विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

सयाजीराव पहिले, मानाजीराव, फत्तेसिंहराव, गोविंदराव गायकवाड पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

 

सयाजीराव पहिले, मानाजीराव, फत्तेसिंहराव, गोविंदराव गायकवाड पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

 

बडोद्याचे गायकवाड घराणे हे पेशवेकालीन इतिहासात एक प्रख्यात असे गणले गेलेले घराणे आहे. दिल्लीपतीला टक्कर देण्यासाठी शाहू छत्रपतींच्या राज्यकालात थोरल्या बाजीराव पंतप्रधान पेशव्यांनी मध्य – उत्तर हिंदुस्थानातील शिंदे, होळकर, पवार यांच्यासमवेत गुजरातेत उभारलेला हा हिंदवी स्वराज्यरक्षक गायकवाड घराण्याचा बलदंड बुरूज होय.

दमाजी गायकवाड यांनी स्वराज्याची राजधानी सातारा आणि तत्कालीन मध्यवर्ती सत्ताकेंद्र पुणे यांपासून दूरवरच्या अपरिचित मुलुखात आपले बस्तान बसवले होते. सेनापती दाभाडे सरकार यांचे छत्रपतींच्या विरोधातील बंड मोडून काढण्यासाठी पंतप्रधान पेशव्यांना नाइलाजास्तव समशेर उचलावी लागली अन् तेव्हा या गायकवाडांनी त्यांना खंबीर मदत केली होती, हा इतिहास आहे. शाहू छत्रपतींच्या अनुज्ञेने गायकवाडांना समशेरबहाद्दर तसेच सेनाखासखेल हे किताबही प्राप्त झाले होते. बडोद्याच्या नाण्यांवरदेखील या किताबाचा उल्लेख आपणांस बघता येतो. गायकवाड घराण्याचे संस्थापक दमाजी गायकवाड हे सुरुवातीला शाहू छत्रपतींचे सेनापती खंडेराव गायकवाड यांच्या सैन्यात सरदार म्हणून कामगिरी करीत होते. पुढे दमाजी हे गुजरातवर स्वतंत्रपणे स्वारी करू लागले. निजामासोबत बाळापूर येथे झालेल्या लढाईत दमाजींनी चांगला नावलौकिक मिळवला. याकारणे खंडेराव यांनी त्यांची शाहू छत्रपतींकडे शिफारस केल्याने त्यांना समशेरबहाद्दर ही पदवी देण्यात आली तसेच सेनापती दाभाडे सरकार यांचे मुतालिक म्हणूनही १७२० मध्ये त्यांची नेमणूक झाली. पण लगेचच दमाजी इसवी सन १७२१ मध्ये मृत्यू पावले आणि त्यांचा पुतण्या पिलाजी हा सर्वाधिकारी झाला. आधी नवापूर व नंतर सोनगड हे बराच काळ त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. मोगलांच्या वर्चस्वाच्या भांडणात भाग घेऊन पिलाजीने माहीचा चौथाईचा अधिकार मिळविला. दाभाडे आणि पंतप्रधान पेशवे यांच्यातील युद्धानंतर डभोई व बडोदा ही शहरे पिलाजींकडे आली व यातूनच बडोदा संस्थान निर्माण होऊन ती शहरे अखेरपर्यंत गायकवाड घराण्यात राहिली.
पुढे मोगलांचा राजपूत सुभेदार अभयसिंह याने पिलाजींचा विश्वासघाताने खून केला. यामुळे त्यांचा मुलगा दमाजी दुसरा व भाऊ तसेच दाभाडे सरकार यांच्या विधवा पत्नी यांनी भिल्ल व कोळी यांच्या साहाय्याने बडोद्यावर चाल करून १७३४ मध्ये बडोद्याचा ताबा घेतला. दमाजीने न डगमगता बडोद्यासह गुजरातवर आपला पक्का अंमल बसवला. गायकवाड हे सामान्यतः पेशवे म्हणजे मध्यवर्ती सत्ताकेंद्र शाहू छत्रपतींच्या ठायी एकनिष्ठ होते. पुढे शाहू महाराजांच्या १७४९ मधील निधनानंतर ताराबाईंनी रामराजास पुढे करून सत्ता मिळवण्याचा यत्न केला. यात दमाजीने ताराबाईंचा पक्ष घेतल्याने पेशवे आणि दमाजी गायकवाड यांत काही काळ वितुष्टही आले. पण दमाजी यातून लवकरच बाहेर पडला. यानंतर पेशव्यांनी त्यास सेनाखासखेल हा किताब दिला. दमाजीराव दुसरे हे १७६१ ला पानिपतच्या संग्रामात सहभागी होऊन परत आले होते. दमाजीराव १७६७ मध्ये मरण पावले आणि त्यांच्या सयाजीराव पहिले, गोविंदराव, फत्तेसिंहराव आणि मानाजीराव या चार पुत्रांमध्ये वारसाहक्काचे तंटेबखेडे सुरू झाले. हे चौघेही