विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपतींची श्रीरामभक्ती

 



छत्रपतींची श्रीरामभक्ती

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची प्रभू श्रीरामचंद्राप्रती अपार श्रद्धा होती. समकालीन साधनातील नोंदीनुसार छत्रपतीं शिवरायांनी रामायणाचा विद्याभ्यास केला व रामायणाचे श्रवण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांची स्तुती त्यांच्या बुधभूषण या ग्रंथात केली. चाफळ येथीळ रामनवमीच्या उत्सवासाठी सनदा करून दिल्या. छत्रपती राजाराम महाराजांनी श्रीरामचंद्राचा आदर्श त्यांच्या मुद्रेतून व्यक्त केला.
  • छत्रपती शिवाजी महाराज
समकालीन शिवभारतातील मधील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायणाचा विद्याभ्यास केला असे वर्णन येते.
“श्रृनतस्मृनतपुराणेषु भारते दण्डनीतिषु । समस्तेश्वपि शास्त्रेषु काव्ये रामायणे तथा ॥३४॥ “ ( शिवभारत अध्याय १० )
भावार्थ :- छत्रपती शिवाजी महाराजानी श्रुती, स्मृती , पुराणें, महाभारत, राजनीती सर्व शास्त्रे रामायण यांचा विद्याभ्यास केला.
संभाजी महाराजांनी केशवभट यांचा मुलगा रामचंद्र भट याला दानपत्र दिले. केशवपंडित नावाच्या ब्राम्हणाने छत्रपती शिवाजी महाराजांनसमोर प्रयोगरूप रामायण कथन केले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संतुष्ट होऊन श्रवणाची सांगता व्हावी म्हणून त्यांना तालुका संगमेश्वर येथे जमीन दिली. ( संभाजीकालीन पत्रसार संग्रह पत्र क. १३० )
  • छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण या ग्रंथात श्रीरामाची स्तुती करतात
“ज्यांची अंगकांती ( रंगछटा ) खुलून दिसते. ज्यांनी थोड्या वेळातच समुद्रावर बंधन – बांध ( राम –सेतू ) ला निर्मिले. ज्यांनी लंकाधिपती रावणाचे शीर उडविले, आणि ज्यांनी बाणांनी पृथ्वी व्यापून टाकली. अश्या त्या रघुनंदन ( रघुकुलोत्पन्न श्रीराम ) यांस मी वंदन करीत आहे. ज्यांच्या सैनिकांनी जांभळे पाडावीत , पाण्याचे थेंब खाली पाडून नाहीसे करावेत , कमळे उपटून टाकावीत , चिखल दूर करावा, किंवा जाळी – जळमटे तोडून दूर सारावीत , त्याप्रमाणे राक्षसांचा बलपूर्वक नाश केला.”
छत्रपती संभाजी महाराजांनी चाफळ येथे प्रतिवर्षी होणरा रामनवमी उत्सव उत्साहात पार पडावा यासाठी सनदा व उत्सवात कोणताही उपद्रव होऊन नये म्हणून संरक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यास सूचना देणारे पत्र लिहिले.
चाफळ येथे रघुनाथ देव हे पर्तीवर्षी रामनवमीचा उत्सव करतात. सदर उत्सवासाठी लागणारे धान्य , कापड यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली. तसेच दशमीच्या दिवशी ब्राम्हणबोजन व दक्षिणा देवून सदर उत्सव सालाबादप्रमाणे चालवावा अशी सूचना कऱ्हाडचे मानाजी गोपाळ देशाधिकारी यांना दिली. ( संभाजीकालीन पत्रसार संग्रहपत्र क.१३ १८ ऑक्टोम्बर १६८० )
चाफळ येथे रामदासस्वामीनी श्रीरामाचे देवालय केले आहे. तेथे यात्रा भरते. यावेळी शिपाई व इतर लोक श्रीची मर्यादा चालवीत नाहीत. यात्रेकरूना त्रास देतात. मुसलमान व इतर कोणाचाही उपद्रव होऊ नये यासाठी संभाजी महाराजांनी वासुदेव बाळकृष्ण यांना योग्य उपाययोजना करण्यासाठी पत्र लिहिले. ( संभाजीकालीन पत्रसार संग्रहपत्र क.१५ १९ ऑक्टोम्बेर १६८० )
कऱ्हाडचे देशाधिकारी वेंकाजी रुद्र व अंबाजी मोरदेऊ सातारा यांनी चाफळ येथील प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या रामनवमीच्या यात्रेस जाऊन कसूरकथला करू नये . तसेच पूर्वीपासून चालत आलेल्या इनामाच्या सनदा चालू ठेवाव्यात असा आदेश दिला. ( संभाजीकालीन पत्रसार संग्रहपत्र क.१२० २६ फेब्रुवारी १६८४ )
  • छत्रपती राजराम महाराज
छत्रपती राजाराम महाराजांनी श्रीरामचंद्राचा आदर्श त्यांच्या मुद्रेतून व्यक्त केला.
श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।
भावार्थ :- दशरथपुत्र श्रीरामाच्या राजधर्माचे आचरण करीत सर्व वर्णाचे कल्याण करणाऱ्या राजमुद्रेप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज यांची सर्व जगाला वंदनीय असलेली हि राजमुद्रा सतत प्रकाशत राहो. लोकांचे कल्याण करो !
श्री. नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- शिवभारत
संभाजीकालीन पत्रसार संग्रह
बुधभूषण :- रामकृष्ण कदम
शिवपुत्र छत्रपती राजराम :- जयसिंगराव पवार
छायाचित्र साभार गुगल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...