विठ्ठल सुंदर परशरामी
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणा.
याचे वडील सुंदर नारायण परशरामी संगमनेरचे ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. हा मुळात पेशव्यांच्या दरबारी काम करायचा पण एकदा याचा नानासाहेब पेशव्यांनी अपमान केला तेव्हा हा चिडून पेशवाईचा सूड उगवण्याच्या हेतूने निजामाकडे गेला व रामदासपंत नामक व्यक्तीच्या वशिल्याने त्याच्या सेवेत लिन झाला.
१७६२ मध्ये निजामाच्या दरबारी सत्तापालट झाला व विद्यमान निजाम सलाबतजंगाला कैद करून निजामअली गादीवर बसला , तेव्हा त्यानेच विठ्ठल सुंदरला दिवाण बनविले. याला राजाबहादूर प्रतापवंत हा किताबदेखील मिळाला होता.
साताऱ्याच्या छत्रपती रामराजे महाराज व पेशव्यांना बरखास्त करत नागपूरकर जानोजी भोसले यांना छत्रपती करून त्यांच्या नावे कारभार चालावा या हेतूने याने अनेक कारस्थानं केलीत.
यातच श्रीमंत पेशवे माधवराव व त्यांचे चुलते राघोबादादा यांच्यातील बेबनावाचा फायदा घेत याने एकेक करत मराठी कारभारी , दरबारी , सरदार फोडायला सुरुवात केली.
पहिले दिवाकर उर्फ देवाजीपंत चोरघडे (साडेतीन पैकी एक पूर्ण शहाणा) या नागपूरकर भोसल्यांच्या दिवाणाच्या मदतीने याने जानोजी भोसले फितविले , आपल्या व्याही व साताऱ्याच्या मुतालिक गमाजीपंत याच्या मदतीने भवानराव प्रतिनिधीस फोडले , नंतर एकेक करत मोरेश्वर बाबुराव उर्फ मोरोबा फडणवीस , गोपाळराव पटवर्धन , सदाशिव रामचंद्र शेणवी यासारख्या मातब्बर मंडळीच काय तर खुद्द माधवराव पेशव्यांचेच मामा मल्हार भिकाजी रास्तेदेखील याच्या पट्टीत आले.
यांच्याच मदतीने याच्या सांगण्यावरून माधवराव पेशवे दक्षिण मोहिमेत असताना याने मे १७६३ मध्ये निजामास भडकवून त्याच्याकडून पुणे लुटून घेतले व राक्षसभुवनच्या लढाईस तोंड फुटले.
पुढे जानोजीदेखील डोईजड होऊ नये म्हणून याने कोल्हापूरकर भोसल्यांशीपण संधान साधण्याचे प्रयत्न केले व यातच राघोबादादाने मोठा मुलूख देऊन व द्रव्य खर्च करून नागपूरकर जानोजी भोसल्यांना पुन्हा आपल्याकडे वळविले.
यानंतर पेशवे व निजामामध्ये औरंगाबादजवळ राक्षसभुवन येथे युद्ध झाले व याच युद्धात ऑगस्ट १७६३ मध्ये हा शहाणा विठ्ठल सुंदर परशरामी कसब्याच्या देशमुख महादजी शितोळेच्या हातून मारला जाऊन पेशव्यांची निजामावर सरशी झाली.
याची जहागिरी गणेश नावाने ओळखली जायची. नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिर यानेच बांधले होते.
No comments:
Post a Comment