( पुण्यनगरी All Edition मध्ये गाजलेला लेख ) 7/9/2022
© शिवरायांचे चुलते शरिफजीराजे भोसले
पोस्तसांभार :: © डॉ. सतीश कदम, 9422650044
मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याचे योगदान महत्वाचे असून आपणाला त्यातील काही ठराविक महापुरुषांचाच इतिहास माहीत असतो. मात्र या घराण्यात अनेकांनी आपल्या प्रणाची आहुती देऊन महाराष्ट्र धर्म, मराठी संस्कृति टिकवून ठेवलेली आहे. शिवरायांचे दोन्ही आजोबा मालोजीराजे व लखुजी जाधवराव, थोरले भाऊ संभाजी, चुलते शरिफजीराजे या घरच्या माणसाबरोबरच चुलत भाऊ, दोन मामा, मामांची मुले अशा जवळच्या अनेक नातलगांनी लढत लढत रणांगणावर आपले प्राण दिले. पैकी याठिकाणी शिवरायांचे चुलते शरिफजिराजेंच्या अप्रकाशित पैलूवर प्रकाश टाकणार आहोत.
भोसले घराण्यात बाबाजीराजे भोसले यांच्यापासून खर्यांअर्थाने राजकीय कारकिर्दीला सुरुवात होते. बाबाजींना मालोजी आणि विठोजी ही दोन मुले होती. विठोजीराजांना मुंगी पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, भांबोरे, वावी इत्यादि गावची जहागिरी होती. या घराण्याचा इतिहास हा स्वतंत्र विषय आहे.याठिकाणी आपणास मालोजीराजेंच्या घराण्याचा इतिहास पहायचा आहे. त्यानुसार मालोजीराजे नगरच्या निजामशाकडून लढत असताना इंदापूरच्या लढाईत मारले गेले. मालोजींना फलटणकर निंबाळकर घराण्यातील दीपाऊपासून शहाजी आणि शरिफजी ही दोन मुले झाली. शरिफजीराजेंचा जन्म इ.स. 1604 साली वेरुळ याठिकाणी झाला. दिपाबाईनी नगरच्या शहाशरीफ दर्ग्यास नवस केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाल्यावरून आपल्या मुलांना शहाजी आणि शरिफजी ही नावे दिल्याचे बहुतेकांनी सांगितलेले आहे. परंतु 1327 च्या कराडच्या एका दानपत्रात शहाजी तर 1587 च्या कागदपत्रात भोसले घराण्यातच शरिफजी अशी नावे आढळून येतात. यावरून भोसले घराण्यात शहाजी आणि शरिफजी ही नावे अगोदपासूनच ठेवली जात असल्याचे दिसून येते. याशिवाय शहाशरिफ हे एकाच मुस्लिम महापुरुषाचे नाव असूनही ते दोन मुलांना स्वतंत्रपणे का देण्यात आले? तसेच शहाशरीफ यांचा जन्मच मुळी 1523 दरम्यानचा असून त्याएगोदर भोसले घराण्यात शहाजी आणि शरिफजी ही नावे प्रचलित असल्याचे दिसून येते. म्हणूनच वा. सी. बेंद्रे यांनीही एका दर्ग्यावरून ही नावे ठेवण्यात आल्याच्या कथेला असहमती दर्शविलेली आहे. अहमदनगर गावालगत शहाशरीफ नावाच्या मुस्लिम संताचा दर्गा आहे.
