विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ बडोदा येथील गायकवाड घराणे-7

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

बडोदा येथील गायकवाड घराणे-7 बडोदा संस्थानचे सुवर्णयुग, महाराजा सयाजीराव तिसरे - 2 आणि अखेरचे महाराजा प्रतापसिंह!

 

देशभरातील स्वातंत्र्यसैनिक परक्या ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव करीत होते. देशातील अनेक संस्थाने, संस्थानिक नाईलाजास्तव का होईना ब्रिटिश सरकार बदलू पाहणार्‍या चालीरीतींना, आधुनिकीकरणाला, सुधारणांना पाठिंबा देत होते. कारण या एकछत्री अंमल बसवलेल्या प्रबळ अशा इंग्रजी सत्तेशी जुळवून घेऊन संस्थानांचा विकास करणे गरजेचे होते. आत्मसन्मान राखून सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानचा होता होईल तितका विकास आपल्या कारकीर्दीत केला.

भाग्यात चालून आलेला अनपेक्षित राजयोग स्वीकारून दि. 11 मे, 1863 रोजी जन्मलेले गोपाळराव उर्फ सयाजीराव महाराज तिसरे हे ब्रिटिश सरकारने दिलेले राजशिक्षण तसेच महाराणी जमनाबाईसाहेबांनीही दिलेले भारतीय संस्कार, आचारविचार, चालीरीती यांची सुयोग्यपणे माहिती घेऊन तसेच आत्मसात करून अठराव्या वर्षी राजगादीवर विराजमान झाले होते. पुढे ब्रिटनची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्या हिंदुस्थानची महाराणी होण्याच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तरुण सयाजीराव महाराज 15 डिसेंबर, 1876 रोजी दिल्लीला पोहोचले होते. तिथे त्यांना ‘फर्जंद – इ – खास – इ – दौलत – इ – इंग्लिशिया’ म्हणजेच ‘ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र’ असा किताब देण्यात आला तसेच 1877 मध्ये जमनाबाईसाहेबांना ‘क्राऊन ऑफ इंडिया’ असे गौरवून त्यांच्या सन्मानार्थ जमनाबाई हॉस्पिटलही सुरू करण्यात आले होते. याच सुमारास सयाजीराव महाराजांचे पिता काशिराव यांचे 26 जुलै, 1877 रोजी दुःखद निधन झाले.

जीवनाच्या वाटचालीत येणारे असे अनेक बरेवाईट प्रसंग स्वीकारत सयाजीरावांचा कारभार सुरू होता. त्यांचे राजशिक्षक श्रीमान एलियट यांचे काटेकोर मार्गदर्शन आणि त्यांचा या शिष्याचा चिकाटीपणा आणि मेहनत ही हळूहळू फलदायी सिद्ध होत होती. सयाजीरावांनीदेखील एलियट साहेबांसोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राखलेले होते. अर्थातच त्यांच्यावर पाश्चात्य सुधारणा, संस्कृती आणि विचारसरणीचा प्रभाव पडणे साहजिकच होते. परंतु या प्रभावाला बर्‍याच अंशी मातोश्री जमनाबाईसाहेब यांचा लगामही सोबतीला होता. सयाजीरावांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर इसवी सन 1881 मध्ये डिसेंबरअखेरीस त्यांच्याकडे राज्य प्रशासनाचे संपूर्ण अधिकार सोपविण्याचे निश्चित करण्यात आले होते. सभोवतालच्या अधिकारीवर्गाने, हितचिंतकांनी, मातोश्रींनी, रेसिडेंटने तसेच दिवाण टी. माधवराव यांनी महाराजांनी पुढील राज्यकारभार कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केलेले ‘किरकोळ सूचना / चळपेी कळपीीं’ नावाचे महत्त्वपूर्ण पुस्तक महाराजांसह अधिकारीवर्गाने पालन करण्यास प्रसारित केले होते. आठव्या एडवर्ड या ब्रिटनच्या राजपुत्राने नोव्हेंबर 1875 मध्ये मुंबईस भेट दिली व याकारणाने सयाजीरावांनाही प्रथमच मुंबईत यावे लागले. सुमारे 26 दिवसांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांनी मुंबईचे गव्हर्नर सर फिलिप वूडहाऊस, व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक आणि शाही पाहुणे यांच्याशी दरबारी मुलाखती केल्या. या वेळी त्यांनी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. परतभेटीत राजपुत्र अर्थात प्रिन्स ऑफ वेल्स बडोद्यात आले असता, त्यांचे यथोचित आदरातिथ्य करण्यात आले. अशा व इतर अनेक प्रशासकीय कामांतून, जबाबदार्‍यांतून सयाजीराव आणि बडोदा संस्थान आपली वाटचाल करीत होते.

28 डिसेंबर, 1881 रोजी सयाजीराव महाराजांचा औपचारिक राज्यारोहण सोहळा पार पडला. आपल्या प्रांताची आणि रयतेची चक्षुर्वैसत्यम माहिती, खबर असावी यादृष्टीने सयाजीराव महाराज सातत्याने दौरे करीत असत. यास ‘हुजूर सवारी’ असे म्हटले जाई. राज्यारोहणानंतरचा पहिला दौरा त्यांनी 23 नोव्हेंबर, 1882 रोजी उत्तर गुजरातेतील ‘कडी’ या परगण्याचा केला, अशी नोंद आहे.

