पोस्तसांभार :: dr. satish kadam
ग्वाल्हेरमधील शिंदे संस्थानात आंग्रे, शितोळे, जाधव, आगवाणे, कदम याप्रमाणे जवळपास चोवीसएक मराठा सरदार होते. महादजींच्यारूपाने उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला. शिंदे मुळचे सातारजवळील कण्हेरखेडचे. मुलूखगिरीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला गेलेतरी कुलदैवत असो की विवाहसंबंध महाराष्ट्राची नाळ कायम ठेवत अख्खी मराठी मंडळी ग्वाल्हेरला आणून स्वराज्यवृद्धी केली. इतर सरदाराबरोबरच कदम नावाची दोन घरे शिंदेंच्या इतिहासात मोठे योगदान देऊन गेली. त्यापैकी एकाला डंकेवाले तर दुसर्यादला हत्तीवाले म्हणून ओळखले गेले. वास्तविक पाहता कदम घराण्याचा हा फार मोठा सन्मान आहे.
डंकेवाले कदमांचे मुळ पुरुष कोरेगाव तालुक्यातील साप गावचे सरदार इंद्रोजी कदम असून ते महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहुंचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांनी अनेक मोहिमेत भाग घेतलेला होता. पुण्यातील हुजूरपागा त्यांच्या घोडदलाची जागा असून पटवर्धन त्याची व्यवस्था पहात होते. महाराष्ट्रात सर्वात सुंदर असलेल्या सापमधील इंद्रोजींच्या गढीत तानाजी, फत्तेशिकनसह सर्व ऐतिहासिक मालिकांचे चित्रीकरण होते. इंद्रोजींचे पुढील वारसदार यादवराव आणि त्यानंतर ग्वाल्हेरमध्ये ज्यांनी इतिहास निर्माण केला ते कृष्णराव कदम हे महादजी शिंदेचे पुत्र दौलतराव आणि बायजाबाई यांचे दत्तकपुत्र महाराजा जनकोजीराव शिंदेंचे मामा असून जनकोजीरावांचे लवकर निधन झाल्याने कृष्णराव कारभारात मदत करण्यासाठी ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरच्या इतिहासात ते मामासाहेब नावाने प्रसिद्ध पावले. जनकोजींच्या पत्नीने दत्तक घेतलेले जयाजीराव अल्पवयीन असल्याने इंग्रजांनी मामासाहेबांना ग्वाल्हेरचे गव्हर्नर नेमले. अल्पवयीन वारसदार आणि इंग्रजांचा दबाव अंगावर घेत मामासाहेबांनी शिंदेची गादी मोठ्या खुबीने पुढे नेली. पुढे जयाजीरावांना मामासाहेबांची कन्या चिमणाराजे दिल्याने त्यांचे वजन आणखी वाढले. त्यांच्यातील कर्तृत्वामुळेच त्यांना नगारानौबतीचा मान आणि ‘ मुज्जफरजंग बहादूर डंकेवाले’ हा किताब दिला. मामासाहेबांची स्वारी कुठेही गेलीतर नगारानौबत म्हणजेच डंका वाजवून त्यांचे स्वागत केले जायचे. डंक्याचा मान असणारे ते शिंदेशाहीतील एकमेव सरदार असल्याने त्यांना डंकेवाले कदम म्हणून ओळखले गेले. मामासाहेब ग्वाल्हेरला असलेतरी सापगावची नाळ कायम होती. जयाजीराव कारभारावर आल्यानंतर ते सापला परत आले. तोवर या घराण्याने ग्वाल्हेरमध्ये स्वत:चे साम्राज्य उभे केले होते. त्यानंतरचे वारसदार आप्पासाहेब, यादवराव, बलभीमराव यांनी शिंदेशाहीचे सरदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले. आजही मामसाहेबांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा म्हणून ग्वाल्हेरमध्ये मामा का बझार, आप्पासाहेबांच्या नावाने आप्पागंज, 27 एकरावरील मामा का वाडा या वास्तू एवढ्या विस्तीर्ण आहेत की, त्यात आजच्या महानगर पालिकेचे पाच वार्ड मोडतात. शिवाय 50 एकरावरील कदम साहिबका बगीचा, मामासाहब का ताल म्हणजे तलाव या ठळक बाबी पहायला मिळतात. स्वातंत्र्यानंतर कृष्णराव दुसरे त्यांची तीन मुले बलभीमराव, सिद्धेश्वरराव आणि प्रद्युम्नराव यांनी त्यांचा वारसा पुढे चालविला. सापगावातील पाटील देशमुखीचे सर्व मानसन्मान आजही या कदम घराण्याकडे असून तेथील ऐतिहासिक गढीमध्ये चालणार्याा सिनेमाच्या चित्रीकरणातून करोडोची उत्पन्नप्राप्ती होते. आजचे कर्तृत्वान वारसदार संग्रामसिंह, इंद्रोजीराव आणि विरुपाक्षराव असून संग्रामसिंह ग्वाल्हेरमधील मराठा हितचिंतक सभेचे अध्यक्ष आहेत. तर इंद्रोजीराव 150 खाटाचे सुसज्य रुग्णालय तसेच मोठ्या शैक्षणिक संस्था चालवितात. त्यांनी बांधलेली पाच राममंदिरे आजही सुस्थितीत आहेत.