असो, मालोजीराजेंच्या अकाली निधनानंतर चुलता विठोजींनी शहाजी आणि शरिफजी या दोन मुलांचा सांभाळ केला. शरिफजीराजांचा विवाह शिवनेरीचे किल्लेदार घराणे विजयराज विश्वासरायांच्या कन्या दुर्गाबाई यांच्यासोबत झाला होता. शिवरायांच्या थोरल्या भावजयी संभाजीराजेंच्या पत्नी जयंतीबाईसुद्धा याच घराण्यातील होत्या. शरिफजिराजांची स्वत:ची दीड हजाराची फौज असून ते काहीकाळ मोगलांच्या सेवेत होते. पुढे शहाजीराजेंसोबत नगरच्या निजामशाहीत असताना त्यांना खानवटबरोबरच राशिन, पांडे पेडगाव, केळगाव इत्यादि ठिकाणच्या पाटीलकीपण मिळालेल्या होत्या. शरीफजीराजेंची कारकीर्द अत्यल्प असून ते आपल्या बलिदानाने अजरामर ठरले आहेत.
© त्यानुसार शके 1546, कार्तिक वद्य अमावस्या म्हणजेच 24 आक्टोबर 1624 यादिवशी मोगल आणि आदिलशाही फौजांनी एकत्रितपणे निजामशाहीवर आक्रमण करण्याकरिता नगरजवळील भातोडी गावी तलावाच्या खालच्याबाजूला मुक्काम ठोकला असता निजामशाहीचा वजीर मलिकअंबरच्या नेतृत्वाखाली शहाजी आणि शरिफजीराजेंनी भातोडी गावाच्या वरच्या बाजूस असणारा तलाव फोडून टाकल्याने शत्रूची त्रेधात्रिपट उडाली. खरतर हा गनिमी काव्याचाच एक प्रकार असून शत्रूच्या सैन्यात मोठा गोंधळ उडाला. ज्यावेळी लढाई हाताघाईवर आली त्यावेळी शरिफजीराजेंनी अतुलनीय पराक्रम गाजवत मुख्य सेनापती मुल्ला मुहम्मद लारीला ठार केले तर फर्हाादखानाचा शिरच्छेद केला. यादरम्यान लढत असताना शरिफराजेंनाही वीरमरण आले. या युद्धाला इतिहासात अनन्यसाधारण महत्व असून याला भातोडीचे युद्ध म्हणतात. यावेळी त्यांच्यासोबत लखुजी जाधवराव, विठोजीराजेंची सात मुले इत्यादि आप्तगण होते. शिवरायांचे सख्खे चुलते असलेल्या शरिफजीराजेंच्या बलिदानाने भातोडीची भूमी पावन झाली. भातोडी गाव नगरपासून 25 30 किमीवर जामखेडच्या दिशेला आहे.
शरिफजींना महादजी आणि त्रिंबकजी अशी दोन मुले होती. पैकी त्रिंबकजी हे औरंगबाजेच्या फौजेत असताना त्यांचे वास्तव्य बरेच दिवस औरंगाबाद येथे असून तेथे त्यांची मोठी हवेली होती. त्यांनीच आपले जहागिरीचे ठिकाण असलेल्या कर्जत तालुक्यातील राशिनच्या माळावर औरंगपूरपेठ वसविली होती. तीच आजची यमाईदेवीपुढील मंगळवारपेठ. या मंगळवारपेठेत त्रिंबकजींचा भला मोठा वाडा, विहीर, बारव, बगीचा होता. मराठा सरदारांच्या बहुतेक समाध्या या मंदिर परिसरात बांधण्याची चाल असल्याने व शरिफजीसह सर्वजण देविभक्त असल्याने राशिनच्या देवीमंदिरालगत शरिफजीराजे, त्यांच्या पत्नी दुर्गाबाई आणि त्रिंबकजीराजेंच्या समाध्या आहेत.