सयाजीराव महाराज आणि प्रथम पत्नी महाराणी चिमणाबाईसाहेब यांना जुलै 1881 व जून 1882 मध्ये कन्यारत्नांचा लाभ झाला होता. परंतु दुर्दैवाने दोघीही अल्पवयीन ठरल्या. पुढे दि. 3 ऑगस्ट, 1883 रोजी त्यांना पुत्रप्राप्ती होऊन राज्याला नव्याने लाभलेल्या या वारसाचे नामकरण फत्तेसिंहराव असे करण्यात आले. महाराज लक्ष्मीविलास या राजवाड्यात मुक्कामास असत. मात्र लवकरच 7 मे, 1885 रोजी सयाजीरावांच्या प्रिय पत्नी महाराणी चिमणाबाईसाहेब यांचे अकस्मात निधन झाले. महाराजांना त्यांचा वियोग बराच काळ जाणवला. जमनाबाई साहेबांनी लगोलग सयाजीरावांचा दुसरा विवाह देवास संस्थानच्या राजकन्या गजराबाईसाहेब यांच्याशी 28 मे, 1885 रोजी केला. सयाजीरावांनी तब्बल 24 वेळा युरोप आदी विविध देशांचा प्रवास केला, अशा तपशीलवार नोंदी आहेत व याचमुळे त्यांच्यावर ‘गैरहजर राजा’ असा शिक्काही मारला जाई. युरोपातील आणि अन्य पाश्चिमात्त्य देशांतील सोयीसुविधा, सुधारणा महाराजांनी संस्थानच्या उत्कर्षाकरिता आणण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, हेदेखील महत्त्वाचे. पुढे सयाजीरावांना आणखी चार अपत्ये झाली. त्यात एक कन्यारत्न होते. दुर्दैवाने कालांतराने सयाजीरावांचे तीन पुत्र मृत्यू पावले. एकुलती एक कन्या इंदिराराजे यांनी त्यांच्या मर्जीविरुद्ध विवाह केला. राजपुत्र फत्तेसिंहराव यांचा 4 फेब्रुवारी, 1904 रोजी फलटण संस्थानच्या राजकन्या पद्मावती यांच्याशी विवाह झाला खरा, पण चारच वर्षांत फत्तेसिंहराव हे मरण पावले. सयाजीरावांच्या कारकीर्दीचा रौप्यमहोत्सव 5-10 मार्च, 1907 या कालावधीत साजरा करण्यात आला. मात्र वैयक्तिक सुख-दुःखांवर मात करीत सयाजीराव महाराज यांनी बडोदा संस्थानला सुधारणांसह वैभव प्राप्त करून दिले, असे म्हणता येईल.

सयाजीरावांनी पाडलेल्या तांब्याच्या नाण्यांचा आढावा आपण याआधीच्या लेखात घेतला होता. त्यांनी स्वतःची प्रतिमा असलेले चांदीचे रुपये (िेीीींरळीं र्ीीशिश) तसेच स्वतःची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या मोहराही छापल्या होत्या. क्रूड पद्धतीच्या (हाती पाडलेल्या) चांदीच्या नाण्यांमध्ये 1/8 रुपया, 1/4 रुपया, 1/2 रुपया तसेच एक रुपया या मूल्याची नाणी आहेत. या नाण्यांवर उजवीकडे वळलेल्या समशेरसमवेत देवनागरीतील ‘सा गा’ ही आद्याक्षरे तसेच हिजरी सन आढळून येते. एका बाजूस पर्शियनमध्ये बादशहाचे नावही आढळते. मशिनद्वारे पाडलेल्या चांदीच्या नाण्यांतही 1/8 रुपया – दोन आणे, 1/4 रुपया – 4 आणे, 1/2 रुपया – 8 आणे आणि रुपया या मूल्यांची अत्यंत सुबक अशी नाणी आहेत. यांवर सयाजीराव महाराजांचा चेहरा (िेीीींरळीं), आडवी समशेर, देवनागरीत लिहिलेले नाण्याचे मूल्य, विक्रम संवत आणि ‘सयाजीराव म. गायकवाड’ हे नाव असा तपशील आहे. ही नाणी पर्शियन लिपी वगळून पूर्णतः देवनागरीत आहेत. यातील विक्रमसंवत 1948 आणि 1949 या वर्षांची नाणी ही विक्रमसंवत 1951 ते 1956 या वर्षांत छापलेल्या नाण्यांपेक्षा आकाराने मोठी आहेत. याचसोबत सयाजीरावांनी 1/6 मोहर, 1/3 मोहर आणि 6.20-6.40 ग्राम्स वजनाची मोहर अशी सोन्याची नाणीही पाडलेली आहेत. अशा या सयाजीराव महाराजांनी तब्बल 63 वर्षे बडोद्याचा राज्यकारभार केला. या वैभवशाली सयाजीराव महाराजांचे दि. 6 फेब्रुवारी, 1939 रोजी मुंबई येथे निधन झाले. एका अर्थाने बडोद्याचे सुवर्णयुग संपुष्टात आले. नंतर सयाजीरावांचे नातू प्रतापसिंह महाराज हे गादीवर आले. त्यांनी देश स्वतंत्र होईपर्यंत राज्यकारभार केला. इसवी सन 1951 मध्ये बडोदा संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. प्रतापसिंह महाराजांनी आपल्या छोटेखानी कालावधीत सोन्याची 1/3 मोहर तसेच एक मोहर पाडलेली आहे. बडोदा संस्थानच्या नाण्यांचा इतिहास या रूपाने समाप्त झाला.


 

 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...