नेताजी पालकर व्यक्तिवेध
लेखन ::श्री नागेश सावंत
- नेताजी पालकरांचे मूळ गाव कोणते ?
सरनौबत
नेताजी पालकर त्यांना प्रती शिवाजी असे देखील संबोधले जाते. नेताजी पालकर
यांचे मूळ गाव कोणते याविषयी याबाबत मतमतांतरे आहेत. विजयराव देशमुख
शककर्ते शिवराय मध्ये लिहितात “ नेताजींचे मुळ घराणे नेमके कुठले ते कळत
नाही. बहुदा ते चीपळूणकडील धावरी नदीकाठच्या चौक गावचे असावेत असे वाटते .”
रियासतकार सरदेसाई ऐतिहासिक घराण्याच्या वंशावळी यात लिहितात “ नेताजी
पालकर हा पालीचा प्रतिष्टीत देशमुख , प्रथमपासून मावळातला सहायक.” काही
इतिहासकारांच्या मते कुलाब्याजवळील चौक हे नेतोजी पालकरांचे मूळ गाव असावे.
- नेताजी पालकरांचे भोसले घराण्याशी नाते ?
कास्मा
द गार्डा हा पौर्तुगीज प्रवासी लिहितो “ शिवाजी महाराज ३० वर्षाचे होते
त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना ३० घोड्यांचा अधिपती बनवले व शिवाजी
महाराजांची जबाबदारी पालक म्हणून नेतोजी नावाच्या जवळच्या नातेवाईकाकडे
सोपवली. शिवाजी महाराज त्यांना “ काका “ असे संबोधत असत.
औरंगजेब
नेताजी पालकरना शिवाजींचा नातलग म्हणून संबोधतो. शिवाजी महाराजांची पत्नी
पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या. त्या नेताजींच्या पुतणी असाव्यात.
शिवाजी महाराजांची एक मुलगी कमळाबाई यांचा विवाह जानोजी पालकरानसोबत झाला.
परंतु जानोजी हे नेताजींचे कोण पुत्र कि पुतण्या ? की काही संबंधच नाही.
- सरनौबत नेताजी पालकर
नेताजी
पालकरांना इ.स. १६५९ मध्ये स्वराज्याचे सरनौबत झाले. सभासद बखरीनुसार “
लष्कराचा सरनौबत नेताजी पालकर केला. नेताजी सरनोबती करोत असता सात हजार
पागा व तीन हजार शिलेदार अशी दहा हजार फौज जाहली.”
अफझलखान
स्वराज्यावर चालून आला त्यावेळी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना
वीजपुरात प्रांतात हल्ले करून ते प्रांत उद्वस्थ करण्याची जबाबदारी दिली .
नेताजी पालकरांना मोहिमेवर असताना अफझलखानाने स्वराज्यात आक्रमण करून येथे
अत्याचार केल्याची खबर मिळताच ते आपल्या सैन्यासह परत स्वराज्यात आले.
शिवाजी महाराजांनी त्यांना दूतानकरवी निरोप पाठवून प्रतापगडावर न येता
घाटावर राहण्याची आज्ञा केली. यावेळी नेताजींच्या असावधानतेमुळे मुसेदखान
व इतर यवनी सरदार पळून गेले असा ठपका ठेवण्यात आला. अफझलखान वधामुळे
विजापुरात गोंधळ माजला . त्याचा फायद घेत शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार
नेताजी पालकरानी आदीलशाही मुलखात स्वाऱ्या करून आदिलशाहीतील मुलुख आपल्या
ताब्यात आणला.
शिवाजी
महाराज सिद्धी जोहरने दिलेल्या पन्हाळगड वेढ्यात अडकले असता सरनौबत नेताजी
पालकर यांनी हि जबाबदारी स्वतः घेऊन सिद्धी हिलाल व त्याचा मुलगा सिद्धी
वाहवाह याच्यासह पन्हाळगडावर हल्ला केला परंतु सिद्धी वाहवाह मारला
गेल्याने सिद्धी हिलालने रणागणातून माघार घेतली व नेताजी पालकरांना हा वेढा
फोडण्यात अपयश आले.
