विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपतींची आग्र्यातुन सुटका पेटाऱ्यातून कि वेषांतराने ?

 

छत्रपतींची आग्र्यातुन सुटका पेटाऱ्यातून कि वेषांतराने ?

लेखन ::श्री नागेश सावंत


  • शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटल्याचे संदर्भ :-
जेधे शकावली :- बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या . श्रावण वद्य द्वादशी आगरीयातून पेटारीयात बैसोन पळाले .
सभासद बखर :- मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटाऱ्यात बसले . पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटारीयात बसून चालिले.
कविराज भूषण :- चुकताई वंशाच्या औरंगजेबाच्या चारही दिशांना चौक्या असताना खांद्यावर पेठारे घेऊन लोक मंदिराकडे निघाले ,अश्यावेळी शिवाजी महाराजांनी आपला साज शृंगार उतरवून ठेऊन मिठाईच्या पेटाऱ्यात बसून ते निघून गेले.
मराठा साम्राज्याची छोटी बखर :- आपण व पुत्र कावडीत बैसोन गुजरीचे वेळेस सायंकाळी बाहेर जाऊन पेटारे जाळिले आणि निराजीपंतास व दत्ताजीपंतास सावध करून विचार केला कि आल्यामार्गाने दगा आहे , तो मार्ग टाकून कुरुक्षेत्रास चालिले .
मनुची ( असे होते मोगल ) :- ताबडतोब मिठाईच्या पेट्या नेहमीसारख्या आणविल्या . नंतर तो एका पेटीत बसला व दुसरीत मुलाला घालून त्या बुरडी पेट्या ठरवून ठेविलेल्या जागी नेवविल्या
३ सप्टेंबर राजस्थानी पत्रात परकलदास लिहितो :- “ दिवस चार घटका वर आला असता बातमी आली कि , शिवाजी पळाला . चौक्या पहारऱ्यांवर एक हजार माणसे होती . तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकातून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता हे कोणीही सांगू शकले नाही . मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष ( तर्क ) निघाला की पेटाऱ्यांची ये-जा होती त्यामुळे तो पेटाऱ्यात बसून निघाला असावा.
समकालीन भीमसेन सक्सेना “ तारीखे दिल्कूशा “ यात लिहितो :- “ आणि मग एके दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले . मिठाईचे दोन पेठारे रिकामे केले. आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.”
काफिखान लिहितो :- शिवाजी व त्याचा मुलगा हे निरनिराळ्या दोन बुरडी टोपल्यांत बसले आणि जलदीने अकबराबादेहून निघून जेथें दोन घोडे तयार ठेवले होते तेथे आले.
व्हॅलेंटीन सुरतेतील डच गव्हर्नर :- आपण थोडे दिवस तापानें आजारी असल्याचे भासवून त्यानें आपल्याला एका टोपलीत घालून घेऊन शहराबाहेर नेण्याची कारवाई करविली.
सुरतकर इंग्रजांचे पत्र , शिवकालीन पत्रसारसंग्रह १ पत्र क्र. ११३६ :- शिवाजीवर इतका कडक पहारा ठेऊनही अखेरला तो आणि त्याचा मुलगा असे दोघे दोन पेटाऱ्यातून बसून निसटून गेले. अशी खात्रीलायक बातमी नुकतीच आली आहे
  • शिवाजी महाराज वेष बदलून निसटल्याचे संदर्भ :-
आलमगिरनामा :- जयसिंगाचा अर्ज आला कि मी त्याला ( महाराजांना ) वचन दिले आहे आणि इकडच्या मसलतीच्या दृष्टीने त्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्षच करणे योग्य होईल. त्यामुळे औरंगजेबाचा फौलादखानास हुकुम झाला कि , त्याच्या ( महाराजांच्या ) डेर्यावरील पहारे उठवावेत. रामसिंगानेही खबरदारीत गफलत केली त्यामुळे तो २७ सफर सन १०७७ रोजी आपल्या पुत्रासह वेष बदलून पळून गेला .
