॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥
मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 2
सरलष्कर महाराज साहेब शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ माँसाहेबांनी संकल्पिलेले आणि शककर्त्या शिवछत्रपतींनी प्रत्यक्षात उतरवलेले, एका अलौकिक स्वप्नाचे, स्वराज्याचे बीज या राकट कणखर सह्याद्रीमध्ये रुजले होते.नव्हे तर ते आता नर्मदापार जाऊन मुघलांच्या विशाल वृक्षाला टक्कर देण्यास आणि वेळप्रसंगी त्यांचेच संरक्षण करण्यासही सक्षम झालेले होते. शाहूनृपकृपाशीर्वादेकरून हिंदवी स्वराज्यविस्तारक थोरल्या बाजीरावांसमवेत मराठा फौजांच्या दमदार टापा आणि टांकसाळी पण संपूर्ण हिंदुस्थानात पसरल्या होत्या.
शंभुपुत्र शाहू छत्रपती औरंगजेबाच्या 1707 मधील मृत्यूनंतर मुघलांच्या कैदेतून सुटून येऊन आपले आसन आणि विभागल्या गेलेल्या स्वराज्यावरील आपली पकड बळकट करण्याच्या प्रयत्नात होते.तिसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला यशस्वी प्रतिकार करणार्या शिवस्नुषा आणि राजाराम महाराज यांची पत्नी महाराणी ताराबाईसाहेब यांनी करवीर संस्थानची स्थापना केलेली होती. अशा विपरीत परिस्थितीत प्रसंगी शाहू महाराजांनी त्यांच्याशीही युद्ध केलेले आहे. हा लढा वारणेच्या सुप्रसिद्ध तहानंतर प्रदेशाची विभागणी होऊन बव्हंशी थांबला. यानंतर बरेचसे स्थिरस्थावर झालेले शाहू छत्रपती आणि यशाचा लोलक चातुर्याने त्यांच्या पारड्यात झुकवणारे त्यांचे विश्वासू पंतप्रधान पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि नंतर थोरले बाजीराव यांनी थेट मुघल साम्राज्याला आव्हान देऊन मराठ्यांची दमदार घोडदौड नर्मदा ओलांडून दिल्लीच्या तख्ताकडे केली. थोरले बाजीराव राऊस्वामी म्हणजे प्रत्यक्ष मराठ्यांच्या शाहू छत्रपतीची दिल्लीच्या सिंहासनावर रोखलेली बुलंद समशेर होती जणू. थोरल्या बाजीरावांनी अथक पराक्रम गाजवून, युद्धकौशल्याची चातुर्याच्या परिसीमा गाठून मराठा तख्ताचे एक एक शत्रू नामोहरम करीत आणले. बाजीरावांनी आपले लक्ष्मणासारखे पाठराखे बंधू चिमाजीअप्पा आणि शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, भोसले, जगताप, पटवर्धन आदी छत्रपतींच्या अनेक निष्ठावंतांच्या मजबूत साथ सहकार्यासह अवघ्या हिंदुस्थानातील सत्तांना तोंडात बोट घालायला लागेल असा पराकाष्ठेचा यशवंत पराक्रम केला. बाजीरावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर मुघलांकडून समृद्ध असा माळवा प्रांतही खेचून घेऊन स्वराज्यास जोडला. पुढे चिमाजीअप्पा, गंगाजी नाईक अणजूरकर, बाजी भिवराव रेठरेकर अशांच्या साहाय्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसईचा किल्लादेखील भीमपराक्रम करून जिंकला. शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीत मराठा फौजांना, त्यांच्या वेगवान अश्वदळाला पाय स्थिर राखण्यासाठी जणू ही हिंदुस्थानची भूमी कमी पडत होती, असेच चित्र दिसत होते.
