॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥
मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 1
हिंदुस्थानच्या इतिहासात गेली अनेक शतके असंख्य राजेरजवाडे, राजघराणी, संस्थाने उदयास आली आणि त्यातील अनेक कालांतराने अस्त पावली तर बरीचशी टिकूनही राहिली. बहुतांशी राजवटींनी आपली स्वतंत्र नाणीही पाडली होती, ज्यापैकी अनेक आजही उपलब्ध आहेत, तर कालौघात काही नष्टही झाली. सतराव्या आणि अठराव्या शतकात शिवछत्रपतींनी दख्खनमध्ये स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची आणि पुढे आलम हिंदुस्थानात पसरलेल्या मराठेशाहीच्या नाण्यांची आणि मराठा टांकसाळींची ही कहाणी.
अनेक एतद्देशीय आणि परकीय आक्रमकांनी राज्य केलेली ही हिंदुस्थानची भूमी. येथे गुप्त, मौर्य, चालुक्य, वाकाटक, शिलाहार, सातवाहन, क्षत्रप, कदंब, यादव आणि परकीय आक्रमक सुरी, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच, सिद्दी इत्यादी सत्ता राज्य करून गेल्या होत्या, तर काही राज्य करीत होत्या. अशा या सत्ताधीशांबरोबर राकट, बेलाग, दर्गम अशा सह्याद्रीच्या मुलुखात अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या शहाजीपुत्र जिजाऊसुत शिवरायांनी स्वतंत्रतेचा न भूतो न भविष्यति उद्घोष करून आपले स्वतंत्र सिंहासन दुर्गदुर्गोत्तम रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावर स्वतःला राज्याभिषेक करवून निर्माण केले. अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर ही तेजस्वी शिवसूर्याची स्वातंत्र्य किरणे सह्याद्रीच्या कडेकपारीत अलौकिक तेजाने पोहोचली. मग अर्थातच स्वतंत्र सार्वभौम राजाच्या अधिकारात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली नूतन हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र नाणीदेखील पाडली. ती होती – सोन्याचे होन आणि तांब्याचा पैसा ‘रुका.’ रुका हे कागदोपत्री नाव आढळत असले तरी हा पैसा या शककर्त्या शिवरायांच्या नावामुळे ‘शिवरायी’ या नावानेच मान्यता पावला, ओळखला जाऊ लागला. तत्कालीन वापरात असलेल्या बहुतांशी नाण्यांवर फारसी भाषेचा प्रभाव असल्याने जवळपास सर्वच नाणी ही पर्शियन लिखावट असलेली असायची. मात्र ‘स्वत्व’ जपणार्या शिवछत्रपतींनी आपली मराठेशाहीचा पाया घालणारी ही नाणी देवनागरी लिपीत लिखावट असलेली पाडली होती. ‘श्री राजा शिव’/ ‘छत्र पती’, ‘श्री राजा शंभु’ / ‘छत्र पती’, ‘श्री राजा राम’ / ‘छत्र पती, ‘श्री राजा शाऊ / सावु / शाहु / साव’ / ‘छत्र पती’ अशी लिखावट मराठ्यांच्या या चार पहिल्या छत्रपतींच्या नाण्यांवर दिसून येते. शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांनीदेखील सुरुवातीला देवनागरीतील नाणी छत्रपतींसाठी पाडली होती. ज्यांना ‘दुदांडी’ नाणी अथवा ‘शिवरायी’ म्हणून ओळखले जाते. शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते मराठा साम्राज्य आसेतू हिमालय अहद तंजावर ते तहत पेशावर, रुमशाम (रूम = रोम, शाम = शामल म्हणजे हबशी = थेट अफ्रिका) पावेतो विस्तारायला हवे. शाहू छत्रपतींच्या कालखंडात त्यांचे पंतप्रधान पेशवे आणि मराठ्यांच्या बुलंद फौजांच्या मांदियाळीने सुरुवातीला हिंदवी स्वराज्यविस्तारक थोरल्या बाजीरावराऊस्वामींच्या समवेत नर्मदेपार घोडी घालून शिवछत्रपतींचे स्वप्न साकार करायला तसेच उत्तर हिंदुस्थान ताब्यात आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. मराठेशाहीच्या, हिंदवी स्वराज्य विस्तारासाठी पुढे तर अफगाणिस्तानाजवळील ‘अटक’ या किल्ल्यावर स्वारी करून मराठ्यांचा भगवा जरीपटकाही डौलाने फडकवला होता. या प्राप्त परिस्थितीत वेळोवेळी लागणारा खर्च, चलन हेदेखील तेवढेच महत्त्वपूर्ण होते. त्यामुळे देवनागरीतील मराठ्यांची नाणी अन्य प्रदेशांत सुलभपणे स्वीकारली जावीत, (षीशश रललशिींरपलश ) याकरिता कालांतराने मराठेशाहीच्या नाण्यांवर पर्शियन लिपीचा वापर होऊ लागला असावा, असे नक्कीच म्हणता येईल. तसेच मध्यवर्ती सत्ताकेंद्र सातारा (शाहू छत्रपती हयात असेपर्यंत, तदनंतर पुणे ) येथून खजिना / रक्कम / पैसे पोहोचवणे तसे अवघड होते. या कारणास्तव मराठ्यांनी हिंदुस्थानात जागोजाग आपल्या मिंट / टांकसाळी स्थापन केल्या होत्या, असाही निष्कर्ष काढता येईल.
