विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 16 January 2023

*मराठा फौजेचे आध्यात्मिक रूप :आषाढी वारी आणि योद्धा ज्ञानेश्वर!*

 



*मराठा फौजेचे आध्यात्मिक रूप :आषाढी वारी आणि योद्धा ज्ञानेश्वर!*
लेखन ::
दिग्विजय धनंजय जाधव
(अ.भा.म.म.इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -सोलापूर जिल्हा )
 
शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आत्मस्थानी असलेली आषाढी वारी अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही वर्षांपूर्वी शस्त्रसज्ज धारकर-यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला होता. त्यास मोठा विरोधी झाला होता. त्याचबरोबर शिवचरित्राचा भागवत संप्रदायाच्या प्रबोधनांमध्ये (कथा व कीर्तनांमध्ये)थेट होत असलेला उपयोग राजकारण व धर्म यांच्यातील सहसंबंधांच्या अनुषंगाने अभ्यासण्याची नितांत गरज आहे.
वास्तविक पाहता राजकीय युद्ध बाह्यांगाने, शारीरिक व शस्त्राधाराने लढली जातात तर अध्यात्मिक साधना ही आंतरिक स्वतःचेच मनशुद्धीकरणाचे स्वतःविरोधातीलच युद्ध असते आणि ते शास्रांधाराने लढले जाते. मात्र तरीही बाह्ययुद्ध आणि आंतरीकयुद्ध यांचं एकत्रिकरण हे संकल्पना विरोधाभासी वाटत असली तरी आषाढी एकादशीचा आणि वारीचा इतिहास पाहता त्यातील तथ्य बाहेर येते.
अध्यात्मिक क्षेत्र हे पूर्णतः राजकारण विरहित नाही आणि राजकारण सुद्धा अध्यात्मिक आधाराशिवाय शिवाय नाही ही वस्तुस्थिती सुद्धा स्वीकारावी लागेल.
ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यात मोठा संघर्ष केला आणि सगळ्यात मोठ्या सामाजिक शक्तींविरुद्ध केला. तो जितका आत्मिक आंतरिक तितकाच बाह्यांगाने सुद्धा नोंद घेण्यासारखा आहे. प्रस्थापित चांगदेव आदी योग्यांनी, कर्मकांड करणाऱ्या कर्मठ सनातन्यांनी, प्रस्थापितांच्या गुलामगिरीत धन्यता मानणाऱ्या समाजाने सुद्धा ज्ञानोबांना छळण्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. अर्थात ज्ञानोबांना मिळाला इतका प्रचंड मोठा शत्रू आजवर कोणालाही मिळालेला नसेल आणि त्याच 'छळणाऱ्या सबंध मोठ्या वर्गाला' स्वतःचे अनुयायी बनण्यास भाग पाडणारा अत्यंत मोठा बाह्यविजय, आणि तो मिळवण्यासाठी केलेला बुद्धिमंतनाचा, आत्मशुद्धीचा केलेला अंतरिक संघर्ष त्यांना सर्वश्रेष्ठ योद्धा बनवतो.
जगद्गुरु तुकोबारायांचेही यापेक्षा फारसे वेगळे नाही.
*"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन!"*
ज्ञानोबा तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांचे नातु नारायण महाराजांनी ज्ञानोबांच्या पादुका देहूत आणून ज्ञानोबा व तुकोबांच्या पादुकांसहित पंढरपूरची आषाढी वारी चालू केली, खरी परंतु त्यातूनही पुढे मानपान व राजकारण झाले आणि ज्ञानोबांचा व तुकोबांचा वेगवेगळा पालखी सोहळा सुरू झाला.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुद्धा पंढरपूर निजामशाहीच्या हद्दीत येत होते. याशिवाय देहू-आळंदी ते पंढरपूर हा मार्ग प्रशस्त बिलकुल नव्हता. झाडी, काटे-कुटे याशिवाय चोऱ्या,दरोडे, लुटमार आदी उपद्रव नित्याचाच होता. अशावेळी वारीच्या संरक्षणासाठी शत्रूस धाक बसावा व कोणीही उपद्रव करू नये यासाठी वारीचे स्वरूप बदलण्याची गरज होती.त्यातच महादजी राजे शिंदे यांनी पंढरपूरास भेट देऊन भागवत संप्रदायाची महती अनुभवली होती. वारीला भव्य दिव्य व राजेशाही स्वरूप यावे अशी त्यांची अंतरीची इच्छा होती त्यास वै.