माळवा, बुंदेलखंड, राजपुतांना, निजाम, मुघल अशा सत्तांना नमवून ते प्रांत ताब्यात आणून थेट बंगाल आणि उत्तरेकडे मराठ्यांची जबरदस्त घोडदौड सुरू होतीच. वरचेवर सुरू असलेल्या स्वार्यांमुळे बरेचदा पंतप्रधान पेशव्यांना कर्जही होत होते, परंतु हिंदवी स्वराज्य विस्ताराच्या या दमदार प्रयत्नात त्यामुळे खंड मात्र खचितच पडलेला नव्हता. सैन्याला चाल करण्यासाठी रसद – अन्नाची आणि अर्थातच पैशांचीही निकड लागतेच. मग अशा खडतर परिस्थितीत मध्यवर्ती सत्ताकेंद्र राजधानी सातारा आणि पंतप्रधान पेशव्यांचे वास्तव्य असलेले बलस्थान पुणे येथून उत्तरेकडे ग्वाल्हेर, दिल्ली, मथुरा, वृंदावन आदी ठिकाणी तळ ठोकून असलेल्या आपल्या फौजांच्या खर्चाला पैसेही वेळेवर मिळायला हवेत, या वस्तुस्थितीमुळे तेथे उभारल्या गेलेल्या मराठ्यांच्या असंख्य टांकसाळी आपल्याला आज अभ्यासता येत आहेत. फक्त पश्चिम भारतात मराठ्यांच्या तब्बल 75 एक टांकसाळी होत्या अशी नोंद आहे. यात अहमदनगर, अहमदाबाद, अलिबाग, अथणी, बागलकोट, बंकापूर, बारामती, (गगन) बावडा, बेलापूर, बेळगाव-शहापूर, भातोडी, भोर, भिवंडी, विजापूर, बुर्हाणपूर, चाकण, चांभारगोंदा, चांदोर, चिकोडी, चिंचवड, चोपडा-एरंडोल-पारोळा, धारवाड, घोटवडे (आझम नगर) गोकाक, हुक्केरी, कागल, कापशी, खानापूर, कित्तूर, कोल्हापूर, कमळगढ, लक्ष्मीश्वर, मैंदरगी, मलकापूर, मानोली, मिरज-सांगली-जमखिंडी, मुधोळ, मुल्हेर, मुरगोड, नागोठणे, नरगुंद, नाशिक, नवलगुंद, निपाणी, पन्हाळा, पेडगाव, फलटण, फुलगाव, पुणे, रहिमतपूर, रायगड, राजापूर, रामदुर्ग, रासिन, रेवदंडा, साष्टी (सालसेट), सातारा, सोलापूर, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, तळेगाव इंदुरी, तारळी, तासगाव, टेंभुर्णी, (सरकार)तोरगळ, वाफगाव, विशाळगड, (सावंत)वाडी, वाई, वाठार आणि यादवाड या नावांची नोंद ‘मराठा कॉइनेज आणि कटलाग’ या पुस्तकात स्पष्टपणे आढळते. यासोबत अजूनही काही नवीन मिंट्स कालपरत्वे उजेडात आलेल्या आहेत, हे पण येथे नमूद करण्याजोगे आहे. उदा. सावनूर पेठ, सरहिंद, शाहजहानाबाद इत्यादी. मात्र तरीही काही ज्येष्ठ अभ्यासक, तज्ज्ञ मंडळी यातील काही मिंट्स मराठ्यांच्या नसाव्यात, असे तेथील उपलब्ध नाण्यांच्या अथवा उपलब्ध चित्रांच्या आधारे वेळोवेळी अधोरेखित करीत आहेत.
