विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 7 October 2022

शिवरायांच्या बेळगांव स्वारीची कागदपत्रे उजेडात

 


शिवरायांच्या बेळगांव स्वारीची कागदपत्रे उजेडात
सन १६७३ मध्ये झाली स्वारी
सन १६७४ च्या महजरात स्वारीचा उल्लेख
शिवाजींनी बेळगांवात गडबड केली अशी नोंद
बेळगांवचे नांव मुस्तफाबाद
मानसिंगराव कुमठेकर
मिरज
छत्रपती शिवरायांनी सन १६७३ च्या सुमारास बेळगांववर स्वारी केल्याचा उल्लेख असलेला ऐतिहासिक कागद उजेडात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना हा कागद मिळाला आहे. सन १६७४ साली बेळगांवमध्ये शेरखान मशिदीच्या हक्कासंदर्भात झालेल्या महजरामध्ये या स्वारीचा उल्लेख ‘शिवाजीची गडबड’ असा केला आहे. बेळगांवच्या इतिहासाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उल्लेख आहे.
बेळगांव शहर हे ऐतिहासिक शहर आहे. रट्ट, कदंब या राजवटीसह विजयनगरच्या सम्राटांनी या परिसरावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा पाडाव केल्यानंतर काही वर्षांनी या परिसरावर बहमनी सुलतानांची सत्ता प्रस्थापित झाली. सन १५१८ नंतर या परिसरावर विजापूरच्या आदिलशाहीची राजवट सुरू झाली. आदिलशाही राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने बऱ्याचदा बेळगांव परिसरावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भागात विजापूरचे प्रबळ सरदार असल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी होत होता. प्रत्यक्ष शिवाजी महाराज बेळगांवात येऊन गेले किंवा नाही, याबाबत स्पष्ट उल्लेख कमी आहेत.
मात्र, मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना बेळगांव येथील ऐतिहासिक शेरखान मशिदीसंदर्भात अभ्यास करताना मोडी लिपीतील एक महजर मिळाला आहे. या महजरात शिवाजी महाराजांची ‘गडबड’ बेळगांववर झाल्याचा उल्लेख आहे.
महजर म्हणजे एखाद्या हक्काबाबत निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी गावातील प्रमुख मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर झालेल्या न्यायनिवाडय़ाचा कागद होय. असाच कागद बेळगांवमध्ये ३० सप्टेंबर १६७४ रोजी झाला.
बेळगांवमधील ऐतिहासिक शेरखान मशिदीला दिलेल्या जमीनीच्या इनामाच्या वादाबाबत काजी व अन्य प्रमुख मुस्लिम नागरिक यांनी बैठक घेऊन निवाडा केला होता. त्याचा महजर तयार करण्यात आला. त्यावर बेळगावमधील लोकांच्या 'शाईदी' म्हणजे साक्षी आहेत. मात्र, हा महजर पूर्ण होईतोपर्यंत शिवाजी महाराजांच्या सैन्याने बेळगांव आणि परिसरावर हल्ला केला. त्यामुळे त्या युध्दमय वातावरणात काजीचा शिक्का गेला. त्यामुळे या महजरावर मोहर म्हणजे शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. त्यामुळे पुढे तारीख नऊ रजब सन १०८५ हिजरी म्हणजेच ३० सप्टेंबर १६७४ रोजी हा महजर अधिकृत करण्यात आला. तसा उल्लेख हा महजर अधिकृत करताना करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘मोहोर सिवाजी याचे गडबड होऊन गेला. याजकरीता ताजा मोहर करुन द्यावे, म्हणून’ असा उल्लेख आहे. सदर महजरात बेळगांवचा उल्लेख किले मुस्तफाबाद असा केला आहे. सदर मुळ महजर फार्सी भाषेत असून, त्याचा हा मोडीमधील तर्जूमा (भाषांतर) आहे.
शिवरायांच्या बेळगांव स्वारीचा पुरावा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेळगांववरील हल्ल्याचा हा पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ च्या ऑक्टोंबर ते डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांती स्वारी केली होती. याचवेळी मराठयांच्या सैन्याने बेळगांववर हल्ला केला असावा आणि हा मुलूख जिंकून घेतला. या भागातील काही किल्लेही शिवाजी महाराजांनी याच काळात बांधल्याचे दिसतात. यावेळी शिवाजी महाराजांनी कारवार प्रांतापर्यंत धडक मारली होती. सदर महजरातील उल्लेखामुळे शिवाजी महाराजांची गडबड म्हणजे स्वारी ही बेळगांववर झाल्याचा स्पष्ट पुरावा मिळून आला आहे. बेळगांवच्या इतिहासाच्या दृष्टीने हा उल्लेख महत्त्वाचा आहे.
बेळगांवचे नांव मुस्तफाबाद
बेळगांव या नावाला प्राचीन इतिहास असून, वेणूग्राम नावापासून त्याची उत्पती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुघलांनी १६८६ मध्ये बेळगांव जिंकल्यानंतर शहजादा महंमद आझमशहा याच्या नावावरुन बेळगांवचे नांव अझमनगर असे ठेवले. मात्र, त्यापूर्वी आदिलशाही कालखंडात या शहराचे नांव ‘मुस्तफाबाद’ असेही होते. याचा पुरावा या कागदात मिळाला आहे. वेणूग्राम, बेळगांव, मुस्तफाबाद, अझमनगर असा या शहराच्या नावाचा प्रवासही मनोरंजक असाच आहे.
©मानसिंगराव कुमठेकर
9405066065

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...