झालेली दिसते. गुरूच्या स्मरणार्थ बांधलेल्या किंवा उभारलेल्या शिवमंदिरास 'गुर्वायतन' असे म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये इ.स. 5 व्या शतकामध्ये बदामी चालुक्य वंश राज्य करीत होता. या कुळामध्ये द्वितीय विक्रमादित्य राजा राज्य करीत होता. या राजाने हैहय कुळातील राजकन्यांशी विवाह केला त्यांची नावे लोकमहादेवी आणि त्रैलोक्यमहादेवी. या लोकमहादेवी राणीने आपल्या पतीच्या निधनानंतर कर्नाटकमध्ये पट्टदकल याठिकाणी पतीच्या स्मृत्यर्थ सुप्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर बांधले आणि त्याकाळातील सर्वोत्तम कलेचा नमुना उभारला. वीराच्या स्मृत्यर्थ शिवमंदिर किंवा शिवलिंग उभारण्याची कल्पना लोकप्रिय झालेली आपल्याला दिसते.
सातवाहन काळामध्ये नाणेघाट येथे प्रतिमागृहाची निर्मिती झाली येथे एकूण आठ प्रतिमा होत्या ज्या आता संपूर्ण नष्ट झाल्या आहेत त्यामध्ये सिमुक सातवाहन, नागणिका, श्रीसातकर्णी यांची नावे आणि मूर्ती होत्या. वर पाहिल्याप्रमाणे ही स्मारके व्यक्तीच्या निधनानंतर उभारण्याची प्रथा होती हे भासाच्या प्रतिमा नाटकावरून आपल्याला समजते. नागार्जुनकोंडा येथे देखील प्रतिमालेख मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी येथे रुप्पीअम्माचा छायास्तंभ मिळाला असून तो सध्या नागपूर येथील संग्रहालयात आहे. वसिष्ठीपुत्र पुळूमावी याने आपल्या पट्टराणीच्या स्मरणार्थ छायास्तंभ उभारला होता. या छायास्तंभावर संबंधित व्यक्तीची प्रतिकृती देखील कोरली जात असे. या प्रकारच्या स्तंभाना 'यष्टी' असे म्हणतात. यष्टीचा जो कोणी नाश करेल त्याला दंडाची शिक्षा केली जाईल अशी शिक्षा 'मनुस्मृती' मध्ये सांगितली आहे.
पूर्वीच्या बहावलपूर संस्थानात सुईविहार या गावी कनिष्ककाळात (इ.स.139) सापडलेल्या ताम्रलेखात भिक्षु नागदत्त याच्या स्मरणार्थ एक 'यठी' उभारल्याचा देखील उल्लेख मिळतो या शब्दामुळे भिक्षुच्या हातातील दंड सूचित होत असून वरील उल्लेख त्याला भिक्षुपद मिळाल्याचा किंवा त्याच्या मृत्यूनंतर ते संपुष्टात आल्याचा त्या शब्दातून अर्थ कळतो. श्रीधरवर्मन याचा मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात एरण येथे असलेला स्तंभलेख हा स्मृतिलेख असून श्रीधरवर्मन याचा सेनापती सत्यनाग याने एरण येथे धारातीर्थी पडलेल्या सेनेच्या स्मरणार्थ हा स्तंभलेख उभारला.
धारातीर्थी मरण पावलेल्या विराची स्मारकशिळा म्हणजे वीरगळ. हा शब्द सामासिक असून तो वीर आणि कल्लू(शिळा, दगड) यांच्या जोडाने बनला आहे. मराठी भाषेने हा शब्द कन्नड भाषेतून घेतलेला आपल्याला दिसतो. वीरगळ किंवा वीरशिळा कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्या तरी अशा स्मारकशिळा या भारतात सापडतात. महाराष्ट्रात स्मारकशिलांची प्रथा जरी जुनी असली तरी त्या शिलांना मिळालेले वीरगळ हे नाव मूळ कन्नड आहे. गुजरातमध्ये या शिलांना 'पालिया' असे म्हणतात.
