लेखन :प्रकाश लोणकर
रामचंद्र मल्हार सुखठणकर उर्फ रामचंद्रबाबा शेणवी (बाबा) हे शिंद्यांचे दिवाण तर होतेच पण पेशवे परिवारातील सदस्यांसाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व सुद्धा होते.गुंतागुंतीच्या,क्लिष्ठ बाबीत पेशवे परिवारातील व्यक्ती त्यांच्याकडून सल्ला,मार्गदर्शन घेण्यात कमीपणा मानत नसत इतका आदर बाबांनी बुद्धिमत्ता, स्वामिनिष्ठा, निःस्पृ,निःस्पृहपणा,स्पष्टवक्तेपणा इ.गुणांच्या जोरावर मिळविला होता.त्यामुळे ते अनेकांचे गुरु, सल्लागार, मार्गदर्शक होते.
बाबांचा जन्म तत्कालीन गोव्यात इ.स.१६७५ मध्ये झाला.मोगलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर छ.शाहू महाराज साताऱ्याला १ जानेवारी १७०८ रोजी सिंहासनस्थ झाले.कोल्हापूरला अगोदरच ताराराणी छ.राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर (मार्च १७००) आपला पुत्र शिवाजी द्वितीय याच्या वतीने मराठ्यांचे राज्य सांभाळत होत्या. मराठ्यांच्या दोन्ही राज्यांमध्ये आपल्या कर्तबगारी,विविध गुणांना वाव मिळेल हा हेतू मनात बाळगून बरीच महत्वाकांक्षी मंडळी आपले भाग्य अजमावण्यासाठी कोल्हापूर/सातारा दरबारात येऊ लागली.रामचंद्र मल्हार सुखठणकर हे अशांपैकी एक होते.बाबा इ.स.१७१० मध्ये वयाच्या पस्तिसाव्या वर्षी सातार दरबारच्या सेवेत रुजू झाल्यावर त्यांना सावंतवाडी जवळच्या आरवली गावच्या कुलकर्ण पदी नियुक्ती मिळाली.पण सावंतवाडीचे फोंड सावंत ताराराणींच्या पक्षातील असल्याने करवीर गादीशी वाद्विवाद टाळण्याच्या हेतूने छ.शाहू महाराजांनी बाबांना साताऱ्यास आणले.यथावकाश बाबांची नियुक्ती मामलेदार पदावर झाली.कुशाग्र बुद्धीच्या बाबांची पेशव्यांचे मुतालिक अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाळाजी विश्वनाथ (थोरल्या बाजीरावांचे पिताश्री) यांच्याकडे शिफारस केली.बाळाजी विश्वनाथांनी बाबांना पुण्याला आणून त्यांच्यावर फडाची( हिशेब खाते) जबाबदारी सोपवली . इ.स.१७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ ह्या भट घराण्यातील प्रथम पेशव्याचे बोट धरून पुण्यात आलेल्या बाबांनी बाळाजी विश्वनाथ,थोरले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे ह्या तिन्ही पेशव्यांच्या कारकिर्दीत अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले.मराठ्यांच्या दौलती विषयी राजकारण करताना त्यांचा दृष्टीकोन बऱ्याचदा व्यापक असायचा.त्यामुळे उत्तरायुष्यात त्यांचे आणि नानासाहेब पेशव्यांचे संबंध काहीसे दुरावले गेले.असे असूनसुद्धा नानासाहेबांच्या मनात बाबांविषयीचा आदर कायम राहिला होता.
रामचंद्र मल्हार उर्फ रामचंद्रबाबा सुखठणकर यांच्या योगदानाविषयी माहिती:
१ पेशव्यांच्या कारभारात स्वतंत्र हिशेब खात्याची( फड ) स्थापना: महसूल अधिकारी/कारकुनांना जमाखर्चाचे प्रशिक्षण देऊन त्याची काटेकोर पद्धती निर्माण केली.सखाराम बापू बोकील,रामजी अनंत,गंगोबा तात्या चंद्रचूड,नाना फडणीस,महादजी/त्र्यंबक पुरंदरे आदी खाशा मंडळीना बाबांनी फडाच्या कामात तरबेज केले.दस्तुरखुद्द चिमाजी अप्पा,त्यांचे पुत्र सदाशिवरावभाऊ, नानासाहेब,रघुनाथराव,इ.पेशवे कुटुंबियांचे बाबा राजकारण,हिशेब,फडातील किचकट कामे आदी बाबतीत बाबा ह्या सर्वांचे गुरु झाले! त्यांचा सदाशिवरावभाऊंवर तर विशेष जीव होता.
