इतिहासाने नोंद घेतलेली दिवाण मंडळी.
लेखन :प्रकाश लोणकर
मराठ्यांच्या
इतिहासात औरंगजेब नंतर त्यांचा अन्य कुणाशी जास्तीत जास्त संघर्ष झाला
असेल तर तो निजामाशी.निजामशाहीतील अत्यंत महत्वाचा म्हणून गणला जाणाऱ्या
विठ्ठल सुंदर यांचा आज आपण परिचय करून घेत आहोत.
विठ्ठल
सुंदर परशुरामी उत्तर मराठेशाहीतील साडे तीन शहाण्यांपैकी एक(पूर्ण)शहाणे
म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.त्यांचे वास्तव्य सध्याच्या अहमदनगर
जिल्ह्यातील संगमनेर ह्या गावी होते,म्हणून त्यांना संगमनेरकर म्हणून पण
ओळखले जाते.त्या काळात अनेक कर्तृत्ववान मंडळी भाग्य अजमविण्यासाठी आपली
मूळ गावे सोडून अन्यत्र जात असत.त्यानुसार विठ्ठल सुंदर पण संगमनेरहून
पुण्याला येते झाले.त्यांना पेशव्यांकडे पहिली संधी सदाशिवरावभाउंचे
(जन्म-२९-०८-१७३०,मृत्यू-१४-०१-१७६१) शागीर्द म्हणून मिळाली.आपल्या
शागीर्दाच्या अंगच्या गुणांनी प्रभावित होऊन सदाशिवरावभाऊनी त्यांची तैनाती
आपल्या चुलत भावाकडे म्हणजे नानासाहेब पेशव्यांकडे (कार्यकाल-१७४०-१७६१)
केली.नानासाहेब पेशव्यांकडे असताना त्यांनी मारलेल्या टोमण्याने अपमानित
होऊन विठ्ठल सुंदर यांनी पेश्व्यांकडील चाकरीला रामराम ठोकला.मोगलायीतील
प्रसिद्ध मुत्सद्दी आणि निजामाचे दिवाण रामदासपंत यांच्याशी असलेल्या
ओळखीने त्यांना निजाम दरबारी प्रवेश मिळाला. ह्या रामदासपंतांचा एका
सैनिकाने इ.स. १७५२ मध्ये खून केला होता.यावरून असे अनुमान काढता येयील कि
विठ्ठल सुंदर यांनी इ.स.१७५२ पूर्वी कधीतरी निजाम दरबारची वाट धरली
असावी.जात्याच हुशार आणि चाणाक्ष असलेल्या विठ्ठल सुंदरांच्या गुणांना
पहिला निजाम उल मुल्क याच्या कारकिर्दीत पोषक वातावरण मिळून त्यांनी
अल्पावधीतच निजामशाहीत मानाचे स्थान मिळवले.निजाम उल मुल्कची निम्मी हयात
औरंगजेब बरोबर दक्षिणेकडील स्वारीत गेली होती.ह्या स्वारीत त्याच्या
नावावर विशेष पराक्रम गाजव्ल्याची नोंद नसली तरी दक्षिणेतील आपल्या
प्रदीर्घ वास्तव्यात-सुमारे २५ वर्षे-त्याने येथील राजकीय,सामाजिक
वातावरणाची चांगली माहिती मिळविली जिचा त्याने पुढे मराठ्यांना त्रास
देण्यात भरपूर वापर केला.औरंगजेब नंतर मराठ्यांना जर कुणी जास्त छळले असेल
तर ते ह्या निजाम मंडळीनी! मराठ्यांचा संपूर्ण विनाश हेच त्यांचे कायम
ध्येय राहिले होते.परंतु मराठे सुद्धा काही कमी नव्हते.औरंगजेब्सारख्या
बलाढ्य शत्रूशी त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ युद्ध खेळून त्याला
निराश होऊन इथल्याच मातीत मिळण्यास मजबूर केले होते.निजामाने पण विठ्ठल
सुंदरांचा मराठ्यांना नाना प्रकारे सतावण्यास पुरेपूर उपयोग करून
घेतला.प्रारंभीच्या काळात विठ्ठल सुंदर यांनी आपल्या पदरी तीन हजार
लढवय्यांची फौज तयार केली होती.निजाम अलीने त्यांना आपल्या सैन्यात ` फौजी
सरदार ` म्हणून नियुक्ती दिली.ते निजामाच्या खास विश्वासातील व्यक्ती
म्हणून हैदराबादेत प्रसिद्ध झाले होते.
