विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

गुजर बंधूंचे धर्मांतरण

 



गुजर बंधूंचे धर्मांतरण

लेखन ::श्री नागेश सावंत

  • सदर लेख हा माहिती मिळावी याकरिता आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचे धर्मांतर करून मुस्लीम करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला परंतु शाहू महाराजांच्या नकारामुळे शाहू महाराजानऐवजी सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या दोन मुलांनी खंडेराव व जगजीवन यांनी स्वतःचे धर्मांतरण करून घेतले. व शाहू महाराजांना या धर्म संकटातून वाचवले. गुजर बंधू अब्दुल करीम व अब्दुल रहिमान या नावाने मुसलमान झाले. असे वाचनात आले. त्यासंबंधी समकालीन किंवा उत्तरकालीन संदर्भ आहेत का ? ( पत्र, सनद किंवा बखर ) असल्यास कृपया इतिहास अभ्यासकांनी द्यावेत.
  • माझ्या वाचनात आलेल्या माहितनुसार
मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ पान नंबर २६ :- काही मराठ्यानी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले. प्रतापराव गुजराच्या मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले (१३ जुलै १७००).
गुजर बंधू औरंगजेबाच्या कैदेत कसे आले याबाबत काही माहिती आढळत नाही.
१३ जुलै १७०० च्या नोंदीनुसार :- नरकवासी रामा (राजाराम) याचे मेहुणे (बायकोचे भाऊ, प्रतापराव गुजराची मुले) खंडूराव व जगन्नाथ हे शहाजादा बेदारबख्त याच्या हुजुरात मुसलमान झाले. ते यावेळी इनायतूल्लाखानाच्या मध्यस्थीने बादशहाच्या हुजुरात आले. बादशहांनी खिलतीची वस्त्रे देऊन त्यांना अब्दु रहीम व अब्दू रहमान ही नावे दिली..
मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड ३ :- मे १७०३ च्या नोंदीनुसार औरंगजेबाने शाहू महाराजांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला परंतु शाहू महराजांनी त्यास नकार दिला त्यामुळे शाहू महाराजांवर कडक नजर ठेवण्याची आज्ञा औरंगजेबाने केली.
सदर बातमीपत्रातील माहिती पाहता गुजर बंधूंचे धर्मांतरण जुलै १७०० रोजी झाले. तर शाहू महाराजांना बाटवण्याचा प्रयत्न मे १७०३ रोजी झाला म्हणजे ३ वर्षानंतर झाला. मग तीन वर्षापूर्वी १७०० साली घडलेल्या घटनेचा संबंध १७०३ साली का जोडला जातो.
इतिहास संग्रह मधील नोंद :- रायगड मोगलांच्या ताब्यात आला त्यावेळी प्रतापराव गुजर यांची मुले देखील कैद झाली. शाहू महाराजा यांना बाटविण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला परंतु त्याच्या लाडक्या मुलीने शाहूस जबरदस्तीने मुसलमान केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली अशा बिकट प्रसंगी प्रतापराव गुजर यांचा मुलगा खंडेराव मुसलमान झाले व शाहू महाराजांच्यावरील धर्मांतराचा प्रसंग टळला.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची मोगली कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना साताऱ्यास वतन दिले. सध्या यांच्या वंशजात मुसलमानाप्रमाणे नाव ठेवण्याची प्रथा नसून हिंदू धर्माप्रमाणे नाव ठेवण्याची प्रथा आहे. सध्याचे वंशज हिंदूंचे सण व नवरात्र उत्सव साजरा करतात. खंडेराव गुजर यांना परत हिंदू धर्मात घेत होते परंतु त्यांचे मुसलमान बायकोवर प्रेम होते. या मुस्लीम पत्नीने आपणास देखील हिंदूधर्मात घ्यावे असा आग्रह धरला त्यामुळे सदर पुन्हा हिंदुधर्म प्रवेश घटना तशीच राहील.
( ह्या ऐतिहासिक गोष्टी मराठ्यांच्या इतिहासाचे मार्मिक व शोधक भक्त रा.रा.कृष्णाजी विष्णू आचार्य यांनी संग्रहित केल्या आहेत. त्यांनी अशाच पुष्कळ आख्यायिका माजी भारतवर्ष , चालू शाळापत्रक ह्यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्याचे श्रेय घेतले आहे. )
सदर इतिहास संग्रहातील नोंदीस कोणताही संदर्भ नसून केवळ आख्यायिका आहे . आख्यायिकेत सत्याचा अंश काही प्रमाणात असतो. गुजर बंधूंचे धर्मांतर झाले यास मोगल दरबाराच्या बातमीपत्रात संदर्भ मिळतो. परंतु सदर घटनेत आणि शाहू महाराजांचे धर्मांतर यात ३ वर्षांचे अंतर आहे. सदर गुजर बंधूंच्या धर्मांतराचा संबंध शाहू महाराजांच्या प्रसंगाशी जोडला गेला.
कृपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही तर इतिहासातील सत्य जाणण्यासाठी हा लेखन प्रपंच
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ व ३
इतिहास संग्रह :- दतात्रय बळवंत पारसनीस

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...