विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे ७ | मार्तंडराव होळकर, हरीराव होळकर आणि खंडेराव होळकर!

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

इंदोरचे होळकर घराणे ७ | मार्तंडराव होळकर, हरीराव होळकर आणि खंडेराव होळकर!

 

शिवछत्रपती स्थापित हिंदवी स्वराज्याचे रोपटे कालवश दुर्दैवाने मावळतीकडे झुकले होते. इसवी सन 1818 मध्ये पेशवाई आणि जणू काही पदसिद्ध छत्रपतींचे राज्यपद ही संपुष्टात आल्यागत झालेले होते. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ज्या मुघलांनी हे नवनिर्मित स्वराज्य बुडवायची एकेकाळी पराकाष्ठा केली होती त्यांचेही साम्राज्य लयाला जाऊन दूरदेशीचे इंग्रज आता अख्खा देश गिळंकृत करून बसले होते.

मल्हारराव होळकर दुसरे हे निपुत्रिक अवस्थेत मृत्यू पावले आणि पुन्हा होळकरशाहीच्या गादीच्या वारसाचा प्रश्न उभा राहिला. आता मल्हाररावांच्या विधवा पत्नी गौतमाबाई आणि मातोश्री कृष्णाबाई यांनी विचारविनिमय करून ओळखीच्या सरदार घराण्यातील बापूसाहेब होळकर यांचा चार वर्षांचा मुलगा दत्तक म्हणून घेतला. या अल्पवयीन महाराजा मार्तंडराव यांचा जन्म इसवी सन 1830 मध्ये झाला होता. मात्र केशरीबाई या मार्तंडरावांच्या माध्यमातून राजगादीवर आपली पकड ठेऊ पाहात आहेत, या भावनेतून होळकर राजवटीतील लोकांनी या महाराजा मार्तंडराव यांना विरोध दर्शवला आणि जेमतेम तीन महिन्यांतच त्यांनी आधीचे महाराजा मल्हारराव दुसरे यांनी बंदी म्हणून ठेवलेल्या कै. महाराजा यशवंतराव – पहिले यांचा पुतण्या हरीराव यांना महेश्वरच्या किल्ल्यातून 2 फेब्रुवारी, 1834 ला मुक्त करून 17 एप्रिल, 1834 रोजी इंदोरच्या होळकरशाहीच्या गादीवर बसवले. ब्रिटिशांनी याआधीच जनमानसाच्या विरोधात न जाण्याची उघड भूमिका घेतल्याने त्यांनीही या राजकीय उलथापालथीला सहमती दिली. बाल मार्तंडराव यांना ब्रिटिशांनी होळकरशाहीच्या गादीवर आजन्म हक्क न सांगण्याच्या बोलीवरून तहहयात रुपये 500/- प्रतिमाह तनखा /पेन्शन कबूल करायला लावून पुण्यास रवाना केले. मार्तंडराव हे फक्त तीन महिने आणि तेदेखील नावापुरते राजगादीवर होते. 21 मे, 1833 ते 10 मे, 1834 या वर्षभराच्या कालावधीत मल्हारराव दुसरे, मार्तंडराव आणि हरीराव असे तीन राज्यकर्ते ओळीने झाले. त्यामुळे हिजरी सन 1249 हे वर्ष छापलेला मल्हारनगर टांकसाळीचा रुपया हा नक्की कोणी पाडला, याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र मार्तंडरावांच्या तीन महिन्यांच्या अल्पशा कारकीर्दीतील एक परिपत्रक उपलब्ध आहे, ज्यामध्ये रघुपत हरिहर यांची टांकसाळ प्रमुख (निसबत टांकसाळ) म्हणून नोंद आढळते. यावरून निष्कर्ष नक्कीच काढता येतो, की हिजरी सन 1249 असलेला रुपया हा मार्तंडराव होळकर यांचाच असावा. मात्र मार्तंडरावांनी तांब्याची नाणी पाडल्याची कोणतीही नोंद नाही अथवा तशी नाणीही उपलब्ध नाहीत.

मार्तंडराव होळकर हे अत्यंत लहान वयातच म्हणजे 2 जून, 1849 रोजी अवघ्या 19 व्या वर्षी पुणे येथेच मरण पावले.