तृतीय
पानिपत युद्धात अडकण्यापूर्वी म्हणजे इ.स.१७६० पर्यंत--उदगीर इथे झालेल्या
लढाई पर्यंत—मराठ्यांनी निजामाला एकूण चार वेळा शरणागती पत्करावायास भाग
पाडले होते.सदाशिवरावभाऊनी उदगीरच्या लढाईत( इ.स.१७५९)निजाम सेनेचा धुव्वा
उडवून आधीच्या लढायातील थकबाकी रु.२५ लाख+ह्यावेळच्या युद्धासाठीचे रु.६०
लाख=एकूण रु.८५ लाख इतक्या रकमेचे मुलुख,शिवनेरी,देवगिरी,अशिरगड,नळदुर्ग
असे किल्ले आणि हैदराबाद व विजापूरची चौथाई मराठ्यांना देण्याचे निजाम आणि
विठ्ठल सुंदर यांना मान्य करायला लावले.याच सुमारास उत्तरेकडे अहमदशहा
अब्दाली चालून येत असल्याची बातमी आल्याने मराठे त्याच्या बंदोबस्तासाठी
उत्तरेकडे रवाना झाले आणि निजामाला मराठ्यांविरुद्ध कारवाया करायला रान
मोकळे झाले.दुर्दैवाने पानिपत युद्धात मराठ्यांची अपरिमित हानी होऊन
त्यांच्या निजामासाहित अन्य शत्रूंना परमावाधीचा आनंद झाला.त्यात भरीस भर
म्हणून पेशव्यांच्या घरात राघोबा दादा आणि थोरल्या माधवराव ह्या काका
पुतण्यात पेशवे पदावरून मराठ्यांसाठी अत्यंत नुकसानकारक ठरलेला गृह कलह
सुरु झाला.पानिपत युद्धातील पिछेहाट,पेशवे कुटुंबियातील वाद आणि काही मराठा
सरदार निजामाला मिळाल्याने निजामाला मराठ्यांविषयी वाटणारी भीती नाहीशी
होऊन त्याने नोवेंबर १७६१ च्या महिन्यात उदगीर तहान्वये मराठ्यांना दिलेले
इलाके परत तर घेतलेच शिवाय पुण्याच्या दिशेने कूच सुरु केले.पानिपत युद्धात
झालेल्या सैन्य हानीमुळे थोरल्या माधवरावांनी निजामाला समोरासमोर भिडण्या
ऐवजी मराठी फौज निजामाच्या मुलुखात घुसवून त्याच्या मुलुखाची वाताहत
केली.इकडे निजाम डिसेंबर मध्ये पुण्यापासून वीस मैलांवर असलेल्या चास
इथपर्यंत आला होता.येताना वाटेतील हिंदू मंदिरे,तीर्थस्थाने यांची त्याने
खूप विटंबना केली.तो उरळीला येयीपर्यंत मराठ्यांच्या फौजाही मोठ्या
संख्येने त्या भागात जमा होऊन त्यांनी सगळी कडून निजामाला घेरले.ह्यावेळी
सुद्धा निजामाला खडे चारण्याची संधी मराठ्यांना उपलब्ध झाली होती.पण
त्यावेळी पुण्यात असलेल्या राघोबा दादांनी थोरल्या माधवरावांशी चर्चा,सल्ला
मसलत न करता २९ डिसेंबर १७६१ रोजी निजामाशी तह करून उलट त्याला २७ लाखांचा
मुलुख देऊ केला. माधवरावांना जानेवारी महिन्यात हि बातमी कळाली,त्यांना
