विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

मोगली विळख्यात छत्रपती थोरले शाहू महाराज

 


मोगली विळख्यात छत्रपती थोरले शाहू महाराज

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेखनिजाम याने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी अटक केली व त्यांची क्रूरपणे हत्या केली. १९ ऑक्टोंबर १६८९ रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आपला पुत्र शिवाजी व इतर लोकांसह मोगली विळख्यात कैद झाल्या. जेधे शकावलीनुसार महाराणी येसूबाई यांचा पुत्र शिवाजी याचे नाव औरंगजेबाने शाहू ठेवले. व त्यास मोगलांची सप्तहजारी मनसबदारी देण्यात आली. मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार “ औरंगजेबाने त्याच्या निवासस्थानाच्या जवळच सर्वांच्या राहण्यासाठी तंबू उभारले तसेच सर्वाना खर्चासाठी वार्षिक वेतन दिले.
औरंगजेबाने शाहू महाराज यांची हत्या न करता मोगली कैदेत का ठेवले. स्वतःच्या बापाची व भावांची हत्या करणारा औरंगजेब असा का वागला . औरंगजेबासमोर तीन पर्याय होते, १ ) शाहू महाराजांची हत्या २ ) शाहूं महाराजांचे धर्मांतरण ३ ) मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांचा वापर
  • १ ) शाहू महाराजांची हत्या :-
छत्रपती संभाजी महराजांची हत्या केल्याने मराठा साम्राज्य बुडवू असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु राजराम महाराज यांना स्वराज्याचे छत्रपती घोषित करण्यात आले. राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडून जिंजीस गेले. व त्यांनी स्वराजरक्षणाचा लढा चालू ठेवला. त्यामुळे मोगलांचे सैन्य दुभागले गेले व त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे युद्ध लढावे लागले. राजाराम महाराज यांच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजीराजे यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले व हा लढा चालू ठेवला.
अश्या परिस्थितीत शाहू महाराजांची हत्या घडवून आणल्याने मराठा साम्राज्याचे सिंहासन रिक्त होणार नव्हते. संभाजी महाराजांच्या हत्येने मराठे सुडाच्या भावनेने पेटून उठले होते व त्यांनी औरंगजेबास शरण न जाता त्याच्याशी अविरत युद्ध चालू ठेवले . त्यामुळे शाहू महाराजांची हत्या करण्याची चूक औरंगजेबासारखा हुशार राजकारणी करणे शक्य न्हवते .
  • २ ) शाहूं महाराजांचे धर्मांतरण :-
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्तेच्या १३ वर्षानंतर देखील स्वराज्य संपत न्हवते त्यामुळे छत्रपती शाहू यांचे धर्मांतरकरून त्यांना मुस्लीम करणे जेणेकरून मराठ्यांचे धार्मिक खच्चीकरण करणे . औरंगजेबाने हा प्रयत्न करून पहिला. मोगल दरबाराच्या मे १७०३ रोजीच्या बातमीपत्रात याविषयीची नोंद आढळून येत. “ बादशहानी हमीदोद्दीनखान बहादूर यास आज्ञा केली संभाजीचा मुलगा राजा शाहू हा गुलालबागमध्ये कैद आहे. त्याला बोलवा आणि त्याला म्हणा कि तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूला बोलला. परंतु शाहूने ते मान्य केले नाही. हमीदोद्दीनखान याने हि बातमी बादशाहाला कळवली. बादशाहने आज्ञा केली कि शाहुवर कडक नजर ठेव.
औरंगजेबाची धर्मवेडाची मानसिकता इथेच थांबली नाही. त्याने संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या मुलींचे मुस्लीम व्यक्तीशी निकाह ( लग्न ) लावून दिले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलींचे लग्न
१६ जून १७०३ च्या बातमीपत्रात औरंगजेबाने मुगलखान राहदार यास आज्ञा केली : नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याच्या मुली बहादूरगडाच्या तळावर आहेत त्यांना हुजुरात आणावे.
५ मार्च १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याची मुलगी हिला बहादूरगडावरून आणण्यात आले होते. तिचे लग्न फकीर मुहमद शाहूर याच्या बरोबर करण्याचे ठरवले. फकीर मुहमदला बादशहाने खिलातीची वस्त्रे दिली.
२४ एप्रिल १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) यांच्या मुलीचे लग्न फकीर मुहमद शाईर याच्याबरोबर ठरवण्यात आले होते. ते बदलण्यात आले. आता तिचे लग्न सिकंदरखान मरहुम ( विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर आदिलशाह ) याचा मुलगा मोईयोद्दीन याजबरोबर ठरविण्यात आले. त्याला खिलातीची वस्त्रे देण्यात आली.