या समाध्याचे बांधकाम वेरुळमधील समाध्याच्या धर्तीवर झालेले आहे. पुढे भाऊसाहेब राजे भोसलेपर्यंत या घराण्याचे वास्तव्य राशिनला राहिले. राशिनमधून हे घराणे पुढे खानवटला स्थलांतरीत झाले. त्रिंबकजीचा मुलगा व्यंकटजीला संभाजी, माणकोजी ( खानवट शाखा ), शहाजी, तुकोजी, बाबाजी आणि शरीफजी ( बेळवंडी ) अशी सहा मुले झाली. त्यांच्या जिंती, खानवट, भांबोरे, सावर्डे, वावी इत्यादी शाखा झाल्या. शरिफजीराजेंचे वारस मोगलाकडे तर शहाजीराजे आदिलशाहीकडे गेले. शहाजीराजेंना शिवरायासारखे पुत्र लाभले म्हणून त्यांच्या घरात छत्रपतीसारखे पद मिळाले. मात्र शरिफराजेंच्या तीन वंशजांनीही पुढे कोल्हापूरचे छत्रपतीपद भूषविले. त्यानुसार खानवटशाखेतील माणकोजी हे दुसरे शिवाजी ( 1762 – 1813 ), सावर्डे शाखेतील नारायणराव हे चौथे शिवाजी (1871 – 1883 ) व चावरे शाखेतील प्रतापसिंह हे पाचवे शिवाजी नावाने करवीरचे छत्रपती झाले. यातील चौथ्या शिवाजीला दरबारी आणि इंग्रजांनी वेडा ठरवून हालहाल करून मारले. अहमदनगरला दिल्लीगेटजवळ त्यांची समाधी आहे.
एकत्रितपणे कुठेही निरंतर सत्ता नसल्याने शरिफजींचे वारसदार विविध भागात विभागले गेल्याने राशिनच्या समाधीची निगा नाही किंवा भातोडीत कुठलेही स्मारक वा समाधी नव्हती. याची उणीव भरून काढण्यासाठी भातोडीतील युवक एकत्रित येऊन भातोडीत छानशे समाधीवजा स्मारक उभे केले असून त्याची दररोज साफसफाई व पूजाअर्चा होत असते. याशिवाय दरवर्षी त्यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी करतात. भातोडी म्हणजे बाणाचा भाता असा त्याचा एक अर्थ असून आठशे वर्षापुर्वी ही एक वाडी होती. तेथे भातपुरे लिंगायत वाण्याची वस्ती होती. त्यांनी भातेश्वरनावाने लिंगाची स्थापना केल्याने गावाला भातेवाडी व पुढे भातोडी नाव पडले. गावात श्री नरसिंहाचे मंदिर आहे, त्यालाही प्राचीन इतिहास असून नवनाथापैकी बरेचजण येथे येऊन गेलेले आहेत.
© निजामशाहीत नगरजवळील भातोडी हे लष्करी ठाणे असून ते पुढेही कायम होते. निजामशाहीच्या काळात भातोडीत मोठी गढी होती. तर भातोडीतील ऐतिहासिक तलाव हा इ. स. 1565 ते 1588 च्यादरम्यान अहमदनगरच्या निजामाचा एक मंत्री सलाबतखान दूसरा याने मेहकर नदीवर बांधलेला आहे. पुढे 1892 ला इंग्रजांनी 6901 मजुरावर 50000 रुपये खर्चून याचे आधुनिकीकरण करून घेतलेले आहे. याशिवाय भातोडीजवळील वडगाव दौला गावाशेजारी कलावंतींनीचा महाल असून तेथे बुर्हाहन निजामशाहा नृत्य गायन आणि प्राण्याच्या झुंजी पाहायला येत असे. पेशव्यांच्या कालखंडात भातोडीला टांकसाळ असून त्यातून भातुडी, अंकुशी हे चलन तयार होत होते. ज्यांनी विधानसभेत नगरचे नेतृत्व केले ते प्रभाकर कोंडाजी भापकार आणि ज्यांनी लतादीदीबरोबर घन:शाम सुंदरा ही भुपाळी म्हटली ते पंडितराव नगरकर यांचा जन्मही भातोडी याचठिकाणी झालेला आहे. आज याच भातोडीत शिवरायांचे सख्खे चुलते शरिफजीराजे चिरशांती घेत आहेत.
No comments:
Post a Comment