काहीही करता आले नाही.दादांनी निजामाबरोबर तह करण्याचे अंतस्थ कारण
पेशवाईच्या वादात गरज पडल्यास निजामाचे साह्य मिळविणे हे होते. याआधी
सांगितल्या प्रमाणे विठ्ठल सुंदर मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या पेशव्यांना
परास्त करण्यासाठी निजामाला बहुमोल सल्ला मसलत देत असत.त्यांच्या कामगिरीवर
खुश होऊन निजामाने विठ्ठल सुंदरना १९ सप्टेंबर १७६२ रोजी राजे बहाद्दूर व
प्रतापवंत असे दोन किताब तसेच दिवाणगिरी दिली. तसेच आपले सेनापती म्हणूनही
नियुक्त केले.इब्राहिमखान गारद्याला( तो मराठ्यांकडे येण्यापूर्वी) विठ्ठल
सुंदर यांनी निजामाच्या चाकरीत आणून त्याच्या कडून निजामाचा तोफखाना मजबूत
बनवून घेतला.तसेच इतरही अनेक लष्करी सुधारणा करून निजामाचे लष्करी सामर्थ्य
वाढविले.आपल्या दिवाणाच्या कामगिरीने संतुष्ट होऊन निजामाने विठ्ठल
सुंदरना औरंगाबाद परगण्यातील मौजे पिंपरी हा गाव जहागीर म्हणून देऊन टाकला.
राघोबा
दादा आणि थोरले माधवराव यांच्यातील संघर्ष काही केल्या मिटायचे नांव
घेईना. सप्टेंबर १७६२ मध्ये शनिवारवाड्यात नजरकैदेत असलेल्या राघोबा
दादांनी अनुष्ठान समाप्तीची सबब सांगून पेशव्यांना गुंगारा देऊन पेशवाईचा
प्रश्न लष्करी बळावर सोडविण्याचे ठरविले. त्यासाठी निजामाच्या सरदार
मुरादखान,रामचंद्र जाधव,विठ्ठल सुंदर इ.मुत्सद्द्यास आपल्या मदतीसाठी
बोलाविले.त्यानुसार मुराद्खान आणि विठ्ठल सुंदर आपल्या फौजा घेऊन राघोबा
दादांस सामील झाले.याशिवाय जानोजी भोसले,मल्हारराव रास्ते,गमाजी यमाजी हे
मराठ्यांकडील सरदार पण राघोबा दादांस मिळाले.थोरल्या माधवरावांच्या फौजेत
मल्हारराव होळकर,पिराजीराव नाईक निंबाळकर,त्रिंबकराव पेठे,गोपाळराव
पटवर्धन,आनंदराव रास्ते आदी सरदार होते.पुष्कळ मराठे सरदाराना
दोघेही-राघोबा दादा आणि थोरले माधवराव-आपले धनी वाटत! १२ नोवेंबर १७६२ रोजी
दोन्ही फौजात ओतूर जवळ आळेगाव इथे चकमक झाली.निष्कारण मनुष्यसंहार
टाळण्याच्या हेतूने थोरल्या माधवराव पेशव्यांनी राघोबा दादांसमोर शरणागती
पत्करली.तहाची कलमे विठ्ठल सुंदर यांनी ठरवली.त्यानुसार मराठ्यांनी उदगीर
लढाईच्या वेळी निजामाकडून मिळवलेला ८५ लाख रुपयांचा मुलुख व दौलताबादचा
किल्ला निजामास परत करण्याचे माधवरावांना मान्य करावे लागले.