  • इतिहासकार वा. सि .बेंद्रे. , सेतुमाधवराव पगडी , विजयराव देशमुख यांची मते पुढीलप्रमाणे
वा. सी. बेंद्रे श्री छत्रपती शिवाजी महाराज :- शिवाजी परात गेल्यानंतर ह्या प्रसंगाचे वर्णन करणारे तत्कालीन प्रवासी थेवेनो , मनुची , व्हॅलेंटीन आणि तत्कालीन इतिहासकार काफिखान यांनी नंतर खात्रीपूर्वकपणे शिवाजीच्या बाजूने प्रसृत सलेली म्हणून दिलेली आहे. त्यांत शिवाजी मिठाईच्या टोपलीतून गेला हेच सांगितले. जेधे शकावली पेटारीयाचीच हकीकत मानतात. नंतरच्या बखरीचे म्हणणे सोडले तरी तत्कालीन सर्वच पुराव्यात पेटारीयातून पळाले हि गोष्ट नि:संदिग्धपणे सांगितली गेली आहे. अर्थात १७ ऑगस्टला म्हणजे निसटल्याची बातमी पहारेकऱ्याना लागण्यापूर्वी आदले दिवशीच शिवाजी सायंकाळी पेटारीयात बसोन गेला हि वस्तुस्थिती मान्य करणे प्राप्त आहे.
  • सेतू माधवराव पगडी यांचे पेटाऱ्यातील पलायनाविषयीचे आक्षेप व विजयराव देशमुख यांचे आक्षेपांचे खंडन
सेतू माधवराव पगडी :- औरंगजेबाचा अधिकृत इतिहास आलमगिरनामा पेटाऱ्याच्या घटनेचा उल्लेख करत नाही . हि कुतूहलाची गोष्ट आहे . त्या दस्तऐवजात शिवाजी वेषांतर करून मुलाला घेऊन पळाला एवढाच उल्लेख येतो. याचा अर्थ असा होतो कि औरंगजेबाचा पेटाऱ्यातून पळाला या गोष्टीवर विश्वास न्हवता किवा त्याच्या अधिकाऱ्यांच सहकार्य अथवा निष्काळजीपणा त्याला उघड करावयाचा न्हवता शिवाजी स्वतःहून पेटाऱ्यात बसला असेल हा समज चुकीचा आहे. अंग मुडपून स्वतःला आगतिक करण त्याच्या स्वभावात बसत नाही . नऊ वर्षांचा संभाजी पेटाऱ्यात बसला असेल आणि शिवाजी पेटारे नेणाऱ्या भोइंसोबत सेवक बनून गेला असेल
विजयराव देशमुख :- श्री पगडींचा सर्व भर आलमगीरनाम्यातील नोंदीवर आहे. आपल्या सर्व पराक्रमांचा ग्रंथ तयार करण्याचा हुकुम औरंगजेबाने दिला . ग्रंथ कर्त्याला लिहिलेली हकीकत प्रथम बादशहास दाखवावी लागे व बादशहाने सुचवलेले दुरुस्त्या समाविष्ट कराव्या लागत. म्हणजे सोयीचा तेवढाच मजकूर या ग्रंथात लिहिण्याची बादशाहने लेखकास परवानगी दिली होती . त्यामुळे या ग्रंथाचे इतिहासाचे साधन म्हणून पूर्णपणे स्वीकाऱ्हार्य मानता येत नाही . अलामगीरनाम्यातील वेषांताराचा निष्कर्ष हादेखील सरकारी तर्क आहे.
पगडीच्या मते संभाजी महाराज पेटाऱ्यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला आगतिक व कुचंबलेल्या स्थितीत पेटाऱ्यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून व सावधगिरीवरून शक्य वाटत नाही . मग पगडिंच्या मते महाराज हमालाचा वेश धारण करून वजनदार पेटारा स्वतःच्या खांद्यावर वाहून नेणे , महाराजांच्या स्वभावाला अनुसरून होते.
आलामगीरनाम्यात महाराज पुत्रासह वेष बदलून पळून गेले तेवढेच वर्णन आहे. तिथे कुठेही भारवाहक हमाल म्हटलेले नाही .
महाराज पेटाऱ्यातून निसटले . मग हे पेटारे नेण्याची परवानगी कोणी दिली ? प्रत्यक्ष बाद्शाहाने ! म्हणजे अखेर खरा दोषी कोण बादशाहाच ! धूर्त औरंगजेबाने बहुदा हे आपल्यावरील दोषारोपण टाळण्यासाठी शाही अधिकृत नोंदीत पेटाऱ्यानचा उल्लेख कटाक्षाने टाळला
महाराज ज्या पेटाऱ्यातून गेले तो दोन भारवाही हमालांना वाहून न्यावा लागे एवढा मोठा ऐसपैस होता. त्यामुळे आगतिक व कुचंबलेल्या अवस्थेचा प्रश्नच येत नाही .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
इतिहास अभ्यासक मंडळ

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...