विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 August 2022

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……भाग ४

 

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ

भाग ४
व्यंकटरावांचा जन्म
नारोपंतांनी केलेल्या कामगिरीमुळे सेनापती कडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरे, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी, शिपुर ही खेडी इनाम म्हणून मिळवली. आजरे येथील एक तर्फी खेड्याची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखी ची वहिवाट सेनापती कडून नारोपंतांना होती. हे सारे उत्पन्न वर्षाला ३० ते ४० हजारांवर होते. नारोपंत यांना संतान नसल्यामुळे पत्नी लक्ष्मीबाई निराश होत्या. संतान होण्याची आशा खुंटल्यामुळे नारोपंतांनी स्वगोत्रांपैकी नरसिंग राव नावाच्या मुलाला जवळ केले. मुलगा जवळ असतानाही लक्ष्मीबाईंचे नवस सुरू होते. पटवर्धन जहागीरदार यांचे मुळपुरुष हरभटजी बाबा हे त्यावेळी कोकण सोडून रहावयास घाटावर आले होते. लक्ष्मीबाईंना बाबांनी गिरीच्या व्यंकटेशाची उपासना कर म्हणजे तुला पुत्र होईल असे सांगितले. त्याप्रमाणे उपासना केल्यानंतर १७०२ मध्ये नारोपंत यांना पुत्र झाला. त्याचे नाव व्यंकटराव ठेवण्यात आले. हाच व्यंकटराव पुढे अत्यंत पराक्रमी झाला आणि त्याच्या पराक्रमाने इचलकरंजी संस्थानाचा नावलौकिक प्राप्त झाला. नारोपंतना म्हापण गाव इनाम
संताजी यांनी नारोपंत यांना आपले पुत्र मानले होते. छत्रपतीकडून मिळालेल्या मिरज प्रांताच्या देशमुखी सरदेशमुखी वहिवाट त्यांना दिली होती. शिवाय इचलकरंजी ,आजरे ही गावे नारोपंत यांना देण्यात आली होती. नारोपंत यांचा जन्म ज्या कोकणात झाला ते म्हापण गाव वाडीकर सावंत यांच्या ताब्यात होते.रामचंद्र्पंत अमात्य यांनी एकदा सावंतवाडी संस्थानावर स्वारी करून त्यास वेढा घातला होता. तेंव्हा त्या फौज मध्ये मुख्य सरदार नारोपंत होते. त्यांनी यावेळी तह घडवून आणून वादी संस्थानाचा बचाव केला म्हणून वाडीकर सावंतांनी कृतज्ञ होऊन नारोपंताना त्यांचे मूळ म्हापण गाव इनाम दिले होते.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....