आलटूनपालटून बडोद्याच्या गादीवर विराजमान झाले होते. सयाजीराव पहिले हे तितकेसे सक्षम नसल्याने गोविंदराव हे त्यांचे मुतालिक / ठशसशपीं म्हणून कार्यभार सांभाळत होते. गोविंदराव गायकवाड यांचा जन्म १७५१ मध्ये झाला होता. ते पहिल्यांदा इसवी सन १७६८ मध्ये राज्याधिकारी झाले होते. त्यांनी या वेळी तीन वर्षे म्हणजेच १७७१ पर्यंत राज्यकारभार सांभाळला. पुढे १७९३ मध्ये मानाजीराव गायकवाड मृत्यू पावल्यानंतर गोविंदराव पुन्हा गादीवर आले (डशलेपव ींशीा ेी ीशळसप). पेशव्यांच्या साहाय्याने ते जरा कुठे स्थिरस्थावर होतात तोच त्यांच्या कान्होजी नामक अनौरस पुत्राने अरबांच्या मदतीने बडोदा संस्थानात धुमाकूळ घातला, असे इतिहास सांगतो. या सगळ्यास तोंड देताना गोविंदराव पार जेरीस आले. या परिस्थितीतच १९ सप्टेंबर, १८०० मध्ये गोविंदराव गायकवाड यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या एका पत्नीचे नाव गेहनाबाई होते तसेच त्यांना आनंदराव तसेच सयाजीराव दुसरे ही दोन मुले होती. त्यांच्यामागे त्यांचा आनंदराव हा मुलगा बडोद्याच्या गादीवर आला. हा मुळातच सर्वार्थाने कमकुवत आणि दुबळा होता. त्यामुळे साहजिकच कान्होजीच्या बंडास आणि कारवायांना जोर चढला. हे पाहून १८०२ मध्ये इंग्रजांनी हस्तक्षेप करून अरबांना बडोद्यातून पळवून लावले. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मेजर वॉकर हा रेसिडेंट नात्याने बडोद्यात राहिला. यामुळे गुजरातमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया भक्कम रोवला गेला, असे म्हणता येईल. यानंतर फत्तेसिंहराव यांनी इंग्रजांसोबत १८०२ आणि १८०५ मध्ये तैनाती फौजेचा (संरक्षण) तहकरार केला. यामुळे बडोद्याच्या राज्यकारभारात इंग्रजांचे वर्चस्व वाढून सर्व राजकीय कारभार त्यांच्याच कलाने होऊ लागला. पुढे बडोदा संस्थानने १८१७-१८ मध्ये इंग्रजी सत्तेशी अजून एक तह केला. मात्र यामुळे गायकवाड आणि पेशवे दुसरे बाजीराव यांच्यातील दुवा आता कायमचा तुटला. अर्थात यावेळपावेतो पेशवाईदेखील अखेरच्या घटका मोजत होती.
बडोद्याचे संस्थापक दमाजी पहिले, पिलाजीराव, दमाजीराव दुसरे यांनी आपल्या अधिकारात कोणतीही नाणी पाडल्याचे आपणास आढळून येत नाही. असे अनुमान काढता येते की कदाचित बडोदा राज्य स्थिरस्थावर होण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र संस्थानिक राज्यकर्त्याच्या नात्याने नाणी पाडली नसावीत. बडोद्याचे पहिले स्वतंत्र नाणे हे मानाजीराव गायकवाड यांनी इसवी सन १७८९ ते १७९३ या आपल्या कारकीर्दीत पाडले, अशी नोंद दिसून येते. हा हाती पडलेला (र्लीीवश रिीींंशीप) चांदीचा रुपया असून मराठेशाहीच्या नाण्यांच्या धर्तीवर आहे तसेच प्रथेनुसार मुघल बादशाह शाहआलम दुसरा याचे नाव पण नाण्यावर छापलेले आहे. मात्र बडोद्याच्या राज्यकर्त्यांचे नाणे म्हणून यावर देवनागरीत ‘मा’ हे मानाजीराव महाराज यांचे आद्याक्षर आणि उभी छोटी तलवार/ समशेर आढळते. याचप्रमाणे फत्तेसिंहराव महाराज, गोविंदराव महाराज यांची चांदीची नाणीदेखील याच धर्तीवर पाडलेली आढळतात. यात वैशिष्ट्य म्हणजे गोविंदराव गायकवाड यांच्या रुपयावर त्यांच्या नावाचे आद्याक्षर ‘गो’ हा शब्द समशेरीसोबत देवनागरीऐवजी पर्शियन लिपीत छापलेला आहे. फत्तेसिंहराव महाराज यांच्या रुपयावर पण उभी समशेर आढळून येते. मात्र या चारही राज्यकर्त्या भावांमध्ये सयाजीराव महाराज पहिले यांनी पाडलेले कोणतेही नाणे दिसून येत नाही.


No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....