ह.भ.प.मल्लाप्पा वासकर, शिरवळकर महाराज आदींनी अनुमोदन केले महादजीराजेंनी वारीला असे राजेशाही स्वरूप येण्यासाठी व बंदोबस्तासाठी द्रव्य दाणापाणी त्याचबरोबर अश्व, हत्ती, अब्दागिरी, मोर्चेल,राजदंड, पालखी नगारे आणि भगव्या वारकरी झेंड्याबरोबरच जरीपटक्याचा ध्वज आदी सराजम पुरवण्याची जबाबदारी घेतली, मात्र ग्वालियर पासून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अशा सुविधा पुरवणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी ही जबाबदारी त्यांचे सरदार शितोळे देशमुख अंकलीकर यांच्यावर सोपवली. वै.ह.भ.प. हैबतराव बाबा आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते त्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली.
अंकलीकर शितोळे घराणे मूळचे पडवी या गावचे. १७६३ मध्ये झालेल्या राक्षसभुवनच्या लढाईमध्ये दस्तूर खुद्द पेशव्यांचे रक्षण या घराण्याच्या योद्ध्यांनी केले, तेव्हा त्यांना मांजरी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले. कालांतराने त्यांनी जवळच असलेल्या अंकली या गावी वास्तव्य करून पंढरपूर वारीची परंपरा पुढे नेली. साधारणपणे पाचशेच्या आसपास वारकरी व त्यास शंभरच्या आसपास शितोळे सरकारांची शिबंदी असे वारीचे स्वरूप असे. माऊलींच्या पादुकांचे योग्य ते पावित्र्य राखत 'तंबू उभारणारे' व 'रक्षण करणारे' तेव्हा घालून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणेच आजही काम करतात. तंबूंची रचना, ठरलेल्या जागा, दिंड्यांची चाल, याशिवाय वारकरी पताकांना वापरल्या गेलेल्या काठ्या व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टाळ सुद्धा शस्त्राप्रमाणेच वापरले जायचे. त्यांचा अध्यात्म आणि युद्ध या दोन्हींसाठी वापर व्हायचा.वारीचे हे फार मोठे वैशिष्ट्य नोंद घेण्यासारखे आहे. ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांशी सलोख्याचे संबंध ठेवून सदर शितोळे सरकार घराण्याने पालखी सोहळ्यातील मानपान व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने सांभाळल्या. १९०५ मध्ये श्रीमंत सर्जेराव बाबा शितोळे सरकार यांनी अंकलीमध्ये जवळपास पाच एकर परिसरामध्ये सुंदर वाडा बांधला. आजही अत्यंत सुंदर निगा राखलेला हा वाडा शितोळे सरकारांच्या इतिहासाची व वैभवशाली परंपरेची साक्ष देतो.
श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार राजस्थानातील येथील "Mayo College Ajmer" मधून शिक्षण घेतलेले उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांच्याशी इंग्रजी बोलताना सुंदर अनुभव आला. त्यांनी १ जानेवारी २०२३ रोजी अंकलीच्याच वाड्यात मला इतकी सगळी ऐतिहासिक ,अध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.म्हैसाळ येथे आज कै. प्रकाशराव माधवराव शिंदे सरकार यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमास उपस्थित झालो त्याचवेळी सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)चे संचालक श्री दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्याशीही उत्तम चर्चा करण्याचा योग आला एकंदरीत आजचा दिवस माझ्यासारख्या विद्यार्थ्याला खूप काही शिकवून गेला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...