२-माळव्याचे मराठा सरदारात सर्वमान्य वाटप:इ.स.१७३३ पर्यंत मराठ्यांनी मोगलांकडून बहुतेक सगळा माळवा काबीज केला होता.शिंदे,होळकर,पवार यांनी माळव्यात मोगलांचा अंमल उठवून उज्जैन,इंदूर,धार,देवास या ठिकाणी हळूहळू मराठ्यांच्या राजधान्या तयार केल्या होत्या.रामचंद्र बाबांची याबाबतीतली सल्ला मसलत खूपच उपयुक्त ठरली.पुढे ह्या सरदारांत माळव्याच्या महसूल वाटपावरून वाद निर्माण होऊन प्रकरण विकोपास गेले.थोरल्या बाजीराव पेशव्यांनी रामचंद्र बाबांकडे हा वाद सोपविला.बाबा जमाखर्च,हिशेब तसेच राजकीय मसलती,कारस्थाने यांत चांग्लेच तरबेज झाले होते. तसेच त्यांचा तिन्ही सरदारांवर नैतिक प्रभाव सुद्धा होता.बाबांनी माळव्यातील महालांचे ( महसुली विभाग )क्षेत्रफळ विचारात घेऊन तिघा सरदारांत वसुलाची टक्केवारी ठरवून दिली.
३-शिंद्यांचे दिवाण: विविध सरदार आणि पुणे दरबार यांच्यातील देण्या घेण्याच्या हिशेबावर रामचंद्र बाबांचे बारीक लक्ष असायचे.त्यातून त्यांचे शिंदे घराण्याशी विशेष जवळिकीचे संबंध निर्माण झाले.शिंद्यांच्या ` स्वतंत्र सरदारीस ` व ` शिंदे दरबाराच्या ` स्थापनेला पेशव्यांकडून मान्यता मिळविण्यासाठी राणोजी शिंद्यांना रामचंद्र बाबांची खूप मदत झाली.यातून पुणे दरबारात शिंद्यांना पण होळकरांच्या तोलामोला प्रमाणे स्थान मिळाले.रामचंद्र बाबांच्या ह्या उपकारातून उतराई होण्यासाठी राणोजी शिंद्यांनी रामचंद्र बाबांस आपले `दिवाण`
म्हणून नियुक्त केले.राणोजी शिंद्यांनंतर त्यांच्या वारसांशी रामचंद्र बाबांचे पटेनासे झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी १७४१ मध्ये त्यांना पुण्याला परत बोलावून घेतले.