नाणकशास्त्र अभ्यासकांच्या सोयीसाठी या मराठा टांकसाळींची सर्वसाधारणपणे चार विभागांत वर्गवारी केली गेलेली आहे – पश्चिम भारत, मध्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारत. चरीरींहर चळपीीं उेळपरसश या महत्त्वपूर्ण पुस्तकातील नोंदीनुसार पश्चिम भारतातील सुमारे 75 मिंट्सची नावे आपल्याला आढळून येतात. एका धारणेनुसार काही लेखकांनी असा उल्लेख केलेला आहे की, मराठा नाण्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपले नाणे वडील महाराज साहेब शहाजीराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इ. स. 1664 मध्ये ‘राजा’ ही पदवी धारण करून पाडले. मात्र अजूनही त्यावेळी पाडलेले एकही नाणे अभ्यासकांना उपलब्ध झालेले नाही तसेच कोणताही विश्वसनीय कागद तपासायला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे विचारांती असाच निष्कर्ष काढावा लागतो की, सर्वमान्यतेप्रमाणे शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकासमयी सोन्याचे होन तसेच तांब्याचा रुका / शिवरायी ही दोन नाणी पाडली होती. छत्रपतींनंतर त्यांच्या उत्तराधिकार्यांनी पण आपली स्वतंत्र नाणी पाडली. शाहू छत्रपतींच्या काळात बहुतांशी सत्ताकेंद्र हे पंतप्रधान पेशव्यांच्या हाती आले होते. पंतप्रधान पेशव्यांनी मात्र कधीही आपली स्वतंत्र नाणी पाडली नाहीत, तर छत्रपतींच्या नावानेच पाडली. साधारणतः असे दिसून येते की 1750 नंतर मध्यवर्ती सत्तेचा लोलक हा पुण्याकडे झुकला होता. यावेळी दिल्लीला शाह अली गौहर हा मुघल बादशाह होता. 1759 पासून पुणे तसेच अन्य ठिकाणी मराठ्यांच्या टांकसाळींची सुरुवात होऊ लागली. यावेळपावेतो मराठे उत्तरेकडे वारंवार आपल्या फौजा घेऊन आक्रमण करीत होतेच. पानिपत, दिल्ली, बंगाल, कटक, अफगाणिस्तान येथील अटक येथपावेतो त्यांच्या भीमथडी घोड्यांच्या टापांचे खूर पायास तेथील माती लावून आलेले आढळून येतात. अशावेळी दूरवर पुणे येथील मध्यवर्ती केंद्राकडून फौजांचा खर्च, रसद, वेतन आणि अन्य उद्भवणार्या खर्चाकरिता पैसे मागवणे हे अवघड असल्याकारणाने स्थानिक ठिकाणी टांकसाळ उभारणे गरजेचे वाटत असणार. या प्राप्त परिस्थितीमुळे आलम हिंदुस्थानात मराठ्यांच्या इतक्या टांकसाळी स्थापन झालेल्या आपल्याला आढळून येत. पश्चिम भारतातील महत्त्वाच्या टांकसाळीत पुणे, चिंचवड, अहमदाबाद, चाकण, अथणी, बागलकोट, भातोडी, बुर्हाणपूर, मुल्हेर, नाशिक, वाफगाव, चांदोर, वाई आदी ठिकाणच्या टांकसाळींची नावे आपल्याला नक्कीच घेता येतील.
याव्यतिरिक्त असलेल्या अन्य ठिकाणच्या टांकसाळींच्या नावांची पण आपण नोंद घेणार आहोतच. या विविध टांकसाळींतून मराठ्यांनी पाडलेल्या नाण्यांवर जरी एका बाजूला (शाहू छत्रपतींच्या वेळी झालेल्या करारामुळे) मुघल बादशहाचे नाव आढळून येत असले तरी आपल्या स्वतंत्र राजवटीच्या नाण्यांची ओळख ही मराठ्यांनी विविध नाण्यांवर विविध चिन्हे छापून अबाधित राखली होती, हेही फार महत्त्वपूर्ण होते. मात्र मराठ्यांच्या चलनाची स्वीकारार्हता असावी, याकरिता देवनागरीऐवजी तेथील स्थानिक प्रचलित पर्शियन लिखावटीत पाडली होती, असेही आपणास दिसून येते. या वैशिष्ट्य पूर्ण चिन्हांमुळे मराठेशाहीच्या नाण्यांनी आपली स्वतंत्र आणि वेगळी ओळख अबाधित राखली होती, हेही तेवढेच खरे. कारण नाणे हे देवाणघेवाण, दैनंदिन व्यवहारात वापरले जात असते. जर त्यावरील मजकूर घेणार्याला समजण्याजोगा नसेल तर ते नाणे स्वीकारले जाणार नाही, हा मुद्दा लक्षात आल्यामुळेदेखील पुन्हा एकदा देवनागरीऐवजी पर्शियन लिखावटीचा आधार मराठ्यांना घ्यावा लागला असावा, असे मानण्यास प्रत्यवाय आहे. या काही महत्त्वाच्या टांकसाळींशिवाय अन्य कोणत्या टांकसाळी पश्चिम भारतात होत्या व नाण्यांची वैशिष्ट्ये चिन्ह कोणकोणती होती, हे आपण पुढील लेखात पाहू या.
No comments:
Post a Comment