विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे भाग 4

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

इंदोरचे होळकर घराणे भाग 4

 

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी स्थिरस्थावर तसेच वृद्धिंगत केलेले होळकर घराणे मराठेशाहीची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा जरीपटका डौलाने मध्य तसेच उत्तर हिंदुस्थानात फडकत राहील, यासाठी सदैव प्रयत्नशील होते.

महाराज तुकोजीराव होळकर यांना तीन पत्नी आणि एकूण चार मुले होती. त्यातील काशिराव आणि मल्हारराव हे त्यांना धर्मपत्नीपासून झालेले होते आणि यशवंतराव तसेच विठोजी हे उपस्त्रियांपासून (चळीीींशीी) झालेले पुत्र होय.
काशिराव ज्येष्ठ असले तरी धाकट्या मल्हाररावांनी गादीवर हक्क सांगितला होता. कारण त्यांचा जन्म झाला तेव्हा वडील तुकोजीराव हे सुभेदार झालेले होते आणि काशिराव जन्मले तेव्हा ते एक साधे सैनिक होते. एक अशी वदंता आहे की, अहिल्याबाई आणि तुकोजीराव पहिले यांची अशी इच्छा होती की ज्याप्रमाणे अहिल्याबाई महेश्वर येथून राज्यकारभार बघत होत्या आणि तुकोजीराव राज्यरक्षण करीत होते. त्यानुसार काशिराव यांनी महेश्वर येथून राज्यकारभार करावा आणि मल्हारराव याने वडील तुकोजीरावांप्रमाणे सर्व सैन्याधिपती होऊन राज्यरक्षण करावे. मात्र याला कागदोपत्री दुजोरा मिळू शकत नाही. पुढे अहिल्याबाईंच्या निधनानंतर तुकोजीराव हे काशिराव गादीवर यावेत, यासाठी आग्रही होते. काशिराव हे शरीराने अधू होते; परंतु दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी आधी मल्हाररावांचा पक्ष घ्यावा, असा विचार योजला होता. कारण नाना फडणवीस हे मल्हाररावांना साहाय्य करीत होते. मात्र असे झाले तर नाना वरचढ होतील, या भीतीने अखेर त्यांनी काशिराव यांना 27 जानेवारी 1797 रोजी सुभेदारीची वस्त्रे दिली.
आपल्याला विरोध करणार्‍या बंधू यशवंतरावांना काशिरावांनी अंतर्गत कलहातून कारावासात टाकले, पण गोविंदपंतांच्या सांगण्यावरून त्यांना मुक्तही केले. यानंतर मात्र यशवंतराव तातडीने मल्हाररावांच्या सोबत जातात. या इतिहासातील मल्हारगर्दीत अखेर 14 सप्टेंबर 1797 च्या रात्री मल्हाररावांच्या गोटाला दौलतराव शिंदे यांच्या शिस्तबद्ध सैनिकांनी घेरले जाऊन मारले जाण्याच्या भीतीने निसटू पाहणार्‍या मल्हाररावांना भाऊबंदकीच्या वादातून ठार मारले गेले. असे म्हणतात की या कटासाठी काशिरावांनी शिंद्यांना 5 लक्ष रुपये देऊ केले होते, मात्र मल्हाररावांचा काटा काढल्यानंतर दौलतरावांनी 15 लक्ष रुपयांची मागणी केली आणि ती काशिरावांना पूर्ण करावी लागली. अखेर जेमतेम महिन्याआधी वडील तुकोजीरावांचे अंत्यसंस्कार जिथे केले होते तेथेच मल्हाररावांचेही केले गेले. या कारवाईमुळे शिंद्यांचे राजकीय वजन इतके वाढले की, त्यांनी पुढे जाऊन नंतर तर काशिराव होळकर महाराज तसेच दस्तुरखुद्द नाना फडणवीसांच्या गोटालादेखील घेराव घातला. काशिराव महाराज हे त्याअर्थाने सक्षम असे राज्यकर्ते नसल्याने होळकरशाहीची अवस्था याकाळात बरीचशी बिकटच झाली. सत्ता राखण्यासाठी सातत्याने पुणे दरबारात वाटाघाटी सुरू असल्यामुळे राज्यातील प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले होते. सैन्याचे वेतन वेळेवर होत नव्हते. यामुळे असंतोष वाढला होता. व्यापारी, सावकार मंडळीही या कारभाराबाबत धास्तावलेली होती. दुसरीकडे काशिरावांचे स्वतःचे सरदार मालोजी गावडे आदीकरून होळकरांच्याच जहागिरीत धुमाकूळ घालून सैन्याला वेतन देण्यासाठी पैसे वसूल करीत होते.
एकूणच बघता काशिराव यांची कारकीर्द ही होळकरशाहीसाठी काही फारशी उपयुक्त ठरल्याचे आढळून येत नाही. स्वतः काशिराव महाराज हे महेश्वरला वास्तव्य करून राज्यशकट हाकण्याऐवजी पुणे येथेच राहिलेले आढळतात. याच अवधीत ते दौलतराव शिंद्यांवर विश्वासून राज्यासाठी जवळपास 50 लाखांचे कर्ज अंगावर बाळगून होते, अशा नोंदी आहेत. या अनावस्था परिस्थितीत त्यांनी राजधानी महेश्वर येथून हिजरी सन 1212 – 1214 या कालावधीत, त्या टांकसाळीचे शिवलिंग आणि बिल्वपत्र हे चिन्ह असलेली कोणतीही नाणी पाडल्याचा पुरावा आढळत नाही. एक प्रवाह असाही आहे की अहिल्याबाईंनी महेश्वर टांकसाळीत शिवलिंग, बिल्वपत्र चिन्हांकित नाणी पाडली. याचे कारण त्या शंकराच्या भक्त होत्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. यामुळे अन्य राज्यकर्त्यांनी होळकरशाहीवर केलेले आक्रमण हे होळकर राजवटीतील लोक धार्मिक भावनेवर केलेले आक्रमण समजून त्याचा प्रतिकार करतील, अशी त्यांची समजूत असावी. मात्र त्यांच्यानंतर राजकीय वर्चस्वासाठी त्यांच्या वारसांत चाललेल्या लढ्यात या बाबीचा कोणाला विचार करावा, असे वाटले नसावे. मात्र होळकरशाहीच्या सैन्याचे मुख्यालय असलेल्या इंदोर येथील मल्हारनगर टांकसाळीत पाडलेली सूर्य / मार्तंड चिन्हांकित असलेली हिजरी सन 1212 आणि 1213 या दोन वर्षांची चांदीची नाणी (रुपये) उपलब्ध आहेत. आता ही नाणी सावकार तसेच व्यापारी वर्गाने किंवा स्थानिक अधिकार्‍यांनी आर्थिक व्यवहार निभावण्यासाठी पाडली असावीत, असाही मतप्रवाह आहे. कारण या कालावधीत महाराजा काशिराव होळकर हे पुणे दरबारीच रुजू होते. अखेर बंधू यशवंतराव आणि काशिराव महाराज यांची गादीसाठी लढाई होऊन यशवंतराव विजयी झाले आणि त्यांनी स्वतःला 6 जानेवारी 1799 रोजी राजाभिषेक करून घेतात. पुढे होळकरशाहीच्या एका अर्थाने कमकुवत असलेल्या या काशिराव महाराज यांचे बीजागड येथे इसवी सन 1808 मध्ये निधन झाले.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...