८ जून १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ सदर लग्न औरंगजेबाच्या उपस्थित हुकुमानुसार पार पडले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न
२० मे १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ खान जमान फत्तेजंग मरहूम ( संभाजी राजांना धरणारा मुकर्बखान ) याचा मुलगा अब्दुल कादर हा नरकवासी संभा ( संभाजी महाराज ) यांच्या मुलीशी लग्न करीत आहे. नौबती झडवण्याची त्याला परवानगी देण्यासंबंधी काय आज्ञा? बादशहा म्हणाले “ तीन दिवस “ नौबती वाजविल्या जाव्या अशी आज्ञा देण्यात आली.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मुलींचे लग्न
६ ऑक्टोंबर १७०३ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) यांच्या मुली तळावर ( बहादूरगड ) येथे आल्या आहेत. मीर मुहमद याने राजारामाच्या मुलीना आपल्यारोबर आणावे.
२४ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार ““ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) याच्या मुलीचे लग्न शमशीर बेग यांजबरोबर लावून देण्याचे बादशहाने ठरविले होते. बादशहाने काजी अकरमला म्हटले. “ तुम्ही शमशेरबेगचा निकाह पढावा आणि वधूसाठी दहा हजार रुपयेचा मिहर ठरवा. बादशहाच्या आज्ञाप्रमाणे करण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न
२४ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ राजा नेकनाम ( नागपूरचा गौड राजा ) याने बादशाहाला विनंती केली कि “ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) याच्या मुलीशी माझे लग्न होत आहे. आज्ञा असल्यास माझ्या इथे दोन दिवस नौबती वाजविण्यात येतील. परवानगी द्यावी. विनंती मान्य करण्यात आली.
२७ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ बादशहा हे हमीदुद्दीन खान यास म्हणाले. “ राजा नेकनामला मोत्याची मुंडावळ ( सेहरा ) बांधा. त्याप्रमाणे करण्यात आले. यानंतर बादशाहने काजी मुहमद अकरमखान आणि फाजिलखान यांना बोलावले आणि त्यांना म्हटले “ तुम्ही निकाह पढवा. “ बादशाहने आज्ञा केली कि “ नेकनाम आणि शमशीरबेग यांच्या बायका म्हणजे नरकवासी रामाच्या ( राजराम महाराज ) मुली यांना प्रत्येकी दोन दोन हजार रुपयांचे अलंकार देण्यात यावेत.
  • ३ ) मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांचा वापर
मराठ्यांच्या सततच्या हल्यामुळे वैतागून मराठ्यांच्या उल्लेख गनीम , शत्रू असा न करता चोर असा करावा . ३१ जुलै १७०० च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार औरंगजेबाने आज्ञा केली कि “ यापुढे गनिमांचा ( मराठ्यांचा ) उल्लेख चोर ( दुज्दान ) असा करण्यात यावा.
मनुची लिहितो “ इ.स. १७०३ मध्ये औरंगजेबाने कोंढाणा किल्ला जिंकला व त्या नंतर त्याने पुण्याला तळ ठोकला”
आता आपले वय झाले आहे असे पाहून मराठ्यांचे किल्ले व प्रदेश जिंकण्याचे काही तरी उपाय शोधले पाहिजेत असे औरंगजेबास वाटले. मराठ्यांच्यात फुट पाडण्याचे कारस्थान करण्याचे त्याने ठरविले. संभाजीचा मुलगा त्याच्याकडे छावणीत होता. त्याला त्याने लहानपणापासून वाढविले होते. बादशहाने शाहूला आपल्यासमोर बोलावून घेतले. त्याची बंदीतून मुक्ती केली. त्याला उंची वस्त्रे दिली व आपला मुलगा कामबक्ष यास त्याच्यावर देखरेख करण्यास सांगितले. बादशाहने शाहूला मोकळीक दिली. त्याला ७ हजारी मनसब दिली. आणि त्याला दक्षिणेच्या सुभ्याचा चौथीईचा हक्क दिला. कामबक्षला विजापूर आणि गोवळकोंडा या दोन प्रांताचा सुभेदार करण्यात आले. औरंजेब कामबक्षला म्हणाला “ तुला मी दक्षिणेत सोडून दिल्लीत जाईन आणि तेथे परमेश्वरची करून भाकीत उरलेले आयुष्य घालविण” ही बातमी चौहोकडे पसरली पण या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले तरी औरंगजेबाने हा निर्णय अमलात आणलेला नाही.
औरंगजेबाची अशी समजूत होती कि , या कारस्थानामुळे मराठे सरदार आपला मुलगा कामबक्ष आणि शाहू यांना येवून मिळतील आणि अशा रीतीने त्यांच्यातील एकी नाहीशी होईल. पण मराठ्यांना औरंगजेबाचा कावा माहित होता. त्यांनी त्यांच्या हुकुमाची मुळीच परवा केली नाही. साम्राज्यातील वेगवेगळ्या भागातून खजिने लुटणे हे त्यांना अधिक लाभदायक होते. शाहुच्या वाट्याला मात्र अधिक कडक नजरकैद आली.