४-नानासाहेब पेशव्यान बरोबर मतभेद:छ.शाहू महाराजांनी प्रत्येक सरदाराला नेमून दिलेल्या कामात नानासाहेब `पेशवा`म्हणून हस्तक्षेप करतात,द्रव्यलालसेने सिद्धांतहीन राजकारण खेळून सातारा दरबारात आपले महत्व वाढवीत आहेत,इ.आक्षेप रामचंद्र बाबांनी नानासाहेब पेशव्यांच्या कार्यपद्धतीवर घेत असत.नानासाहेबांच्या विरोधात सातारा दरबारात बाबूजी नाईक सावकार,सरदार दमाजी गायकवाड,नागपूरकर रघुजी भोसले,सेनापती दाभाडे यांसारख्या विरोधकांची ची मोट बांधली.पण चतुर नानासाहेबांनी त्यांच्या विरोधकांचा डाव उलथवून लावला.रामचंद्र बाबांची पुत्रवत मानलेल्या सदाशिवरावभाऊस राज्यकारभारात महत्वाचे स्थान मिळावे अशी इच्छा होती.त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न पण केले पण नानासाहेबांच्या सदैव दक्ष राहण्याच्या स्वभावामुळे रामचंद्र बाबांच्या सगळ्या खेळ्या अपेशी ठरल्या.उलट ते नानासाहेबांच्या डावपेचात अडकून बदनामीचे मात्र धनी झाले(सांगोला करार)नानासाहेबांवर आपण मात करू शकत नाही हे लक्षात आल्यावर रामचंद्र बाबांनी जास्तीत जास्त लक्ष फडाच्या कामात तसेच शिंद्यांच्या दिवाणीच्या कामात घातले.उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी शिन्द्यांतर्फे करून घेतला.नानासाहेबांस रामचंद्र बाबांच्या ब्राह्म/क्षात्र तेजाची धास्ती असल्याने त्यांनी मल्हारराव होळकरांना हाताशी धरून रामचंद्र बाबांना शिंद्यांच्या दिवाणपदावरून हटवून पुण्यात आणले.नानासाहेबांसारख्या राजकारणात कसलेल्या,मुरलेल्या व्यक्तीशी पंगा घेत राहिल्यास आपली सारी कारकीर्द लयाला जाऊ शकते असा वास्तववादी विचार करून रामचंद्र बाबांनी नानासाहेबांशी जमवून घेतले.महादजी पंत पुरंदरे यांच्या नंतर सन १७५० ते १७५३ अशी तीन वर्षे ते पेशव्यांचे कारभारी राहिले.पुढील सात वर्षे—पानिपत मोहिमेवर जाई पर्यंत-- त्यांचे मानस पुत्र सदाशिवरावभाऊ कारभारी होते.सदाशिवरावभाऊ बरोबर कर्नाटक स्वाऱ्यात सहभागी होऊन रामचंद्र बाबांनी मराठ्यांना भरपूर धन,यश,कीर्ती मिळवून दिली.निजामाला सुद्धा त्यांनी धाक बसविला होता.राज्याच्या हिशेब,खजिना,आवक,जावक यांवर घारीसारखे लक्ष ठेवून रामचंद्र बाबांनी मराठ्यांचे खजिने भरले.नानासाहेबांनी पण आधीची संबंधातील कटुता विसरून रामचंद्र बाबांचे पेशव्यांच्या परिवारातील स्थान लक्षात ठेवून त्यांना जहागिऱ्या दिल्या.त्यांनी गोव्याला जाऊन आपले कुलदैवत मंगेशावर मोहरांचा अभिषेक केला,प्रियोळ गावात एक वाडा तसेच अन्य इनामे दिले.मंगेशी,कवळे,म्हाळसा या देवस्थानाना जमिनी,रोख रकमा,सोन्याचे अलंकार अर्पण केले.
शक्ती,युक्ती,बुद्धी यांचा संगम असलेल्या रामचंद्र बाबांना औरस पुत्र नसल्याने त्यांनी वृद्धावस्थेत एक दत्तक घेऊन आपल्या पट्टशिष्याचे—सदाशिवरावभाऊ चे नांव त्यास ठेवले.हा दत्तक पुत्र सुद्धा मुत्सद्देगिरीत अतिशय हुशार होता.पण राघोबा दादांच्या गटात गेल्याने त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा मराठेशाहीला काही उपयोग झाला नाही.रामचंद्र बाबा वयाच्या ७९ व्या वर्षी ४ ऑक्टोबर १७५४ रोजी पुण्यात निधन पावले.त्यांच्या पार्थिवासोबत त्यांची पत्नी सती गेली.रामचंद्र बाबांनी आपल्या संपत्तीपैकी एक भाग दत्तक पुत्राला,दुसरा भाग सदाशिवरावभाऊस आणि तिसरा भाग दानधर्मासाठी ठेवला होता.रामचंद्र बाबांचे छायाचित्र/रूपवर्णन उपलब्ध नाही.तसेच त्रोटक वंशावळ उपलब्ध आहे.
# प्रकाश लोणकर
संदर्भ:१-पेशवे-लेखक श्रीराम साठे
२-पेशवाई-लेखक कौस्तुभ कस्तुरे
३- मराठी रियासत-खंड २,३,४-गो.स.सरदेसाई
No comments:
Post a Comment