त्यानंतर ग्वाल्हेरच्या शिंदे संस्थानात हाथीवाले म्हणून आणखी एक कदम घराणे आपल्या कर्तृत्वाने मोठ्या नावारूपाला पोहोचले. या घराण्याचे मुळ पुरुष भगवंतराव हे असून ते फलटण तालुक्यातील गिरवीचे रहिवाशी होते. पहिल्या बाजीरावाच्या कालखंडात त्यांनी उत्तरेकडील मोहिमेत मोठा पराक्रम गाजविला. त्यावेळी बाजीरावाने त्यांना बरवाई आणि एदलाबादची जहागिरी दिली. 1761 साली झालेल्या पानीपत युद्धात भगवंतरावांनी तलवार गाजवत देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे पानिपतच्या मैदानावरील हुतात्मा स्तंभावर सेनापती भगवंतराव कदमांचे नाव कोरले गेले. त्यानंतर चिरंजीव आप्पाजीराव महादजी शिंदेकडे गेले. वडीलाप्रमाणे पराक्रमी आप्पाजीरावांनी थोड्याच दिवसात आपला ठसा उमटविला. याशिवाय महादजी शिंदेंनी गुलाम कादिरच्या विरोधात काढलेल्या मोहिमेत आप्पारावांनी विशेष कामगिरी केल्याने या घराण्याला ‘खडी ताझिम’ हा किताब दिला. खडी ताझिम म्हणजे संबंधित सरदार दरबारात आल्यानंतर सर्व दरबार्यांेनी उठून उभे राहायचे असते. याशिवाय शिंदे घराण्याकडून त्यांना हत्ती आणि पालखीचा मान मिळाला.
शिंदे संस्थांनातील कुठल्याही समारंभप्रसंगी पहिला हत्ती व्हाईसरॉयचा, दुसरा महाराजा शिंदेंचा तर तिसरा हत्ती भगवंतराव कदम घराण्याचा असायचा. त्यामुळे गिरवीकर कदमांना हाथीवाले कदम नावाने ओळखले जाऊ लागले. अगदी कागदोपत्रीसुद्धा त्यांचे नाव हाथीवाले म्हणूनच दर्ज झाले. पुढे हाथीवाले घराण्यात प्रत्येक पुरुषांनी आपली तलवार गाजविली. आप्पाजीरावांचे 1800 साली उजैन याठिकाणी निधन झाले. त्यांचे पुढील वारसदार भगवंतराव दुसरे यांनी दौलतराव शिंदे यांच्यासोबत काम केले. त्यामुळे दौलतरावांनी त्यांना मध्यप्रदेशातील बलोंने आणि निमनवासा येथील जहागिरी दिली. त्यानंतरचे वारसदार रामराव हेसुद्धा मोठे पराक्रमी निपजले. अशाच एका मोहिमेत झाशीच्या किल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यामुळे त्याठिकाणी त्यांची छत्री म्हणजे समाधी बांधण्यात आलेली आहे. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई या मोठ्या धाडशी आणि धार्मिक वृत्तीच्या असून काशीमध्ये गंगा नदीवर भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी एक घाट बांधला. त्या घाटाला ‘ कदम घाट ‘ म्हणून ओळखले जाते.
हाथीवाले कदम घराण्याने प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन उत्तर भागाला मराठ्यांचे मनगट काय असते ते दाखविले. पेशवे आणि शिंदे अशा दोघांचा स्नेह त्यांच्यावर असल्याने त्यांना राजस्थानातील चिताखेडा, मध्यप्रदेशातील निमच, महाराष्ट्रातील जळगाव, मुक्ताईनगर,एदलाबाद इत्यादि अनेक ठिकाणच्या जहागिरी दिल्या होत्या. ग्वाल्हेरमध्ये 11 एकरावर हाथीवालेंचा भव्य वाडा होता. त्यांच्या ताफ्यात नेहमी पाच हत्ती असायचे. त्यामुळे वाड्याचा दरवाजा एवढा मोठा होता की, त्यातून अंबारीसह हत्ती आतमध्ये प्रवेश करू शकत होता. या वाड्याला कदमसाब का बाडा म्हटले जाते. आज वाड्याचा काही अंश शिल्लक असून त्या परिसराला कदमसाब का बाडा नावाने ओळखतात. या वाड्यात नगारखाना, हत्तीखाना, पागा, इमामबाडा म्हणजे मुस्लिम पिराचे स्वतंत्र स्थान होते. जनकगंज भाग हाथीवाल्याच्या पूर्वजावरूनच ओळखला जातो. पुण्यात लक्ष्मणराववगैरे यांचे वंशज राहतात.
काळ बदलत राहतो तशा गरजा बदलतात. कधीकाळी शिंदेशाहीला आधार द्यायला गेलेली मंडळी दोनचार पिढ्यांनंतर परततर येऊ शकत नाही. त्यामुळे आजही ग्वाल्हेरमध्ये गेलाततर आपणास इंगळे, सुरवसे, फाळके, चव्हाण अशी अनेक मराठी नावे सापडतील. मागच्या दशकापर्यंत ग्वाल्हेरला मराठी शाळा होत्या. आता परिस्थिती बदलायला लागलीय. बहुतेकांनी महाराष्ट्रातल्या सोयरिकी करून मराठीपण जपण्याचा प्रयत्न केला. अर्थकारण बदलायला लागलं तसं पुन्हा स्थलांतर सुरू झाले. त्यामानाने डंकेवाले कदमांची परिस्थिती उत्तम आहे. मात्र हाथीवाले बहुतेक बाहेर पडले. पुरस्काररुपी आडनावाला आज वेगळ्याच नजरेने पाहिले जात असल्याने त्यांनी पुन्हा मुळचे कदम नाव स्वीकारले आहे. कदमांनी दुरदेशी वाजविलेला डंका मराठ्यांच्या मनात हत्तीचं बळ आणणारा आहे. म्हणून डंकेवाले हो या हाथीवाले, उन्हे पढनेवाले मात्र दिलवाले चाहिए. dr. satish kadam, आगामी " गाळीव इतिहास भाग 1 " या पुस्तकातून
No comments:
Post a Comment