बादशाही छावणीत हजर असलेला मोगलांचा इितहासकार भीमसेन सक्सेना पुढीलप्रमाणे लिहितो.
“या सुमारास बातमी पसरली की, बादशहाला काहीनी सल्ला दिला असून शहाजादा कामबक्ष याच्या मध्यस्थीने मराठ्यांच्याबरोबर तडजोड होण्याचे घाटत आहे. शहजादा कामबक्ष याने वीनंती केली यावरून बादशहाला भीड पडली. त्याने शाहूला आपल्या गुलालबार येथील निवास स्थानातून काढून शहजाद्याच्या हवाली केले. शहाजादा कामबक्ष यांनी आपली माणसे एकाहून अधीक वेळा धनाजी जाधवकडे पाठिवली. पण मोगलांनी मराठ्यांना थोडेच जिंकून घेतले होते. दख्खनचा तमाम सुभा काही कष्ट न करता शीऱ्याचा गोळा घशात घालण्यास मीळावा, तसा ताब्यात गेला होता. ते काय म्हणून तहाला प्रवृत्त होतील? रायभान नावाचा एक मराठा होता. तो आपल्याला शिवाजीच्या भाऊबंदापैकी म्हणवीत असे, त्याच्या मध्यस्थीने तडजोडीची बोलणी चालू होती. त्याच्याकडून हे काम होईल असे वाटत होते. तो बादशहाला येऊन भेटला. त्याला बादशहाने सहा हजारी मनसबदार बनिवले. बादशहाने मराठ्यांच्याकडे पाठवलेली माणसे नीराश होऊन परत फीरली. राजा शाहू यास गुलालबारेत परत नजरकैदेत ठेवण्यात आले.”
शहाजादा कामबक्षला अजून वेडी आशा वाटत होती की मराठ्यांशी तडजोड होऊ शकेल. तो धनाजी जाधवला पत्रावर पत्रे लीहीत होता. भीमसेन सक्सेना म्हणतो “शहाजादा कामबक्ष हा धनाजी जाधवाकडे तहासाठी म्हणून पुन्हा पुन्हा माणसे पाठवीत होता. तहाच्या वाटाघाटी होत होत्या; पण धनाजीने निरनिराळी निम्मिते काढून काळ काढूपणाचे धोरण अवलांबिले.
मोगल दरबाराची बातमीपत्रातील नोंदी
१० जुलै १७०३ रोजी तंजावरकर व्यंकोजी भोसले यांचे पुत्र रायभान आणि शाहूंची भेट घडवून आण्यात आली.
सेतू माधवराव पगडी लिहितात “ कुणीकडून कां होईना मराठ्यांशी तडजोड व्हावी आणि युद्धाची कटकट संपवावी असे मुगल सरदारांना वाटू लागले. औरंगजेबालाही असेच वाटे पण अभीमानाने तो बोलत नसे, मध्यस्त मात्र मराठ्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करीत. यासाठी मुगलांनी तंजावरहून रायभान भोसलेला आणले. शाहू आणी रायभान यांच्या मध्यस्थीने मराठ्यांशी काही तडजोड होणे शक्य आहे कां? याचा अंदाज औरंगजेब घेत होता.
  • औरंगजेबाच्या मृत्युनंतर
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. मराठी रीयासत खंड ३ “ औरंगजेब बादशाह फार धोरणी होता. शाहुवर मेहरबानी करण्याचा त्याचा विचार कधीच न्हवता तशाच प्रसंगी उपयोगी पडणारा हातातला डाव एवढ्याच समजुतीने त्याने शाहूस जवळ ठेविले होते. मराठाशाहीची अंतःस्तिथी त्यास चांगली माहित होती. ताराबाईंचे व प्रमुख सरदारांचे विशिष्ठ स्वभाव व प्रत्येकाचे अंतस्थ हेतू त्यास अवगत होते. मराठ्यांनी आपल्याला घेरलेले पाहून शेवटचा उपाय म्हणून शाहूस मुक्त करून मराठामंडळात दुषी माजवण्याची युक्ती त्याने काढली व ती फलद्रूप झाली. मात्र आपल्या हयातीत त्याने ही गोष्ट अमलात आणली नाही. त्याच्या पश्चात झुलफिकरखानाने आजीमशहाकडून शाहूस सन १७०७ च्या एप्रिल महिन्यात मुक्त करून औरंगजेबाचा कावा सिद्धीस नेला.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ व ३
. असे होते मोगल :- निकोलाय मनुची
मराठा रियासात :- गो स सरदेसाई
छायाचित्र साभार गुगल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...