पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
ग्वाल्हेरचे शिंदे घराणे
शिवविचारांचे पाईक असणार्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची राकट तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला मग भल्याभल्यांना अवघड गेलं. त्याचं कारण बाजीरावांनी संपूर्ण हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ.
हिंदवी स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे कालवश झालेले होते.
छत्रपती शाहू महाराजांचा अंमल नुकताच कुठे सुरू झालेला होता. 27 वर्षे
दक्षिणेत घालवून मराठ्यांचे स्वराज्य बरेचसे अस्थिर करूनही जिंकू न शकलेला
औरंगजेब मृत्यू पावल्याने तमाम मुघल सैन्य आणि शाहजादे दिल्लीला
तख्तप्राप्तीकरिता रवाना झालेले होते. कैदेत असलेल्या भावी छत्रपती शाहू
महाराजांची अटीशर्तींवर सुटका झालेली असली तरी त्यांच्या मातोश्री मात्र
अजूनही मुघलांच्या ताब्यात होत्या. शाहू महाराज स्वराज्यात परतल्याने
वारसाहक्काने कोणती गादी मानायची, याबाबत अनेकांच्या मनात
असलेला संभ्रम पूर्णपणे दूर झालेला नव्हता. कारण शिवपुत्र राजाराम महाराज
जरी वारंवार सांगत होते की, ही गादी सुटकेनंतर बालशाहूंना मिळावी परंतु
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराराणीने सक्षमपणे औरंगजेबाला 7
वर्षे तोंड देऊन युक्ती-प्रयुक्तीने स्वराज्य शर्थीने राखले होतेच. मात्र
यामुळेच त्या स्वराज्यसत्ता शाहूंकडे देण्यास राजी नव्हत्या. या
सार्यांमुळे परतलेल्या शाहू महाराजांनी सर्वात प्रथम अंतर्गत विरोध हर
उपायेकरून मोडून स्वतःचे स्वामित्व सिद्ध केले. तद्नंतर राज्यातील प्राप्त
परिस्थितीचे अवलोकन करून आधी बाळाजीपंत विश्वनाथ भट व त्यांच्यानंतर
त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव यांच्याकडे पंतप्रधान पेशवाईची
जबाबदारी सोपविली होती.
बाळाजी विश्वनाथ व आता बाजीरावराऊ स्वामी हे समर्थपणे शिवसैन्याचा डंका
उत्तरेकडे समशेरी रोखून धाडसाने आणि अजिंक्य विश्वासाने वाजवत होते. भले
भले सरदार, राजे-महाराजे, निजाम हे बाजीरावांची रणनीती ओळखण्यात चुकत होते,
फसत होते. बाजीरावांचा हा वादळी झंझावात रोखणे हे आता त्यांना जवळपास
अशक्यच वाटत होते. थोरल्या बाजीरावांनी दूरदृष्टीने एकएक करीत आपले बलवत्तर
मोहरे हिंदुस्थानच्या राजकीय पटावर ठेवायला सुरुवातही केली. यांच्यापैकी
एक तालेवार घराणे
होते शिंदे यांचे. या घराण्याचे संस्थापक पुरुष होते राणोजीराव शिंदे. हे
शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील सातार्याजवळील कण्हेरखेडा येथील पाटील.
राणोजीरावांचे अतिशय विश्वासू असे वर्तन बघून बाजीरावांनी त्यांना छत्रपती
शाहू महाराजांच्या वतीने चौथाईच्या (उत्पन्नाच्या 25% देय कर) वसुलीसाठी
समृद्ध अशा माळवा प्रांतात नामजाद केले, नियुक्त केले व सरदेशमुखीचे हक्कही
प्रदान केले. राणोजीरावांनी आता मध्य हिंदुस्थानात उज्जैन येथे आपले
बस्तान बसवले व कालांतराने तेच शिंदे संस्थानिकांचे राजधानीचे ठिकाण म्हणून
गणले जाऊ लागले. पेशव्यांचे पर्यायाने शाहू छत्रपतींचे निष्ठावान असणारे
राणोजीराव शिंदे बाजीरावांच्या इसवी सन 1740 मधील अकाली मृत्यूनंतर 1745
मध्येच मरण पावले. त्यांच्या पश्चात जयाप्पाराव, दत्ताजीराव, ज्योतिबाराव व
तुकोजीराव तसेच महादजीराव असे पुत्र होते. जयाप्पाराव आता शिंदेशाहीचे
वारसदार म्हणून कारभार बघू लागले. त्यासमयी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे
सुमारे पासष्ट लाख रुपये इतके होते, अशी नोंद सापडते. जयाप्पाराव इसवी सन
1756 मध्ये नागौर येथे मारले गेले. त्यांना मुलगा होता. त्याचे नाव होते
जनकोजी. पण आता राज्यकारभार मात्र बंधू दत्ताजीरावच बघत होते. दुर्दैवाने
दत्ताजीराव शिंदे हे देखील पानिपतच्या समरप्रसंगी 10 जानेवारी 1760 रोजी
यमुनातीरेच्या बुराडी घाटात अब्दालीचा सरदार नजीबखानाकडून ऐन युद्धात
वीरगती मिळवते झाले. नजीबने जबर जखमी होऊन रणांगणात पडलेल्या दत्ताजीला
कुत्सितपणे विचारले, और लडोगे क्या? तेव्हा मृत्यू समोर उभा असतानाही
दत्ताजी बाणेदारपणे उद्गारला, क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे! इतिहासात
हे तेजस्वी उद्गार अजरामर झाले आहेत. यानंतर नजीबखानाने दत्ताजीरावांना
ताबडतोब मारले. एक शिंदेकुलोत्पन्न पानपतावर धाराशायी झाला.
पुढे पानिपतच्या 1761 मधील निर्णायक युद्धात जनकोजीराव शिंदे पण
बरखुरदारखानाच्या स्वाधीन झाला होता. मात्र नजीबखानाने अब्दालीकडे चहाडी
करून बरखुरदाराच्या तंबूची झडती घेण्याचा प्रसंग आणला. तेव्हा प्रकरण
अंगावर शेकू नये, याकरिता बरखुरदारखानाने आश्रयास आलेल्या जनकोजीरावास ठार
करून गुपचूप खड्ड्यात पुरूनही टाकले. अशा दुर्दैवी रीतीने हा अजून एक
शिंदेकुलोत्पन्न मृत्यू पावला. यानंतर पानिपतच्या लढाईत वाचलेल्या
महादजीराव शिंद्यांवर ग्वाल्हेर संस्थानची धुरा येऊन पडली.
ग्वाल्हेर संस्थानचा इतिहास तसेच पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा
या कर्तृत्ववान महादजी शिंदे यांच्या योगदानाचा यथोचित आढावा घेतल्याशिवाय
पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असे म्हटले तर ते गैरलागू ठरू नये. महादजीराव
पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्रात परतले व आपले स्थान भक्कम करून पुनःश्च
1764 मध्ये माळव्यात आले. महादजीराव व त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर
शिंदे घराण्यातील राजांनी आपापली अनेक वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडली. यात
सोन्याच्या मोहरा, चांदीचे रुपये, तांब्याची नाणी यांचा समावेश आहे.
यापुढील लेखांमध्ये आपण ती नाणी आणि त्यांच्या विविध टांकसाळी/मिंटस यांची
माहिती घेणार आहोत
No comments:
Post a Comment