यातील प्रत्येक नाण्यावर मराठ्यांनी आपले एखादे वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह छापून त्या नाण्याची वेगळी ओळख ही नाण्यांवरील लिपी जरी पुन्हा एकदा पर्शियन असली तरी अबाधित राखली आहे, हे फार महत्त्वाचे आहे. ही नाणी बरेचदा मुघल पद्धतीच्या नाण्यांशी साधर्म्य राखून असली तरी त्यावरील लिखावट ही मुघलांच्या नाण्यांच्या तुलनेत बरीचशी क्रूड (जाड्याभरड्या पद्धतीची) असायची. मात्र मराठा नाण्यांवरील चिन्हांमुळे/तसेच टांकसाळीच्या नावामुळे (हे टांकसाळीचे नाव बरेचदा नाणी पाडताना नाण्याच्या बाहेर/ ेषष ींहश षश्ररप गेलेले असते) ही नाणी सुस्पष्टपणे ‘मराठा नाणी’ म्हणून ओळखता येतात. या विविध ठिकाणच्या नाण्यांवर हत्तीला काबूत राखण्यासाठी वापरण्यात येणारे दोन- तीन प्रकारचे अंकुश (एश्रशहिरपीं सेरव), वेगवेगळ्या आकाराचे परशू (लरीींंश्रश रुश), नागफणी, ‘श्री, ज, क्र, रा, ग, स, मु, मो, धु, प्र, आदी अक्षरं ’, राम, सूर्य, चंद्र, मराठा धोप पद्धतीची तलवार, भाळी रेखल्या जाणार्या गंधाचे वेगवेगळे प्रकार, देवनागरी अंक/आकडे, कडं, फिरत्या भुईचक्रागत चिन्ह, विविध प्रकारचा जरीपटका, उभे आडवे तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे शिवलिंग, शिव शंकराचा डमरू, वैविध्यपूर्ण आकाराचे, प्रकारचे त्रिशूळ, पंचकोनी, अष्टकोनी तारा, फुलांचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची पाने, कमळाच्या कळीचे, फुलांचे अनेक प्रकार, विविध प्रकारचा तुरा, विविध प्रकारची राजछत्र, काही भौमितिक आकार, असंख्य प्रकार/आकाराच्या तलवार, कट्यारी, जरीपटक्यासह अंकुश, धनुष्यबाण, ठासणीची बंदूक, माशाचे (षळीह) विविध आकार/प्रकार, अश्व/घोडा, बिल्वपत्र अथवा बेलाचे त्रिदल पान, बोटीच्या नांगरागत भासणारे चिन्ह, विंचू वाटावा अशी काही चिन्हे, झाडांच्या फांद्या (ीींशश श्रशरष), शुभचिन्ह ‘स्वस्तिक’, लहानमोठ्या आकाराच्या बिंदूंची वर्तुळाकार नक्षी अशी अनेक असंख्य चिन्हे आपणांस अभ्यास करताना मराठा नाण्यांवर आढळून येतात.
चिन्हांची इतकी विविधता तथा समृद्धी अन्य कोणत्याही नाण्यांवर आढळून येत नाही हे विशेष. त्यावेळी त्या त्या प्रसंगानुरूप, विभाग/शहरानुरूप आणि गरजेनुसार ही सगळी चिन्हे छापली गेली असावीत, असा निष्कर्ष मात्र आपण नक्कीच काढू शकतो. ही सगळीच चिन्हे अतिशय ठसठशीत आणि रेखीव आहेत, जी मराठा नाण्यांचे वेगळेपण, दिमाख सहजपणे सिद्ध करतात. चांदीच्या तसेच तांब्याच्या नाण्यांवरील ही चिन्हांची कलाकुसर बघणार्याला नक्की मोहात पाडते, हे मात्र खरं. जसं मी याआधीही उद्धृत केलेले आहे की, मराठा नाण्यांचे सौंदर्य हे सह्याद्रीच्या रूपानुसार त्याच्या रांगड्या, राकट, बेलाग, कणखर पण तरीही मोहवणार्या, प्रेमात पाडणार्या स्वभावाप्रमाणेच आहे. मराठा नाण्यांच्या पश्चिम विभागातील महत्त्वाच्या आणि लोकमानसात सुपरिचित असलेल्या टांकसाळी कोणकोणत्या होत्या याचा आढावा आपण यापुढील लेखात घेऊ या.
No comments:
Post a Comment