पूर्वज किंवा मृत योध्यांच्या स्मारकशिळा उभारण्याची पद्धत भारतात सर्वत्र आढळून येते असे असले तरी पश्चिम भारतात आणि त्यातही मुख्यत्वे राजस्थान, गुजरात, माळवा या भागात ती मोठ्या प्रमाणात रूढ होती. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या स्मारकशिळा वीरगळ म्हणतात. बऱ्याचदा वीरयोध्याबरोबर सहगमन करणाऱ्या सतीच्या स्मरणार्थ सतीशिळा देखील उभारल्या जात असे. यामध्ये सतीचा हात किंवा काही ठिकाणी तिची प्रतिमा कोरलेली असते. आळंदी येथे एक सती शिळा होती ज्याच्यावर लेख होता. असे लेख फार कमी सापडतात. सतीचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये येतो तो पुढीलप्रमाणे:-
वोखटे मरणा ऐसे । तेंही आलें अग्निप्रवेशे ।
परि प्राणेश्वरा दोसे । न गणी सती ।।
कां महासतीयेचे भोग । देखे किर आघवे जग ।
परि ते आगी ना आंग । ना लोकू देखे ।।
'स्मृतिस्थळा' मध्ये रामदेवराव यादवाची राणी कामाईसे ही त्याच्या मृत्यूनंतर सती गेल्याचे नव्हे तर 'बळाधिकाराने' तिला सती जाण्यास भाग पाडले ह्याचे स्पष्ट उल्लेख स्मृतिस्थळा या ग्रंथात आहेत यावरून सतीची चाल यादव काळात रूढ दिसते.
विरगळावर कोरीवकाम करायची सर्वसाधारण एक पद्धत ठरलेली पाहायला मिळते. चौकोनी स्तंभाच्या आकाराच्या विरगळावर मृताशी संबंधित देवदेवतांची चित्रे कोरलेली असतात उदाहरणार्थ काही वेळेस गणपती देखील कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. तसेच सपाट शिळेवर एखादी इष्टदेवता कोरण्याची पद्धत आपल्याला दिसते. वीरगळ शिळेवर कोरलेला प्रसंग अनुक्रमे तीन व चार चौकोनात विभागलेला असतो. तळाच्या चौकोनातील वरण्यविषय (Vanyavishay) म्हणजे वीरांचे युद्ध आणि त्याचा मृत्यू मधल्या चौकटीत वीर स्वर्गारोहण करीत आहे हे दृश्य कोरलेले असते तर वरील चौकटीत वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्य दगडावर चित्रित केलेली असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर वीरगळ म्हणजे वीर पुरुषाचा एक संक्षिप्त चित्रपट असतो. लिखित स्वरूपात म्हणजे ज्याच्यावर लेख कोरलेला आहे असा वीरगळ फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
छत्री, वीरगळ ही सर्व वीरांची स्मारके आहेत. यामधून आपल्याला आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे
स्मरण होत असते यासाठीच आपल्याला या स्मारकशिळा कायम स्फूर्ती देत असतात. या स्मारक शिलांच्या वेगवेगळ्या आकारामुळे आणि कोरलेल्या शिल्पचित्रणाद्वारे तत्कालीन सामाजिक रूढी, कल्पना, पोशाख, धर्मकल्पना इत्यादी गोष्टी समजण्यास नक्कीच मदत होते.
संदर्भ ग्रंथ:-
1) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो.तुळपुळे
2) महाराष्ट्रातील वीरगळ:- सदाशिव टेटविलकर
3) वीरगळ, छत्री यांचे महात्म्य:- डॉ. शोभना गोखले
4) विखुरलेल्या ईतिहास खुणा:- सदाशिव टेटविलकर
5) इतिहास खंड- लौकिक स्थापत्य:- डॉ. अरुणचंद्र पाठक पाठक
No comments:
Post a Comment