हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांची नाणी
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठी नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट
राजकीय घडामोडींच्या अपरिहार्यतेपायी दुर्दैवाने बालपण ते ऐन तारुण्य मुघलांच्या तुरुंगवासात घालवलेला शंभुपुत्र युवराज म्हणजे शाहू महाराज. 18 मे 1682 रोजी जन्मलेले शाहू हे शंभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईसाहेबांचे द्वितीय अपत्य. त्या काळच्या परंपरेनुसार त्यांचेही नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. कालांतराने परिस्थिती बदलल्यावर शाहू हे छत्रपती शिवराय स्थापित हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती जाहले!
राजधानी दुर्गदुर्गोत्तम रायगडाच्या परिसरात असलेल्या माणगावजवळील गांगवली / गांगोली या गावात शंभाजीराजे व शिर्केकुलोत्पन्न महाराणी येसूबाईसाहेबांच्या पोटी वैशाख वद्य 7, शके 1604 म्हणजे दिनांक 18 मे 1682 रोजी या शिवाजी ऊर्फ शाहू यांचा जन्म झाला. प्रथम अपत्य कन्या भवानीबाईसाहेब यांच्यानंतर शंभाजी महाराजांना झालेले हे दुसरे पुत्ररत्न. पूर्वसूरींप्रमाणे त्या काळच्या प्रथेनुसार आपल्या पराक्रमी पित्याचे अथवा काकांचे / घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव पुत्रास देण्याच्या परंपरेने याचे नावही शिवाजी असेच ठेवण्यात आले होते. स्वराज्यात तशीही मुघलांची धामधूम सुरू होतीच. आणि …..
बालपणी राजपुत्रांना देण्यात येणारे राजशिक्षण सुरू असतानाच ती अक्षरशः वज्राघात करणारी बातमी अवघ्या सात वर्षांच्या लहानग्या शाहूंना कळली. खरंतर कितपत समजली असेल हे पण सांगणे अवघड आहे, इतकं ते अजाण वय होतं.
वडील आणि छत्रपती शंभाजी महाराज यांचा औरंगजेबाने अनन्वित हालहाल करून निर्घृण हत्या केली होती. ही ती दुःखद अन् संतापजनक बातमी होती. सारा सह्याद्री हादरला, डळमळला, हेलावला अन् क्षणकाल भांबावलाही. हिंदवी स्वराज्याचा छत्रपती, शिवपुत्र शंभाजी यवनाधमाच्या हाती मारला गेला होता.
जाणत्यांची मतीसुद्धा काहीकाळ गुंग झाली, इतका मोठा आघात होता तो. पण रायगडावर असलेल्या महाराणी येसूबाईसाहेबांनी पती निधनाचे आणि न झालेल्या अंत्यदर्शनाचे दुःख बाजूला ठेवून मंत्र्यांशी व ज्येष्ठांशी विचारविनिमय, सल्लामसलत करून व आपल्या पुत्राचे लहान वय लक्षात घेऊन मोठ्या मनाने व धोरणीपणाने नजरकैदेतील राजाराम महाराजसाहेबांना बंधमुक्त करून मंचकी / सिंहासनावर बसविले. स्वराज्याला पुन्हा छत्रपती प्राप्त झाले. पण तरीही प्रसंग मोठा बाकाच होता. कारण शंभुछत्रपतींचा हत्या केल्याने स्वराज्य बुडवायला आतुरलेल्या औरंगजेबाने तातडीने मुघल फौजा राजधानी रायगडासहित अन्य शिवदुर्ग जिंकण्यास रवाना केल्या होत्या. झुल्फिकारखानाने तर जलदीने रायगडास मोर्चे लावलेसुद्धा. वेढा आवळत आणला. आता तर सारेच राजकुटुंबीय राजधानीत जणू बंदी झाले, अशी परिस्थिती ओढवली. संकटांची माळ अखंडपणे स्वराज्याभोवती आपले पाश विणत होती. शाहू तर लहानच होते, पण शंभुपत्नी शिवस्नुषा येसूबाईसाहेबही काही फार अनुभवी, वयाने थोरल्या नव्हत्या. पण तरीही शिवरायांच्या या ज्येष्ठ सुनेने अत्यंत धीरोदात्तपणे, धोरणीपणाने निर्णय घेऊन छत्रपती राजाराम महाराजांना वेढ्यातून रायगडाबाहेर काढले. यासमयी राजाराम महाराज रायगडाच्या वाघ दरवाजाने गडाबाहेर उतरते झाले, असे म्हणतात. ज्यांनी रायगडाचा हा वाघ दरवाजा बघितला असेल, त्यांनाच या धाडसाची अंशतः का होईना कल्पना येईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अमोघ शब्दांत सांगायचे झाले तर येथून उतरण्याची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच तसेच वर चढण्याची हिंमत वार्याच्या झोतालाच होऊ शकते आणि अर्थातच मराठ्यांना. अखेर अभेद्य, अजिंक्य, बेलाग, पूर्वेकडील जिब्राल्टर मानला जाणारा शिवछत्रपतींचा प्राणप्रिय रायगड झुल्फिकारखानाने जिंकला. यावेळी झालेल्या समझोत्यानुसार महाराणी येसूबाईसाहेब, राजपुत्र शाहू व शिवरायांचा अन्य कुटुंबकबिला ‘राजबंदी’ म्हणून औरंगजेबाच्या कैदेत गेला.
रायगडावर, हिंदवी स्वराज्यावर जणू किर्र काळोख पसरला. शाहू महाराजांचे शैशव हे आता औरंगजेबाच्या कैदेत व्यतीत होऊ लागले. स्वातंत्र्यसूर्याची ही किरणे अंधारात जणू बंदिस्त झाली होती. पण, जरी औरंगजेबाने शंभाजीराजांची क्रूरपणे हत्या केली असली तरी त्याने येसूबाईसाहेब आणि राजपुत्र शाहू यांना बर्याच ममतेने वागविले, असे दाखले आहे. या राजबंद्यांचा तंबू हा त्याच्या शाही तंबूशेजारीच – गुलालबार – असायचा. मध्येच एकदा आपल्या लहरी अन् धर्मवेड्या स्वभावानुसार त्याने शाहूंचे धर्मांतर करण्याचा आदेशही दिला होता. पण काही वजनदार मध्यस्थांच्या रदबदलीमुळे तो त्याने नाइलाजास्तव मागेही घेतला खरा. पण आदेशाचे पालन व्हायलाच हवे म्हणून स्वराज्याचे दिवंगत सरनौबत प्रतापराव गुजर यांचे दोन पुत्र जगजीवन आणि खंडेराव हे शाहूंच्या ऐवजी धर्मांतरित करण्यात आले. या सगळ्या उलथापालथीनंतर शाहू महाराज कैदेतून कधी सुटले व राज्यारोहणानंतर त्यांनी छत्रपती म्हणून आपली स्वतंत्र नाणी कधी व कोणती पाडली, हे आपण पुढील भागात पाहूया.
No comments:
Post a Comment