शिवाजी
महाराजांनी शाहीस्तेखानास शास्त केली त्यावेळी नेताजी पालकर व मोरोपंत
पेशवे या दोघांच्या नेतृत्वाखाली सैन्याची विभागणी केली. शिवाजी महाराजांनी
शाहीस्तेखानाची बोटे छाटली व नेताजी पालकरांसह सिंहगडाकडे रवाना झाले.
- नेताजी पालकर शत्रूस मिळाले
१३
जून १६६५ रोजी शिवाजी महाराजाना परिस्थितीवश मुघलांशी तह करावा लागला.
शिवाजी महाराजांनी पन्हाळगड मुगलांसाठी जिंकण्याचे आश्वासन मिर्झाराजे
जयसिंगाना दिले. आलमगीरनाम्यातील नोंदीनुसार शिवाजी
मह्राराजांनी १६ जानेवारी १६६६ रोजी सकाळी गडावर हल्ला चढवला परंतु
किल्यावरील शत्रू सावध असल्याने घनघोर लढाई होऊन त्यात अनेक मावले मारले
गेले काही जखमी झाले. यात इंग्रजी पत्रानुसार ५०० मावले तर आलमगीरनाम्यातील
नोंदीनुसार १००० मावळे मारले गेले. त्यामुळे शिवाजी महाराजाना
खेळणाकिल्याच्या आश्रयास यावे लागले. येथे नेतोजी पालकर व शिवाजी महाराज
यांच्यात भांडण झाले व नेतोजी पालकर विजापुर आदिलशाहास जावून मिळाले.
सभासद
बखरीनुसार समयास कैसा पावला नाहीस ? म्हणून शब्द लावून सरनौबतीवरून दूर
केले. बहुतेक पन्हाळा हल्यावेळी नेताजी पालकरांकडून काही चूक झाली असावी.
कारवारकर इंग्रज सुरतेतील इंग्रजांना कळवतात “ नेताजीचे
आणि शिवाजीचे भांडण झाले असे म्हणतात. हे भांडण खरोखरच होते कि त्यात आणखी
काही गोम आहे हे सांगता येत नाही. आदिलशहाने त्यांना दरसाल तीन लक्ष
होणांची नेमणूक व मोगली सरहद्दीवरील काही मुलुख दिला.
२३
फेब्रुवारी १६६६ च्या राजस्थानी पत्रातील नोंदीनुसार “शिवाजीच्या पुतण्या
नेताजी याला बादशहाने २ हजारी दोन हजार स्वरांची मनसब दिली होती. परंतु
नेताजी पालकर नाराज झाले व योग्य संधी सापडतच आदिलशाहाला जावून मिळाले.
५
मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेल्यानंतर २० मार्च १६६६
मिर्झाराजे यांनी नेतोजी पालकर यास पंचहजारी मनसब व ३८ हजारांची रोकड
जहागीर देऊन पुन्हा मोगलांच्या सेवेत दाखल केले.
- नेताजी पालकर मोगली कैदेत
शिवाजी
महाराज आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या भेटीस गेले परंतु तेथे त्यांना कैद
करण्यात आले. शिवाजी महाराज आग्रा कैदेतून पेटाऱ्यातून निसटले. आलमगीरनाम्यातील नोंदीनुसार
औरंगजेबाला सदर बातमी मिळताच त्याने शिवाजी महाराजांचा नातलग नेताजी पालकर
यांना कैद करण्याची आज्ञा मिर्झाराजे जयसिंग यांना दिली. मिर्झाराजे यांनी
नेतोजीस कैद करून दिलेरखानाकडे सोपवले. नेताजी पालकरांनसोबत त्यांचा मुलगा
देखील कैद झाला. २५ ऑक्टोंबर १६६६ रोजी दिलेरखान दिल्लीस रवाना झाला.
नेतोजी पालकर यांनी कैदेतील अत्याचाराच्यामुळे मुसलमान होण्याचा निर्णय घेतला. मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार
सीवाचा नातलग नेतो , ज्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता , त्याची सुंता
केल्यावर तीन हजारी मनसब देण्यात आली व महमद कुलीखान असे नामांतरण करण्यात
आले.
औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबारातील नोंदीनुसार ६
एप्रिल १६६७ रोजी नेताजी पालकर यांना पंजमिरची ठानेदारी देण्यात आली तसेच
सरहद्दीची माहिती झाल्यानंतर एक वर्षाने गझनीची ठानेदारी देण्याचे आश्वासन
औरंगजेबाने दिले. २१ एप्रिल १६६७ रोजी औरंगजेबाने नेताजी पालकर यांना
सरंजाम दिला नसल्याने त्यांची नेमणूक स्थगित केली .
नेताजी
पालकारांच्या तीन बायकांपैकी दोन बायकांना कैद करून दिल्लीत आणले गेले. एक
पत्नी मात्र दक्षिणेत राहिली. त्यांना मुसलमान होण्याची आज्ञा झाली परंतु
त्यांनी त्यास विरोध केल्याने नेताजी पालकरांना त्यांच्याकडे पाठवण्यात
आले. २४ जुलै १६६७ मुहमद कुलीखान उर्फ नेताजी यास हुकुमाप्रमाणे त्याच्या
बायकांकडे पाठवले होते. नेताजीने आपल्या बायकांचे मन वळविले व मुसलमान केले
. बादशहा म्हणाला “ ठीक आहे त्यांचा निका लावून द्यावा “. औरंगजेबाने
त्यांना ५००० रुपयांचे दागिने भेट दिले.
१९
ऑक्टोबर १६६७ रोजी नेतोजी पालकर उर्फ मुहमद कुलीखान यास सरोपा , सोन्याचा
साजाचा घोडा , लाकडी हौदासह हत्तीण व झेंडा देऊन काबूलला पाठवण्यात आले.
मनुची लिहितो :-
डिसेंबर १६७२ ते डिसेंबर १६७३ च्या दरम्यान नेतोजी पालकर मोगल सरदार
महाबतखान याच्यासोबत काबुलच्या मोहिमेवर असताना यांनी मोगली कैदेतून
सुटण्याचा निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.. नेताजीला पकडून लाहोरला
आणण्यात आले. तेथे त्याला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. बादशाहने हुकुम
पाठविला नेताजी मुसलमान होत नसेल तर त्याचा शिरच्छेद करण्यात यावा.
नेताजीने धर्म बदलण्याचे सोंग केले. त्याला त्याचा जुना हुद्दा देण्यात आला
आणि सिंधू नदीच्या पलीकडे जाण्याची त्याला आज्ञा करण्यात आली.
मनुची
लिहितो :- काही महिन्यानंतर नेताजी पुन: नाहीसा झाला. आणि शिवाजीच्या
मुलखात निघून गेला. तेथून तो मोगलांच्या विरुद्ध आपल्या नेहमीच्या
पद्धतीप्रमाणे लढू लागला.
शिवाजी
महाराजानविरुद्धच्या मोहिमेत मोगली सरदाराना अपेक्षित यश मिळत न्हवते.
मोगल सरदार बहादूरखान यास अपयश आल्याने मोगल सरदार दिलेरखान याला दक्षिणेत
मोहिमेवर पाठवण्यात आले बहुदा त्यावेळी नेताजी पालकर यांना दिलेरखानसोबत
दक्षिणेत पाठवण्यात आले असावे. किमान ९ वर्ष मोगली सेवेत राहिल्यानंतर
नेताजी परत दक्षिणेत आले व एके दिवशी संधी साधून स्वराज्यात दाखल झाले.
- नेताजी पालकरांचे शुद्धीकरण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश
१९
जून १६७६ जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ शके १५९८ आषाढ वद्य ४ नेतोजी पालकर
यांनी प्रायाचीत घेतले शुद्ध झाले”. नेताजी पालकर यांना हिंदुधर्मात
घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना विशेष कामगिरी सोपविल्याची नोंद
आढळून येत नाही परंतु त्यान वाई परगण्यातील मौजे पसर्णीची मोकासदारी दिली
असावी असे अनुमान शिवचरित्र साहित्य खंड ८ लेखांक ७१ मधील नोंदीनुसार
वाटते. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी नेताजी पालकर यांना औरंगजेबाचा
पुत्र अकबर हा औरंगजेबाविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांच्या आश्रयास आला
होता त्यावेळी त्याच्या रक्षणासाठी व व्यवस्थेसाठी नेताजी पालकर यांना
ठेवल्याची नोंद औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबारात आढळते २२ जुलै १६८१ “अकबर
हा तळकोकणाकडे राहत आहे. सीवाचा मुलगा संभाजी याने त्यास वीस हजार होण दिले
असून मुहमद कुली उर्फ शिवाजी ( नेतोजी ) व आपले इतर लोक त्याजपाशी ठेवले
आहेत.
