पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
छ्त्रपती
शिवाजी महाराजांनी जमीन महसुलाबद्दल अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या.
महाराजांनी स्वराज्यातील महसूल व्यवस्थेला युद्धाइतकेच महत्व दिले होते.
त्यासाठी उत्कृष्ट कार्यालये आणि कर्तबगार महसुली अधिकाऱ्यांना योग्य तो
मानमरातब दिला गेला.
स्वराज्यामध्ये
कोणत्याही जमिनीचा सारा निश्चित करण्यापूर्वी जमिनीची मोजणी करणे आवश्यक
होते. त्यामुळे महाराजांनी आपल्या मुलखात असलेल्या जमिनीची मोजणी करून
जमिनीची प्रतवारी निश्चित केली. त्यांनी स्वतः जमीन मोजणीची पद्धत सुरू
केली होती. तिला 'शिवशाही काठी' असे म्हणत.
महाराजांच्या दूरदर्शी महसूल कर प्रणालीतील पहिला टप्पा 'बिघावणी करणे' हा होता. 'बिघावणी' या शब्दात 'बिघा' हा
शब्द आहे. म्हणजे शेतकऱ्याची जमीन किती बिघा किंवा किती एकर आहे, हे
ठरविणे होय. हे प्रमाण ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे मापक तयार केले
होते, त्याचे नाव 'शिवशाही काठी' असे होते.
थोडक्यात लागवडीखालील जमिनीची प्रथम मोजणी आणि मापन करणे म्हणजे बिघावणी होय!
आता ही काठीवजा पट्टी किती लांबीची होती, ते पाहू.
शिवशाही काठीच्या लांबीबाबत सभासद बखरीत म्हटले आहे,
"पांच
हात पांच मुठीची काठी, हात चवदा तसूच असावा. हात व मुठी मिळून ब्याऐंशी
तसूंची लांबी काठीची. वीस काठ्या औरस चौरस त्याचा बिघा एक. बिघे एकशेवीस
यांचा एक चावर. अशी जमीन मोजून, आकारून गांवची गावं चौकशी केली."
पाच हात, पाच मुठी = १ शिवशाही काठी (ही कठीची लांबी होय.)एक हात =१४ तसू + मूठ मिळून ब्याऐंशी तसू = एक काठीआता अशा वीस काठ्या औरस चौरस म्हणजे २० काठी × २० काठी= एक बिघा१२० बिघे= १ चावर
याप्रमाणे
जमिनी मोजून संपूर्ण गावे त्यावेळी सचिव (सुरनीस) 'अण्णाजी दत्तो' यांनी
मोजून घेतली होती. त्यांनी जमिनीची मोजणी करून पिकाऊ/लागवडी उपयुक्त
जमिनींच्या सीमा निश्चित केल्या. तसेच नकाशेही तयार केले. या जमिनी
ज्यांच्या ताब्यात असत, अशा लोकांची यादी बनवली जात असे. या यादीला ‘कुळझाडा’ असे म्हणत.
जमिनीची
वर्गवारी केल्यानंतर मूल्यमापन होऊन ती जमीन बागायती आहे की, जिराइत आहे
याचाही विचार केला जात असे. यावरून एखाद्या गावात अमुक एवढी जमीन आपल्याला
पिकवायला उपलब्ध आहे, याची कल्पना त्या भागातील सारा वसुली अधिकाऱ्यास
मिळत असे. जमिनीचा सारा भरण्याच्या बाबतीत संपूर्ण गाव सरकारला
सामूहिकरीत्या जबाबदार राहात असे. जमिनीचा २/५ भाग सरकारात भरावा लागेल
आणि ३/५ भाग रयतेकडे राहील, अशी व्यवस्था होती.
कोकणात शिवशाही काठीला 'पांड' असे म्हणत. आजही महाराष्ट्रात जमिनीच्या सर्वात लहान तुकड्याला 'पांड'
म्हणण्याची पद्धत प्रचलित आहे. कोकणातील जमीन ही डोंगर उताराची असल्यामुळे
डोंगर, ताली (बॉर्डर), उतार आणि वळणे ह्या गोष्टी विचारात घेऊन छ्त्रपती
शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी आणि डोंगराळ भागातील बिगर मैदानी जमीन
मोजण्याचे वरील प्रमाण थोडे जास्त धरल्याचे दिसते.
एक बिघा = २०×२० काठ्या ऐवजी २३×२३ काठ्या.
आता
ह्या तीन जास्तीच्या काठ्या ह्यासाठी की तालीसाठी वापरली जाणारी जमीन; जी
दगडांची भिंतच असते, ती उत्पादक जमीन (Productive land) म्हणून पकडली तर
विनाकारण शेतकऱ्यावर कराचा भार पडू नये.
शिवकाळात
जमीन मोजण्याचे काम महाराकडे असे. कारण त्यांच्याकडे वतनी जमिनी असत आणि
त्याचा शेती आणि त्याची उत्पादकता यांच्याशी खूप जवळचा संबंध असे. दुसरे
महत्वाचे कारण म्हणजे महार ही जात शिवाजी महाराजांच्या विश्वासास १०० टक्के
पात्र जात होती.
मोजणी
करताना जर काही कमी-जास्त झाले तर त्याचे दोन्ही बाजूने नुकसान होत असे.
म्हणजे उत्पादक जमीन जास्त दाखवली गेली तर शेतकऱ्याला जास्तीच्या कराचा
बोजा/भुर्दंड अन् उत्पादक जमीन कमी दाखवली गेली तर सरकारचा तोटा होत असे.
त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये आणि राज्याच्या महसुलाची हानी होऊ नये,
अशा दोन्ही खबरदाऱ्या महाराजांनी घेतल्या होत्या.
याचे
दुसरे कारण असे होते की, स्वराज्यातील जमिनीची मोजणी दरवर्षी केली जात
नसे. कारण एवढे किचकट आणि वेळकाढू काम दरवर्षी करणे शक्य नव्हते. परंतु
एखाद्या शेतकऱ्याने तक्रार केली तर त्याच्या जमिनीची मोजणी पुन्हा केली
जावी, अशी व्यवस्था होती.
महाराच्या हातात असलेल्या काठीला 'चलती काठी'
असे म्हणत. एक काठी जमीन मोजून झाली की दुसरी काठी टाकताना ही काठी उडी
घेत असे. त्यामुळे साहजिकच बिघ्यातील एकंदर क्षेत्रफळ प्रत्यक्षात वाढत
असे. या कारणाने प्रत्येक ठिकाणी एकच बिघ्यात सारखीच जमीन असेल, असे म्हणता
येणार नाही. जमीन मोजणीच्या या पद्धतीला 'बिघावणी' खेरीज 'चावराणा' किंवा 'चकबंदी' असेही म्हणतात.
संदर्भ:-
१. मराठी विश्वकोश
२. शिवकालीन महाराष्ट्र- डॉ. अ. रा. कुलकर्णी
३. शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र- प्रा. नामदेवराव जाधव
No comments:
Post a Comment