राक्षसभुवनची
लढाई आणि विठ्ठल सुंदरांचा शेवट: निजाम आणि मराठे ह्या दोन्ही बाजूंकडील
लहान मोठे सरदार,मुत्सद्दी सुमारे एक लाखावर फौजेसह पाउण महिना पावेतो
आळेगावच्या तळावर जमले होते.इथेच मराठेशाहीतील साडेतीन शहाण्यांची संकल्पना
जन्मास आली असावी असे गो.स.सरदेसाई म्हणतात.साडेतीन शहाण्यान्पैकी निजामचे
दिवाण विठ्ठल सुंदर आणि नागपूरकर जानोजी भोसल्यांचे दिवाण देवाजीपंत
चोरघडे ह्या दोघा शहाण्यांनी जानोजी भोसल्यांना छत्रपती आणि राघोबा दादांस
पेशवा बनविण्याचे कारस्थान रचले.९ फेब्रुवारी १७६३ रोजी कर्नाटकातील
कल्बर्ग्या नजीक निजाम आणि जानोजी भोसले यांच्यात वाटाघाटी होऊन साताऱ्यास
जानोजी भोसले यांस छत्रपतीपदी स्थानापन्न करण्याचे दोघात ठरले.भीमा नदी
पलीकडील सगळा मुलुख निजामाच्या ताब्यात देऊन जानोजी भोसले आणि निजामाच्या
सल्ल्याने कारभार करावा अशा मागण्या माधवरावांकडे केल्या
गेल्या.निजाम,जानोजी भोसले यांच्या सुमारे ८०००० संयुक्त फौजेने प्रचंड
तोफखाना घेऊन मराठी मुलुखात आक्रमण केले.याचा परिणाम असा झाला कि राघोबा
दादा सहित समस्त मराठे सरदार आपले मतभेद विसरून स्वराज्य रक्षणार्थ एकत्र
झाले.मल्हारराव होळकर गनिमी युद्धात निष्णात म्हणून त्यांना आणावयास राघोबा
दादांनी नारो शंकरांस वाफगाव इथे रवाना केले. मराठ्यांच्या फौजा नगर,पैठण
ह्या मोगली मुलुखाची वाट लावीत ७ मार्च १७६३ ला औरंगाबाद इथे आल्या.होळकर
१२ तारखेस सामील झाले.औरंगाबाच्या किल्लेदाराने मराठ्यांना दोन लाख रुपये
खंडणी देऊन त्यांचे संरक्षण घेतले.पुढे मराठ्यांच्या फौजा जानोजी
भोसल्यांचा वऱ्हाड प्रांत लुटत
पैठण,नळदुर्ग,उदगीर,हैदराबाद,गुलबर्गा,बार्शी पानगाव, मार्गे बीड इथे ८
ऑगस्ट १७६३ रोजी आल्या.दुसरीकडे एप्रिल/मे महिन्यात निजाम आणि जानोजी
भोसल्यांच्या फौजा मराठी मुलुखात घुसल्या.स्वतः निजाम पुणे शहरात
आला.विठ्ठल सुंदरने सासवड,तसेच सखाराम बापूंचे हिवरे गाव जाळले.पेशवे
कुटुंबीय सिंहगडावर गेली,नाना फडणीस एक वस्त्रानिशी जीव वाचवून गडावर
गेले.पुरंदर ते शिरवळ सर्वत्र लुट,जाळपोळ झाली.पुण्याचा अपवाद वगळता
निजामाविरुद्ध मराठ्यांना भरपूर यश मिळाले.जानोजी भोसले आणि त्यांना
मिळालेले इतर सरदार निजामाचा पक्ष सोडून स्वराज्य रक्षणार्थ पुन्हा मराठी
सैन्याला मिळाले.निजामाचा भाऊ बसालत जंग पण पेशव्यांना येऊन
मिळाला.निजामाच्या मुलुखात घुसलेल्या मराठ्यांच्या फौजा परतीच्या वाटेवर
होत्या.त्यावेळी निजामाने आधी हैद्राबादला जाण्याचे ठरविले होते पण नंतर
बेत बदलून औरंगाबादकडे जाण्याचे ठरविले.जानोजी भोसले अजून निजामाच्या
