पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ
बडोदा येथील गायकवाड घराणे - 5 .
शिवछत्रपतींच्या काळातील वर्चस्वाची लढाई संपुष्टात येऊन दुर्दैवाने आता
ब्रिटिशांच्या देशव्यापी वरवंट्यामुळे अनेक संस्थानिकांना अस्तित्वाची
लढाई करणे भाग होते. आपापसातील बरेचसे ताणले गेलेले परस्परसंबंध, दुबळी
झालेली मध्यवर्ती सत्ता आणि हतबल होऊन शरणागती पत्करलेली पेशवाई या
परिस्थितीत या विविध सत्ताधीशांना नाइलाजास्तव का होईना इंग्रज सत्तेचाच
काय तो भलाबुरा आधार शिल्लक राहिला होता, हे मात्र नाकारता येत नाही.
मल्हारराव गायकवाड!
मल्हाररावांचा जन्म इसवी सन 1831 मध्ये झाला होता. बडोद्याचे 11 वे महाराज म्हणून बंधू खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव गायकवाड हे वयाच्या 39 व्या वर्षी बडोदा संस्थानच्या राजगादीचे सर्वाधिकारी झाले. त्यांची कारकीर्द ही अवघी 5 वर्षांची म्हणजे 1870 – 1875 इतकीच होती. मात्र ही अल्पशी कारकीर्द हीदेखील बव्हंशी वादग्रस्त ठरली, असे इतिहास सांगतो. त्यांनी सोन्याच्या तोफा आणि मोत्यांचा गालिचा बनविण्यासाठी बडोदा संस्थानचा खजिना रिता केला. संस्थानावर पकड मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी जुलूम, जबरदस्ती केली असेही इतिहासात नमूद आहे. आधीचे महाराज खंडेराव यांच्याशी एकनिष्ठ असणारे आणि आपल्या छळाला कारणीभूत असतील असे वाटून ज्यांच्याबद्दल मल्हाररावांना संशय होता, त्या सर्वांना त्यांनी धारेवर धरले. खंडेरावांच्या महाराणी जमनाबाई साहेब यादेखील खुद्द मल्हाररावांची भीती वाटत असल्याकारणे प्रसूतीसमयी रेसिडेन्सी भागात वास्तव्यास गेल्या होत्या व तिथेच त्यांना खंडेरावांच्या मृत्यूनंतर कन्यारत्न झाले. त्यानंतर त्यांनी बडोदा शहराच्या बाहेर राहणे पसंत केले होते.
खंडेरावांचा दिवाण भाऊ शिंदे हादेखील तुरुंगात संशयास्पद अवस्थेत मृत्यू पावला. खंडेरावांच्या मर्जीतील अनेक लोकांना पदभ्रष्ट तरी करण्यात आले होते किंवा त्यांची मालमत्ता तरी सरकारजमा करण्यात आली होती. या सगळ्याची खबर अखेर ब्रिटिश रेसिडेंटपर्यंत पोहोचलीच. यावेळपावेतो (1673) महाराजांच्या दुर्दैवाने सुखासीन वृत्तीने कारभार बघणारा रेसिडेंट कर्नल बार हा जाऊन त्याच्या जागी कर्नल रॉबर्ट फेयर हा बडोद्याचा गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेला होता. फेयर हा उत्साही पण राजकीय हस्तक्षेप करण्यास उत्सुक असा माणूस होता. याचमुळे लवकरच फेयर आणि मल्हाररावांचे राजनैतिक संबंध ताणले गेले तसेच वादग्रस्त राहिले. या रेसिडेंटने बडोदा संस्थानच्या पर्यायाने मल्हाररावांच्या गैरकारभाराची बातमी वरिष्ठ अधिकार्यांना दिली. परंतु का कोणास ठाऊक तत्कालीन भारताचे ब्रिटिश व्हॉइसरॉय रॉबर्ट बारिंज (ठेलशीीं इरीळपस ) यांनी मल्हाररावांना केवळ ‘समज’ दिली. यामुळे तर रॉबर्ट फेयर आणि मल्हारराव महाराज यांच्यातील वितुष्ट दिवसेंदिवस वाढतच चालले.
