विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

संभाजी महाराज आणि दिलेरखान भेट

 


संभाजी महाराज आणि दिलेरखान भेट

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेस निघाले त्यावेळी रायगडावर गृहकलह चालू होता. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेत सोबत न घेता शृंगारपुरला पाठविले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार :- कार्तिक शुद्ध षष्टी ६ रविवार १ नोव्हेंबर १६७६ संभाजीराजे शृंगारपुरास जाऊन राहिले. शृंगारपुरी शाक्तपंथिय कवी कलश यांच्याशी संभाजीराजांशी घनिष्ठ मित्रता झाली . कवी कलशाने संभाजीराजांस २३ मार्च १६७८ रोजी कलशाभिषेख करविला.
दिलेरखानाने स्वराज्यातील या परीस्थितीचा फायदा घेत संभाजीराजांना मोगलाईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परमानंदकाव्यातील नोंदीनुसार त्याने पत्र घेऊन आपला दूत संभाजी राजांकडे पाठवला . सह्यादी घेऊ इच्छिणारा औरंगजेब तुझा प्रराक्रम पाहू इच्छित आहे. बादशहाचे मन सह्याद्री न मिळाल्याने व्यथित झाले आहे. बादशाहने स्वतःच्या शिक्याने हे फर्मान पाठवले आहे. हत्ती , घोडे, वस्त्रे ,व रत्ने पाठवली आहेत. कोणतीही शंका मनात न ठेवता तू आम्हास सामील होऊन तुझे कल्याण करून घे.
संभाजी महाराजांनी दिलेरखानास पत्र पाठवून उत्तर दिले “ सह्याद्रीचे स्वामी ( शिवाजी महाराज ) सह्याद्रीकडे परत येत नाहीत , तोपर्यंत तुमच्याकडे येण्यासाठी माझी बुद्धी मला सांगत नाही. अशारितीने दिलेरखान व संभाजी महाराज यांच्यात गुप्त रीतीने पत्रव्यवहार सुरु झाला.
११ मे १६७८ रोजी शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेतून स्वराज्यात मध्ये दाखल झाले जेधे शकावली नुसार :- शके १६०० जेष्ठ मासी राजे गदक प्रांत काबीज करून रायगडास आले. शिवाजी महाराज स्वराज्यात आल्यावर मंत्र्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध तक्रारी केल्या . संभाजी महाराज आमची हेटाळणी करतात. रयतेस करात सुट दिल्याने स्वराज्यातील उत्पनात घट निर्माण झाली. संभाजी राजांची मोगलांशी मैत्री झाली आहे. संभाजी राजांविरुद्ध मंत्रांच्या तक्रारी ऐकून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांस आदेश दिला कि मंत्र्यांचा अपमान करत करवसुलीस मनाई केली तरी त्वरित सज्जनगडावर जावे. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची यादरम्यान भेट झाली नाही.
संभाजी महाराज आज्ञेप्रमाणे सज्जनगडावर दाखल झाले. रामदास स्वामी व संभाजी महाराज यांची सज्जनगडावर भेट झाली नाही . संभाजी महाराजांनी सज्जनगडाच्या किल्लेदारास बोलवून संगममाहुली तीर्थक्षेत्री स्नानास जाण्याची इच्छा व्यक्त केली . त्यानुसार काही निवडक सैन्य घेऊन ते तीर्थक्षेत्री आले स्नान केले , दानधर्म केला. त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या सैन्यास जिवंत राहण्याची इच्छा असल्यास परत माघारी जाण्यास सांगितले . व निरोप दिला कि ते दिल्लेश्वराकडे जात आहेत आत परत येतील ते सह्याद्री जिंकण्यासाठी. संभाजी महाराज व दिलेरखान यात करार झाल्याप्रमाणे संभाजीराजे दिलेरखानाच्या सैन्यात सामील झाले.