छावणीतच होते.त्यांनी निजामाचा बेत ताबडतोब मराठ्यांना कळवून निजाम गोदावरी
नदी पार करण्यापूर्वीच त्याच्यावर हल्ला करण्याचा मराठ्यांना सल्ला
दिला.औसा,धारूर पर्यंत पोहचल्यावर मराठे आपल्या पाठीवर असल्याचे निजामाला
कळल्यावर त्याने मागे फिरून औरंगाबादला जाण्याचे ठरविले.गोदावरीवर आल्यावर
तिला आलेला महापूर पाहून मुख्य फौज,भारी तोफखाना व जड सामान विठ्ठल सुंदर
यांच्या हुकुमतीत सध्याच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन
नजीक असलेल्या धोंडराई इथे ठेवून स्वतः जनानखाना,बुणगे व काही हलक्या तोफा
घेऊन निजाम पलीकडे गेला. मराठे याचीच वाट पाहत होते.हा दिवस होता १०
ऑगस्ट १७६३. विठ्ठल सुंदर स्वतः हत्तीवर स्वार होऊन निजामाच्या सैन्याचे
नेतृत्व करत होते तर माधवराव घोड्यावर स्वार होऊन आपल्या फौजेत
होते.होळकरांचा शिलेदार महादजी शितोळे चौखूर घोडा उधळीत माधवरावां जवळ आला
आणि आम्ही सेवक हजार असताना श्रीमंतानी जीव धोक्यात घालू नये व विठ्ठल
सुंदर आपल्यावर सोपवावा अशी विनंती केली. त्यावर माधवरावांनी महादजी
शितोळेस शाबासकी देऊन विठ्ठल सुंदर तुज सोपविला,काम फत्ते केल्या आमचा बसता
घोडा बक्षीस देऊ असे सांगितले.महादजी शितोळे विठ्ठल सुंदरच्या रोखाने
तीरासारखा निजामी फौजेत घुसला.अचूक भालाफेक करून विठ्ठल सुंदर यांचे मस्तक
धडा वेगळे केले.भाल्याच्या टोकावर खोचून सबंध रणभूमीवर फिरविले.सेनापती
पडल्याचे कळताच निजामाच्या सैन्याची पळापळ सुरु झाली.निजाम सैन्याचा अत्यंत
लाजीरवाणा पराजय झाला.जखम दरबारात महादजी शितोळे न च्या बहादुरीचा गौरव
करत माधवरावांनी त्यास आपला घोडा,सरदारी आणि सरंजामा साठी १०००० रुपये
वसुलाची अंकली आणि मांजरी हि गावे इनाम दिली.या समयी विठ्ठल सुंदर यांचा
पुतण्या विनायक चिंतामण हि मारला गेला,पुत्र व्यंकटेश युद्धापूर्वीच मरण
पावला होता.विठ्ठल सुंदर यांनी निजाम राज्याची केलेली सेवा लक्षात घेऊन
निजामाने परशुरामी घराण्याला बीड,परभणी,औरंगाबाद या भागातील ५०००० रुपये
वसुलाची १८ गावे जहागीर म्हणून दिली होती.विठ्ठल सुंदर नंतर त्यांच्या सात
पिढ्यांचा निजाम दरबाराशी संबंध होता.सध्या विठ्ठल सुंदर परशुरामी यांचे
घराणे ` राजा गणेश `म्हणून हैद्राबाद शहरात ओळखले जाते.
# प्रकाश लोणकर
संदर्भ:१-मराठी रियासत- खंड ५- गो.स.सरदेसाई
२-पेशवे-ले.श्रीराम साठे
३-पेशवाई-ले.कौस्तुभ कस्तुरे
४-मराठ्यांचा इतिहास-खंड दोन आणि तीन,संपादक ग.ह.खरे आणि अ.रा.कुलकर्णी
५- विठ्ठल सुंदर यांच्या राक्षसभुवन येथील समाधीचे छायाचित्र-रामभाऊ लांडे पाटील.
No comments:
Post a Comment