विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 7 October 2022

चोळांच्या सागरी सीमोल्लंघनाची कथा

 चोळांच्या सागरी सीमोल्लंघनाची कथा

पोस्त सांभार ::निखिल बेल्लारीकर.




आज दसरा. रावणदहनाशिवाय सीमोल्लंघन हे आजच्या दिवसाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. दसऱ्याच्या आणि पीएस - १ अर्थात पोन्नियिन सेल्वन - १ या चोळ साम्राज्यावरील पिक्चरच्या निमित्ताने सहज लक्षात आली ती चोळांच्या सागरी सीमोल्लंघनाची कथा. दक्षिणेतील प्रमुख सत्तांपैकी एक आणि भारतीय उपखंडापासून सर्वांत दूरवर नाविक आक्रमणे करणारी भारतीय सत्ता म्हणून इतिहासातील चोळ साम्राज्याचे महत्त्व निर्विवाद आहे. बऱ्याचदा होते असे की चोळांनी स्वाऱ्या केल्या हे ऐकलेले असते, परंतु त्याची तपशीलवार माहिती व पार्श्वभूमी अभ्यासक वर्तुळाखेरीज तितकीशी ज्ञात नसते.
या आक्रमणांची पार्श्वभूमी गुंतागुंतीची व रोचक असून, आजपासून सुमारे एक हजार वर्षांपूर्वीही एकमेकांत गुंतलेल्या अर्थकारण व राजकारणाचे उत्तम प्रत्यंतर यातून येते. इ.स. ९८५ पासून राजराजाच्या नेतृत्वाखाली चोळ राज्याचे साम्राज्य होण्याची प्रक्रिया जोमाने सुरू झाली. राजराजाच्या काळात आजचा तमिळनाडू व केरळ, मालदीव बेटे, इत्यादींवर कब्जा केला गेला व श्रीलंकेवरही आक्रमणे झाली. राजराजाचा मुलगा राजेंद्र याने बापाचा वारसा मोठ्या धडाक्यात चालू ठेवला. त्याने भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्वारी केली- विशेषत: बंगालवरील त्याच्या यशस्वी स्वारीनंतर त्याने "गंगैकोंड चोळ" अर्थात "गंगेवर वर्चस्व असणारा चोळ" हे बिरुद धारण केले. तमिळनाडू ते बंगालपर्यंतच्या किनारपट्टीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केल्यानंतर त्याला खुणावू लागले ते बंगालच्या उपसागरापलीकडचे आजच्या इंडोनेशिया-मलेशियातील श्रीविजय नामक शक्तिशाली नाविक साम्राज्य! राजेंद्रानंतर कैक दशकांनी कुलोत्तुंग नामक राजाच्या काळातही श्रीविजयवर चोळांची स्वारी झाली.
मुळात भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या या श्रीविजय साम्राज्यावर हल्ला करण्याची गरज मुळात चोळांना का भासली असावी, हा अभ्यासकांसाठी एक जुना व महत्त्वाचा प्रश्न आहे. नवीन संशोधनातून याचा छडा लावण्यात बऱ्याच अंशी यश आले आहे. त्यावरून चोळ-श्रीविजय-साँग या तीन सत्तांमधील अर्थकारणाशी या स्वाऱ्या खोलवर निगडित असल्याचे निष्पन्न झाले आहे. इ.स.११व्या शतकात श्रीविजय हे इंडोनेशियातील द्वीपसमूहावर उल्लेखनीयरीत्या सत्ता गाजवणारे पहिले नाविक साम्राज्य होते. आपल्या भौगोलिक स्थानाचा कुशलतेने वापर करून त्यांनी मलाक्काच्या सामुद्रधुनीसारख्या भारत व चीनमधील अतिमहत्त्वाच्या सागरी मार्गावर आणि पर्यायाने तेथील एकूणच सागरी वाहतुकीवर प्रभुत्व प्रस्थापित केले होते. त्याच सुमारास चीनमधील साँग साम्राज्यही प्रबळ होते.
इकडे भारतात चोळही दर्यावर्दी तमिळ व्यापाऱ्यांमुळे समुद्री व्यापाराचे महत्त्व जाणून होते. आग्नेय आशियात श्रीविजय नौदलाची जहाजे अन्य व्यापारी जहाजांना आपल्या आधिपत्याखालील बंदरांत थांबावयास भाग पाडून त्यांच्याकडून कर वसूल करत. याला मनाई केल्यास दांडगाईने खुशाल बुडवून टाकत. याखेरीज चोळ-श्रीविजय-चीन या राजकीय त्रिकोणाची भूमिकाही चोळ स्वाऱ्यांना समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक राजप्रतिनिधी चिनी सम्राटाला किमती भेटवस्तू अर्पण करीत. भेटवस्तूंची किंमत आणि एकूण शिष्टमंडळातील लोकांची संख्या व अन्य सूत्रांकडून समजलेल्या माहितीच्या आधारे चिनी दरबार त्या त्या राज्याशी निगडित व्यापारी व राजकीय धोरण ठरवीत असे. चोळ साम्राज्याशीही असेच संबंध आग्नेय आशियातील राज्ये ठेवीत, उदा. इ.स.१००५ साली तमिळनाडूतील नागपट्टणममध्ये श्रीविजय साम्राज्याधिपती चूडामणिवर्मनने एक बौद्ध विहार बांधला होता. चिनी मार्केटमध्ये शिरकाव करण्याकरिता चोळ राजप्रतिनिधी सर्वप्रथम इ.स.