17 एप्रिल, 1834 रोजी हरीराव होळकरशाहीच्या राजगादीवर आरूढ झाले खरे, परंतु राज्यकारभाराचा विशेष अनुभव नसणारे, तितकेसे कार्यक्षम नसलेले आणि तब्येत ठीक नसणारे हरीराव यांनी दिवाण म्हणून नेमणूक केलेली रेवाजी फणसे, त्यांचा मुलगा राजाभाऊ, भवानी दीन, नारायणराव पळशीकर आदी मंडळीही आर्थिक सुबत्ता राखण्यास अथवा किमानपक्षी सांभाळण्यासदेखील सक्षम नव्हती, असे इतिहास सांगतो. एकवेळ अशी आली की राज्याचा महसूल घसरून 9 लाखांवर आला आणि खर्च मात्र 24 लाखांचा झाला. 1838 मध्ये तर अर्थव्यवस्था खूपच खालावली, इतकी की अखेर ब्रिटिश रेसिडेंटने ताकीद दिली. जर ही परिस्थिती बदलता येत नसेल तर आम्ही राज्यावर ताबा घेऊ. अखेर दस्तुरखुद्द महाराजा हरीराव यांनी यात जातीने लक्ष घातले, मात्र त्यांची खालावणारी तब्येत त्यांना साथ देईना. त्यांनी वेळोवेळी दिवाणपण बदलून बघितले. शिवाय काही नवीन नेमणुका करून पाहिल्या, पण व्यर्थ. ब्रिटिश रेसिडेंटचा दबाव सातत्याने वाढत होता अन् त्यात हरीरावांची नाजूक झालेली तब्येत होती. या दबावामुळे अखेर त्यांनी राजगादीला वारस म्हणून सरदार बापू होळकर यांचे सुपुत्र खंडेराव या 11 वर्षांच्या मुलाला 2 जुलै, 1843 रोजी विधीयुक्त दत्तक घेतले. मात्र गव्हर्नर जनरल लॉर्ड एलेनबरो यांच्याद्वारे याची कायदेशीर पूर्तता होण्याआधीच महाराजा हरीराव यांनी 24 ऑक्टोबर, 1843 रोजी ढासळत्या प्रकृतीमानामुळे अखेरचा श्वास घेतला. हरीरावांच्या कारकीर्दीत तांब्याची (विशेष मानाने नाहीसारखीच) आणि चांदीचा 1/8, 1/4 , 1/2 आणि एक रुपया अशा दर्शनी मूल्यांची सूर्यछाप असलेली मल्हारनगर टांकसाळीची नाणी पाडली गेली होती. यातील तांब्याची वैशिष्ट्यपूर्ण नाणी म्हणजे भूमितीय आकृतीसदृश वाटणारी चिन्हे तसेच सुदर्शन चक्राप्रमाणे भासमान होणारे चक्र, गाड्यासह असलेली प्रचंड आकाराची तोफ (लरपपेप) अशी चिन्हे यांवर आढळून येतात. नंदी आणि शिवलिंग असणारी तांब्याची नाणी पण हरीरावांच्या कारकीर्दीत पाडलेली आपणांस दिसून येतात.

या अत्यंत दगदगीच्या कारकीर्दीत होळकरशाहीच्या गादीवर अल्पकाळासाठी आलेले आणखी एक नाव म्हणजे महाराजा खंडेराव होळकर. इंदोरजवळील एका परगण्यात राहणारे सरदार बापू होळकर यांचा हा मुलगा. हरीराव महाराज निपुत्रिक असल्यामुळे त्यांनी खंडेरावांना दत्तक घेतले होते. हरीरावांच्या निधनानंतर खंडेराव महाराज हे 13 ऑक्टोबर, 1843 रोजी सिंहासनारूढ झाले. खंडेराव हे वयाने तसेच शारीरिक मानसिकरीत्या पण कमजोर असल्याने ते सदैव दिवाण राजाभाऊ फणसे यांच्यावर विसंबून होते. यामुळे होळकरशाहीची अवस्था अधिकच बिकट झाली. अखेर ईस्ट इंडिया कंपनीने 27 डिसेंबर, 1843 रोजी ही परिस्थिती बदलण्यासाठी होळकरशाहीचे व्यवस्थापन हाती घेतले. मात्र अचानकपणे अवघ्या 3 महिन्यांच्या छोट्याशा कारकीर्दीनंतर खंडेराव महाराजांचे 17 फेब्रुवारी 1844 ला निधन झाले. या लहानशा काळात त्यांनी तांब्याची नाणी पाडलेली नाहीत, असा नाणकतज्ञांचा कयास आहे. मात्र कदाचित हिजरी सन 1259 हे वर्ष दिसणारे/छापलेले मल्हारनगर टांकसाळीचे नाणे हे या अल्पायुषी खंडेराव महाराजांचे असावे, असा निष्कर्ष मांडता येतो.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...