- नेतोजी पालकर यांनी पुन्हा मुसलमान धर्म स्वीकारला का ?
शिवचरित्र
साहित्य खंड ३ लेखांक ६६८ इ.१६६३ -१६६४ इंदापूर मशिदीचा काजी लिहितो “
शिवाजी राजे याचे कारकिर्दी भोगवाटा जाहला नाही “ म्हणजे सदर मशिदीचे इनाम
शिवाजी महराजांनी बंद केले.
शिवचरित्र
साहित्य खंड ३ लेखांक ६६९ ११ जानेवारी १६९० सदर पत्रानुसार इंदापूरचा
मुलुख नेतोजी पालकरांकडे इनाम म्हणून आलेला असून व इंदापूरच्या सदर मशिदीचे
इनाम नेतोजी पालकारांनी चालू केले. ( सदर शेवटची नोंद हि नेताजी पालकरांबाबत आढळून येते. यावरून ते इंदापूर कसब्याचे मोकासदार असावेत )
शिवाजी
महाराजांच्या काळात इंदापुरातील सदर मशिदीचे बंद असेलेले इनाम सदर मुलुख
मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर नेतोजी पालकर यांनी त्यांच्या अखत्यारीत
आल्यानंतर सदर मशिदीचे इनाम चालू केले.
शिवचरित्र
साहित्य खंड ५ ले. ८३० धनकवडीचे कुलकर्णी जिवाजी विठ्ठल याने १४
जानेवारी १७१९ रोजी लिहिलेली एक हकीगत आहे त्यात नेताजी पालकर यांचा उल्लेख
येतो “ जुन्नर पा रा नेतोजी पालकर यास जहागिरी होती. “ सदर उल्लेखावरून
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर नेताजी पालकर हे मुगल मनसबदार होते असे
दिसून येते.
शिवचरित्र
साहित्य खंड ३ ले. ६४७ १५ मे १६९० रोजी मोगलांच्या अंमलातील इंदापूर
येथून वेडसिंगे या गावाच्या पाटलास पाठवलेल्या कौलनाम्याच्या नोंदीनुसार “
जानोजीराजे पालकर यांच्याकडे तो परगणा जहागीर म्हणून होता असे दिसून येते.
राजवाडे खंड १५ लेखांक ३४७ ई.स. १६९० मधील अभयपत्रातील मजकुरानुसार “ अवरंगजेबाने मर्हाटे
लोक आहेती त्यास मुसलमान करावे ऐसे केले आहे त्यापैकी मुसलमान केले मा।
नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि ए प्रांतीचे
बाटविले “ यातील नेतोजी राजे व जानोजी राजे हे नेताजी पालकर व जानोजी पालकर असावेत .
- सदर नोंदी पाहता नेतोजी पालकर हे मुघलांना जावून परत मिळाले असावेत परंतु त्यांनी पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा ठोस संदर्भ नाही.
- नेताजी पालकरांचा मृत्यू
नेताजी
पालकर वृद्धाव्स्थेत कोणत्या ठिकाणी वास्तव्यास होते तसेच त्यांचा मृत्यू
कोठे व कोणत्या परिस्थितीत झाला या विषयीचे कोणतेही विश्वासाहार्य संदर्भ
उपलब्ध नाहीत. नेताजी पालकर यांची संभाव्य समाधी नांदेड जिल्यातील तामसा
येथे आहे. परंतु ते नांदेड येथे कधी आले याविषयी विश्वासाहार्य संदर्भ
उपलब्ध नाहीत.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ
:- शिवचरित्र साहित्य खंड ३ व ८ , शिवकालीन पत्रसारसंग्रह , सभासद बखर ,
शिवभारत , राजवाडे खंड १५ , house of shivaji , shivaji visit to agra जेधे
शकावली , शिवचरित्र साहित्य वृत्त संग्रह ३ , असे होते मोगल :- मनुची ,
छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल , फारसी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या
दरबाराच्या अखबार , मासिरे आलमगिरी
छायाचित्र साभार :- The Great Maratha Warriors
No comments:
Post a Comment