१०१५ मध्ये श्रीविजय साम्राज्यात पोहोचून चीनला जाण्याआधीच मरण पावला. त्याच्या मरणात श्रीविजयचा हात कितपत होता हे स्पष्ट नाही. परंतु बहुधा त्याच संशयापोटी इ.स.१०१७ मध्ये लगेच चोळांनी श्रीविजयवर पहिली स्वारी केली असा संशोधकांचा तर्क आहे. त्यानंतर तीन वर्षांनी इ.स.१०२० मध्ये पहिले चोळ शिष्टमंडळ चीनला सुखरूप पोहोचले. हा चोळांसाठी मोठाच राजकीय विजय असून त्यामुळे आग्नेय आशियात त्यांचा दबदबा वाढला. पण श्रीविजय साम्राज्यावर याने विशेष फरक पडल्याचे दिसत नाही. शिवाय इ.स.१०२२-२३ साली चिनी सम्राटाने अरब प्रतिनिधींना जमीनमार्गाऐवजी सागरीमार्गे चीनमध्ये येण्यास सांगितल्यामुळे समुद्री व्यापाराची स्पर्धा विशेष तीव्र झाली. अय्यवोळ आणि मणिग्रामम सारखे दक्षिण भारतीय व्यापारी समूह यात मोलाची भूमिका बजावत होते. या तीव्र स्पर्धेतूनच इ.स.१०२५ सालचे प्रसिद्ध चोळ-श्रीविजय युद्ध उद्भवले.
त्या वर्षी मोठ्या संख्येने चोळांनी म्यानमारपासून ते मलेशियापर्यंतची चौदा महत्त्वाची बंदरे काबीज केल्याचा उल्लेख तंजावूरमधील बृहदीश्वर मंदिरात कोरलेल्या राजेंद्राच्या प्रशस्तीत सापडतो. या स्वारीत तत्कालीन " कडरम्" अर्थात सध्याच्या मलेशियातील केदाह येथील राजा संग्रामविजयोत्तुंगवर्मन याला कैद करून, अनेक रत्नांसह विद्याधरतोरण नामक कमानही ताब्यात घेतली गेली. या आणि याआधील स्वारीचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे श्रीविजय साम्राज्याकडून इ.स.१०१८ ते १०२८ या दहा वर्षांत एकही शिष्टमंडळ चीनमध्ये गेले नाही आणि चिनी व्यापारातही त्यांचा वाटा त्यामुळे तुलनेने कमी झाला असावासे दिसते. यानंतर संग्रामविजयोत्तुंगवर्मन याची मुलगी ओनांग किऊ हिच्याशी पुढे राजेंद्राने लग्नही केल्याचा उल्लेख एका उत्तरकालीन ग्रंथात मिळतो.
इथून पुढे चोळ-श्रीविजय संबंध तुलनेने सुधारले. इ.स.१०६७-६८ साली कुलोत्तुंगाच्या कारकीर्दीत श्रीविजय साम्राज्यातील अंतर्गत बंडाळीविरुद्ध चोळांची मदत घेतली गेली. समकालीन चिनी पुराव्यांवरून असेही दिसते की यावेळी श्रीविजय साम्राज्याचा किमान काही भाग चोळांच्या अप्रत्यक्ष आधिपत्याखाली होता. अर्थात इतर अनेक पुराव्यांशी ताडून पाहता चोळांचे वर्चस्व निर्विवाद आहे.या स्वाऱ्यांसाठी चोळांकडे पूर्णवेळ लढाऊ नौदल नव्हते. मुख्यत: व्यापारी जहाजांवर सैनिक रहात. यात कॅटामरन (काट्टु-मर(न/ म)) नामक छोट्या नौकांचा भरणा होता. अशा नौकांचे काही अवशेषही समुद्रतळाशी केलेल्या उत्खननात सापडले आहेत. चोळ नौदलाबद्दल दुर्दैवाने विशेष माहिती आज उपलब्ध नाही. पण या स्वाऱ्यांसाठी ते नागपट्टण बंदराहून निघाले असावेत हे उघड आहे. तंजावरच्या पूर्वेस शंभर सव्वाशे किलोमीटर आणि कावेरी नदीची कोलेरून/कोलिडम नामक शाखा जिथे समुद्राला मिळते तिथे हे बंदर आहे.
या स्वाऱ्यांचे आणि त्यांच्या पार्श्वभूमीचे पुरावे कैक ठिकाणच्या शिलालेखांत व ताम्रपटांत, तसेच समकालीन चिनी ग्रंथांतही आढळतात. चोळांनंतर एका सिंहली राजानेही दूरवर स्वारी केली होती - पराक्रमबाहू हे त्याचे नाव. त्याखेरीज मग पश्चिम किनाऱ्यावरील बवारिज अर्थात "पायरेट्स" लोकांनी तर पार येमेनपर्यंत मजल मारली होती. पण तो वेगळाच विषय आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी. एकूणच, अशा उल्लेखनीय लष्करी स्वाऱ्यांमागे तितकीच उल्लेखनीय राजकीय व आर्थिक कारणे असतात हेच यातून दिसून येते.
~निखिल बेल्लारीकर.
टीप १: सोबत चोळ साम्राज्य आणि श्रीविजय साम्राज्य यांचा नकाशा जोडला आहे. तसेच श्रीविजय साम्राज्याद्वारे नागपट्टणम येथे बांधलेल्या बौद्ध विहाराला काही अनुदान इ. रूपाने चोळांनी मदत केल्याचे तपशील नोंदवणारा ताम्रपट नेदरलँड्स येथील लायडेन विद्यापीठात आहे त्याचाही फोटो आहे. या ताम्रपटातला मजकूर संस्कृत आणि तमिळ या दोन्ही भाषांमध्ये आहे.
टीप २: पोस्ट शेअर करावी वाटल्यास फोटोंसकट करावी ही विनंती.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...