विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 August 2022

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……भाग ५

 

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ


भाग ५
इचलकरंजी संस्थानचे नारोपंत यांचे निधन आणि व्यंकटरावांचा उदयकाळ……..
इचलकरंजी संस्थानचे नारोपंत यांची कामगिरी अधिक सरस ठरत होती.नारोपंत यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी त्याचे नाव व्यंकटराव ठेवले. त्याची 1710 मध्ये त्यांनी मुंज केली. सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्र्यंबक कुरुंदवाडकर यांचे दिवाण म्हणून व्यंकटराव यांची नेमणूक करण्यात आली. तर्फ आजरे येथील देशमुखी बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांच्या वाटणीत गेली होती.परंतु हे वतन सांभाळण्यास कोणी पात्र व्यक्ती नसल्यामुळे त्यांनी नारोपंत यांना हे वतन इनाम दिले. 1711 मध्ये करवीरच्या राज्य मंडळाचे सचिवपदही रिकामी होते. या रिकाम्या पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली. दुसरीकडे वडिलांच्या कारभारात साथ देणारे व्यंकटराव सर्व व्याप सांभाळण्यास सक्षम बनले होते. याच वेळी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू झाला.श्रीवर्धनचे देशमुख बाळाजी विश्वनाथ भट हे कोकण सोडून राजाराम महाराज यांच्या कारकीर्द मध्ये घाटावर आले होते. शाहू महाराजांकडे सेनाकर्ते म्हणून श्रीवर्धनचे देशमुख बाळाजी विश्वनाथ भट काम करीत होते. बाळाजीना चार अपत्ये होती. त्यापैकी अनुबाई सहा-सात वर्षांच्या झाल्यानंतर बाळाजीपंत त्यांच्यासाठी योग्य वर शोधत होते. नारो महादेव यांचे पुत्र व्यंकटराव यांचे लग्न व्हायचे होते. उपाध्ये हरभटजीबाबा यांच्या मध्यस्थाने नारोपंत यांचे पुत्र व्यंकटराव यांच्याशी अनुबाई यांचा 1713 मध्ये सातारा मुक्कामी विवाह झाला. या विवाहामुळे पेशव्यांचे घराणे आणि इचलकरंजीकरांचे नाते संबंध जोडले गेले. यामुळे इचलकरंजी संस्थान अनेक संकटातून वाचले आणि उकर्ष झाले. करवीर राज्य मंडळाच्या पक्ष अधिक प्रभाव करावा म्हणून कापशीकर व त्यांचे कारभारी नारो महादेव यांना रामचंद्रपंतानी पूर्णपणे अनुकूल करून घेतले होते. रामचंद्रपंत यांच्याकडे करवीरकरांचा मोठा व्यवहार होता. नारो महादेव यांच्या हातून करवीर राज्याच्या कामकाजासंबंधी पुष्कळ उलाढाली होत असत. सेनापतींची व त्यांची स्वतःची फौज त्यांच्याजवळ नेहमी तयार असल्याने संकटाच्या वेळी शेजारचे संस्थानिक व जमीनदार त्यांची मदत मागत. हुक्केरी परगण्याचे शिदाप्पा निंबाळकर सरनाईक होते.त्यांना त्यांच्या संकटाच्या कालावधीत नारोपंत यांनी सहकार्य केल्यामुळे शिदाप्पा यांनी नारोपंत यांना शिपूर गाव इनाम दिले. प्रांत हूक्केरी येथील देसाई व नाडगोंडे लखमगोंडा बसव प्रभू यांनीही त्यांच्या वेळेला धावून गेल्यामुळे कृतज्ञतापूर्वक नारोपंतांना जागनूरची पाटीलकी व बहिरेवाडी गाव इनाम दिले. अशाप्रकारे इचलकरंजी संस्थानाचा विस्तार वाढू लागला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...