विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

वेडात मराठे वीर दौडले सात

 


वेडात मराठे वीर दौडले सात

लेखन ::श्री नागेश सावंत

वरील सदर वाक्य कानी पडताच आपणास आठवण होते ती सरनौबत प्रतापराव गुजर व त्यांच्यासह धारातीर्थी पडलेल्या ६ मावळ्यांची . २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या रणसंग्रामात नक्की काय घडले याविषयीच्या काही नोदी.
६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकला . शिवाजी महाराज हि आनंदाची बातमी कळताच पन्हाळ्यास दाखल झाले. शिवाजी महाराजांची हि विजयी घोडदौड थांबण्यासाठी विजापूरहून सरदार अब्दुल करीम बहलोलखान याची नेमणूक करण्यात आली. सरदार बहलोलखान १२ हजार स्वारानिशी पन्हाळगडाच्या दिशेने निघाला.
सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांना हि माहिती मिळताच सरनौबत प्रतापराव गुजर यांना आज्ञा दिली “ विजापूरचा बहलोलखान येवढा वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फत्ते करणे.
प्रणालपर्वतग्रहनाख्यान नोंदीनुसार शिवाजी महाराजांनि आज्ञा केली “ बहलोलखान हा थोड्या सैन्यासह आहे तोपर्यंत त्याला कैद करा. “
१५ एप्रिल १६७३ सरनौबत प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात उमराणी येथे तुंबळ युद्ध झाले. मराठा सैन्यातील सरदारांनी बहलोलखानाच्या छावणीस वेढा दिला. सिद्दी हिलाल हा सैन्याच्या आघाडीस होता. त्याच्यामागे एक कोस अंतरावर विठोजी शिंदे होते, कृष्णाजी भास्करविठ्ठल पिलदेव हे शत्रू सैन्याच्या दोन्ही बलंगावर ( बाजूस ) संपूर्ण तयारीनिशी उभे ठाकले. विसोजी बल्लाळ सैन्याच्या सभोवती घिरट्या घालू लागला . अश्या रीतीने बहलोलखानाच्या संपूर्ण सैन्यास घेरण्यात आले.
बहलोलखान याची लष्करी छावणी जेथे पडली होती तिथे पाण्याचा जलाशय ( तलाव ) होता. मराठ्यांनी तो जलाशय आपल्या ताब्यात घेतला. या युद्धात बहलोलखान याच्या सैन्याचा दारूण पराभव झाला. बहलोलखानचा सहकारी सिद्दी मुहमद्द बर्की यास दीपोजी राऊत यांनी ठार केले. सिद्दी मुहमद्द बर्की याच्या मृत्यूने बहलोलखान धास्तावला सूर्यास्त झाला होता. चोहोबाजूंनी बहलोलखान कोंडला गेला होता. त्याने प्रतापराव गुजरांकडे क्षमायाचना आर्जवे केली “ आपण तुम्हावरी येत नाही. पाद्शाहाच्या हुकुमाने आलो. याउपरी आपण तुमचा आहे. हरएक वक्ती आपण राजियांचा दावा न करी. “ अशी दिनयाचना करण्यास सुरवात केली. सरनौबत प्रतापराव गुजर त्याच्या या भूलथापांना भुलले व त्यांना त्याची दया आली व त्यांनी त्यास कैद न करता त्यास जिवंत सुखरूप जाऊ दिले .
शिवाजी महाराजांना प्रतापराव गुजरांनी बहलोलखान कैद न करता धर्मवाट देत जिवंत सोडल्याचे कळताच सभासद बखरीतील नोंदीनुसार शिवाजी महाराजांनी “ सला काय निमित्य केला ? असे बोल लावत प्रतापराव गुजरांवर रागावले.
सरनौबत प्रतापराव गुजर मुत्सद्देगिरीत कमी पडले शिवाजी महाराज रागावले त्यामुळे पन्हाळ्यास न येताच पुढील मोहिमेस अथणी हुबळीच्या दिशने गेले. सरदार बहलोलखान स्वराज्यावर पुन्हा चालून आला. १४ जून १६७३ इंग्रज पत्रातील नोंदीनुसार “ विजापुरी सेनापती बहलोलखान याच्या सैन्यापुढे शिवाजीचा टिकाव न लागून त्याचे सैन्य सर्व ठिकाणी माघार घेत आहे. बहलोलखानचे सैन्य कोल्हापूरच्या आसपास छावणी करुन आहे. ते पावसाळा संपताच राजापुरी येणार आहे. शिवाजीने भिऊन जाऊन तहाचे बोलणे लाविले आहे. परंतु बहलोलखान त्याच्या विरुद्ध ( शिवाजी महाराज ) पक्का निश्चय करून बसलेला दिसतो.