1874 मध्ये परिस्थिती इतकी विकोपाला गेली की ज्या दिवशी रॉबर्ट फेयरनी व्हॉइसरॉयना महाराजांच्या गैरकारभारांची जंत्री सादर केली. योगायोगाने त्याच दिवशी मल्हारराव महाराजांनी या ब्रिटिश रेसिडेंटला बदला अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली. पण तेव्हाचे व्हॉइसरॉय नॉर्थब्रूक हे मल्हाररावांच्या बाजूचे असल्याने त्यांनी 12 नोव्हेंबरला मुंबई इलाख्याला (इेालरू झीशीळवशपलू जषषळलश) ला चक्क रॉबर्ट फेयर यांचीच बदली करावी, अशी शिफारस केली. पण या गोष्टीस तरीही उशीरच झाला. मात्र दैवगतीच्या विचित्र खेळीमुळे त्याआधीच 9 नोव्हेंबर रोजी मल्हारराव महाराजांकडून (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) रेसिडेंट रॉबर्ट यास भेटीस बोलवून त्यांस दिलेल्या सरबतात हिर्याची पूड आणि रीीशपळल मिसळून विषप्रयोग करण्यात आला होता, असा आरोप फेयर याने मल्हाररावांवर केला. यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलली. पोलिसांद्वारे केलेल्या चौकशीत सदर आरोप सिद्ध झाल्याचे दाखवून फेयरने मल्हारराव महाराजांना अटक ही केली व कारभार स्वतःच्या हाती घेतला. या वेळी बडोद्याच्या दिवाण पदावर असलेले दादाभाई नौरोजी व त्यांचे चार विश्वासू सहकारी हेदेखील या प्रकरणात मल्हाररावांना काहीही मदत करू शकले नाहीत. यातील एक सहकारी शहाबुद्दीन काझी हे पुढे सयाजीराव महाराज तिसरे यांचे दिवाण झाले. मल्हारराव महाराजांच्या हेतूविषयी कोणतीही शंका मनात न ठेवता केवळ प्रशासकीय कारभारात सुधारणेच्या हेतूने दादाभाई बडोद्यात आले होते. मात्र मल्हारराव महाराज आणि ब्रिटिश रेसिडेंट हे दोघेही आपल्या मार्गातले अडथळे आहेत, हे त्यांना लवकरच कळून आले. अखेर दादाभाईंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ब्रिटिश सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत तीन इंग्रज आणि तीन भारतीय सदस्य होते. चौकशीअंती तीनही भारतीय ज्युरींनी मल्हाररावांना निर्दोष ठरविले होते. पण इंग्रज ज्युरींनी मात्र महाराजांच्या विरोधात मत नोंदले होते. रेसिडेंट फेयरची बदली होणार हे नक्की असताना महाराज असे का करतील, हा भारतीय ज्यूरींचा बचाव होता. अर्थातच याला कोणाकडे उत्तर नव्हते. अखेरीस अपरिहार्यपणे जे घडणार असे वाटले होते तेच घडले. सेक्रेटरी ऑफ द बडोदा स्टेट – भारतमंत्री लॉर्डस सॅलीसबरी यांच्या हुकूमानुसार ‘महाराजांत सुधारणा होणे अशक्य‘ आहे असे दर्शवून मल्हारराव महाराजांना एका जाहीरनाम्यानुसार राजगादीवरून पदच्युत करून 19 एप्रिल, 1875 रोजी याच जाहिरनाम्यातील एका कलमानुसार वार्षिक दीड लक्ष रुपयांच्या निवृत्तीवेतनावर मद्रास येथे रवाना करण्यात आले. या पदच्युतीनंतर महाराजांच्या अनुयायांनी छोटे उठावही केले तसेच शहरात हरताळही पाळला गेला होता. रेसिडेंट लुई पेली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे झालेल्या निवृत्तीनंतर त्या जागी आलेले सर रिचर्ड मीड यांनी चातुर्याने व सक्षमपणे परिस्थिती हाताळून कौशल्याने प्रशासनावर आपला (ब्रिटिशांचा) अंमल कायम राखला. मात्र मल्हारराव महाराज यानंतर बडोद्याच्या राजगादीवर पुनश्च आसनस्थ होऊ शकले नाहीत.
मल्हाररावांचे बंधू खंडेराव हे राजगादीवर असताना मल्हाररावांनी त्यांनाही वारसाहक्काच्या भांडणात जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना नाइलाजास्तव राजमहालाच्या बाहेर काढून कैदेत ठेवण्यात आले होते. खंडेराव हेदेखील फारसे सक्षम नसले तरी ब्रिटिशांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले होते आणि याच कारणास्तव ब्रिटिश सरकार त्यांच्या हिरे, जडजवाहीर इत्यादी खरेदी करण्याच्या आवडींना विशेष असा विरोध करत नव्हते. खंडेराव यांनी पुढे जाऊन चक्क चांदीच्या तोफा ओतून घेतल्या होत्या. मात्र 1870 मधील खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव बंधमुक्त होऊन दैव बलवत्तर असल्याने बडोद्याच्या राजगादीवर विराजमान झाले होते. आता तर त्यांनी चांदीऐवजी थेट सोन्याच्या दोन तोफा बनवून घेतल्या. मल्हाररावांच्या कारकीर्दीत बडोदा संस्थानची आवक प्रचंड घटून वारेमाप खर्च होऊ लागले होते. खंडेरावांच्या कालखंडात वाईट असलेली स्थिती आता तर ‘फारच वाइट’ म्हणावी लागली इतपत वेळ आली. 1874 मध्ये संस्थानचे वार्षिक उत्पन्न 94 लाख रुपये आणि खर्च मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे 171 लाख रुपये, अशी अवस्था होती. मल्हाररावांच्या मर्जीतील निकटवर्तीयांवर सुमारे 40 लाख खर्च झाले होते तसेच राजमहालावर तब्बल 30 लाख इतकी मोठी रक्कम कामास आली होती. यानंतर दरबारी ब्रिटिश रेसिडेंटने खजिन्याची तपासणी केली असता त्यात अवघे 2000 रुपये शिल्लक आढळले. सैन्याला वेतन देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे ते बंडाच्या पायरीवर उभे होते. राजदरबारातील मुत्सद्दी तसेच अन्य सभासदांची मल्हाररावांच्या मर्जीतील निकटवर्ती यांकडून पिळवणूक सुरू असल्याने तेही हतबल झालेले होते, अशा नोंदी आहेत. राज्यातील महिलावर्ग सुरक्षित नव्हता. दैवदुर्विलास टाळण्यासाठी काहींनी मंदिराचा आसरा घेतला होता. महिलांना राजमहालात काम करण्याची सक्ती केली जात होती, अशाही तक्रारी ब्रिटिश सरकारकडे नमूद आहेत. इतकेच नव्हे तर खुद्द मल्हाररावांच्या मुलीनेदेखील राजधानी त्यागली, असेही इतिहास मूकपणे सांगतो.
या आपल्या पाच वर्षांच्या वादग्रस्त कार्यकाळात मल्हारराव महाराजांनी तांब्याची तसेच चांदीची नाणी पाडली आहेत, पण फारच थोडी. त्यांनी स्वतंत्र राज्यकर्त्याच्या अधिकारात नाणी पाडली असली तरी त्यांच्या नाण्यांमध्ये कोणतेही वैविध्य आढळून येत नाही. तांब्याच्या नाण्यांमध्ये अर्धा पैसा, एक पैसा आणि डबल पैसा पाडलेला दिसून येतो, ज्यांचे मूल्य वजनानुसार ग्राह्य धरले जात असे. या नाण्यांवर वर मध्यभागी शेडेड बॉल अथवा कनॉन बॉल (तोफगोळा) त्याच्या खाली तलवार आणि तोफगोळ्याच्या वर मल्हारराव महाराजांची आद्याक्षरे ‘मा आणि गा’ आढळतात. काही सुस्पष्ट नाण्यांवर हिजरी सनदेखील बघता येते. चांदीच्या नाण्यांत एक अष्टमांश रुपया, एकचतुर्थांश रुपया, अर्धा रुपया आणि एक रुपया या मूल्याची नाणी पाडलेली आहेत. यावर ‘मा, गा‘ या आद्याक्षरांसह उजवीकडे वळलेली तलवार छापलेली आहे. यातील काहींवर 1288 हे हिजरी सन पण आढळते. या दोनच प्रकारची नाणी मल्हाररावांच्या नावावर जमा आहेत. अखेर मद्रास येथेच इसवी सन 1882 मध्ये बडोद्याच्या या मल्हारराव गायकवाड महाराजांचे वयाच्या एक्कावन्नव्या वर्षी संदिग्धावस्थेत निधन झाले.
No comments:
Post a Comment