सरदार बहलोलखान सरनौबत प्रतापराव गुजरांकडून जीवदान मिळाल्यानंतर पुन्हा सैन्यासह स्वराज्यावर चालुन आला . शिवाजी महाराजांनी त्याचाशी तह करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्यास नकार दिला.
नोहेम्बर १६७३ रोजी शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले असता १७ डिसेंबर १६७३ इंग्रज पत्रातील नोंदिनुसार सरदार बहलोलखान याने बंकापुरला तर सर्जाखानाने चांदगडला शिवाजी महाराजांचा पराभव केला.
डिसेंबर १६७३ रोजी महाराज स्वराज्यात आले कर्नाटक मोहिमेत सरदार बहलोलखानामुळे अडचणी निर्माण झाल्या . सभासद बखरीनुसार बहलोलखान वारंवार स्वराज्यावर चालून येत होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी सरनौबत प्रतापराव गुजर यांना महाराजांचा आदेश मिळाला “ हा घडोघडी येतो याकरिता मागती प्रतापराव यास पाठविले कि “ तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो . याशी गाठ घालून , बुडवून फत्ते करणे , नाहीतर तोंड न दाखविणे “. ऐसे प्रतापराव यास निक्षून सांगून पाठविले.
सरनौबत प्रतापराव गुजर यांना शिवाजी महाराजांचे बोलणे जिव्हारी लागले. सभासद बखरीनुसार “ त्यांनी बहलोलखानास नेसरी येथे गाठले दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. अवकाश होऊन प्रतापराव सरनौबत तलवारीच्या वाराने ठार झाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या .त्याजवर बहलोलखाना विजापुरास गेला. आणि राजीयाचे लष्कर पन्हाळ्याखाले आले.”
जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ माघ वद्य १४ चतुर्दशीला ( २४ फेब्रुवारी १६७४ ) नेसरी येथे महाशिवरात्रीस बहलोलखाना आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत प्रतापरावाना मृत्यू आला.
सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजाना कळताच त्यांना अतीव दुख: झाले. “ प्रतापराव पडले हि खबर राजीयानी येकुन बहुत कष्टी झाले. आणि बोलिले कि आज एक बाजू पडली. प्रतापराव यास आपण लिहून पाठवले कि फत्ते न करिता तोंड दाखवू नये. त्यासारिखे करून बरे म्हणविले “
४ एप्रिल १६७४ च्या इंग्रज पत्रातील नोंदीनुसार “ प्रतापराव बहलोलखानाशी एका खिंडीत फक्त ६ घोडेस्वारानिशी लढताना बाकीचे सैन्याचे मदतीचे अभावी मारला गेला. “ सदर इंग्रज पत्रातील नोंदीच्या आधारे सरनौबत प्रतापराव गुजर हे ६ मावळ्यांना ( विसोजी बल्लाळ , दीपोजीराव राऊत , विठ्ठल पिलदेव , सिद्दी हिलाल , विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर ) सोबत घेऊन बहलोलखानावर चालून गेले व त्यांना वीर मरण आले असे दर्शविले जाते परंतु या नेसरीच्या युद्धात ज्या मावळ्यांना वीर मरण आले त्यांची नावे कोणत्याही साधनात आढळून येत नाहीत.
वरील येणाऱ्या नावातील विसोजी बल्लाळ , दीपोजीराव राऊत , विठ्ठल पिलदेव , सिद्दी हिलाल , विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर ही नावे १५ एप्रिल १६७३ रोजी झालेल्या सरनौबत प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात उमराणी येथे झालेल्या युद्धातील आहेत. त्याविषयीची नोंद आपणास जयराम पिंडे लिखित प्रणालपर्वतग्रह्मणाख्यान या ग्रंथात मिळते .
विठोजी शिंदे हे नोहेम्बर १६७३ साली विजापूर सरदार सर्जाखान याच्याशी झालेल्या युद्धात मृत्युमुखी पडले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ कार्तिक महिन्यात सर्जाखान व विठोजी शिंदे यांच्यात चकमक झाली. विठोजी शिंदे ठार झाले. “
लेखन आणि संकलन : - नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ : -सभासद बखर
प्रणालपर्वतग्रह्मणाख्यान :- जयराम पिंडे
जेधे शकावली
शिवकालीन पत्रसार खंड २

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...