  • संभाजीराजे दिलेरखान भेट
१३ डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले यासंबंधीच्या काही नोंदी आपणास आढळून येतात
सभासद बखरीनुसार “ संभाजीराजे राजीयांचे पुत्र जेष्ठ राजीयावर रुसून मोगलाईत गेले. ते जाऊन दिलेरखानास भेटले.
सुरतकर इंग्रज लिहितात शिवकालीन पत्रसार २०९२ “ त्याची ( शिवाजी ) मन:शांती अधिक ढळविणारी जी गोष्ट घडली , ती त्याचा जेष्ठ पुत्र ( संभाजी ) त्याच्यावर नाखूष होऊन बादशाही सरदार दिलेरखान याच्याकडे पळून गेला.
जेधे शकावलीनुसार “ शके १६०० पौष शुध १० संभाजीराजे पारखे होऊन परळी गडावरून पळोन मोगलाईत दिलेरखानापाशी गेले. त्यांणी त्यासी सप्त हजारी दिली सन्मान केला.
संभाजीराजे व दिलेरखान भेटीचे वर्णन आपणास बसातीन – उस – सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) यात आढळते “ दिलेरखान संभास सामोरा येण्याकरिता धावत येवून अति सत्काराने व बहुत संमारंभाने संभाची भेट घेऊन आला.यापूर्वी संभाजीस द्यावयाकरिता आलमगीर पातशहाकडून एक हत्ती तीन घोडे व पोषाख तरवार व चोघडा व सातहजारी पद अधिकाराचे आज्ञापत्र आले होते. ते सर्व संभाजीस दिलेरखान यांणी पावते केले.” संभाजी महाराजांच्या येण्याने दिलेरखानास निम्मे दक्षिण फत्ते केल्याचा आनंद झाला.
  • संभाजीराजे दिलेरखान यांच्या स्वराज्यातील मोहिमा
भूपाळगडावर हल्ला :- संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळताच दिलेरखाने भूपाळगडावर हल्ला केला. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ वैशाख शुध्द द्वादशी १६०१ गुरुवारी दिलेरखानाने भूपाळगड घेतला.
९१ कलमी बखरीतील नोंदी नुसार “ तीन हजार पठाण तैनात स्वार करून कुल घेऊन किले भूपाळगड बळे घेतला. कोण्ही भांडले नाहीत. फिरंगोजी नरसाळा हवालदार व विठ्ठल भालेराऊ सबनीस पळाले. वरकड गडकरी सापडले. त्यांचे हात कान घेतले “. चिटणीस बखर व बुसातीन – उस – सलातीन या साधनातून ७०० जणांचे हात तोडले याविषयी माहिती मिळते.
संभाजी महाराजांच्या संस्कृत दानपत्रातील उल्लेखानुसार :- औरंगजेबाच्या घोडळाचा प्रमुख दिलेरखान हा सात हजार घोडदळ आणि वैभव घेऊन भूपाळदुर्ग घेण्यासाठी आला आणि त्याने गुडघे टेकले असता ( संभाजीराजांनसमोर ) ज्याने , शंकराने तिसरा डोळा उघडून त्यातून अग्नी बाहेर टाकावा , त्याप्रमाणे आपला क्रोध प्रगट केला.
सदर दानपत्राचे आधारे भूपाळगडावरून संभाजीराजे आणि दिलेरखान यांच्यात वाद झाला . दिलेरखानाने क्षमायाचना करून संभाजीराजांची नाराजी दूर केली असावी.
अथणी शहर लुट :- अथणी शहराच्या लुटीबाबत इंग्रजांच्या १६ ऑक्टोम्बर १६७९ च्या पत्रात उल्लेख येतो . शिवकालीन पत्रसार संग्रह २ पत्र २१४२ “ काही दिवसापूर्वी दिलेरखान , सर्जेखान व संभाजीराजा यांनी अथनी लुटली . पुढे त्यांनी ते शहर जाळून काही लोक कैदही केले. या शेवटच्या बाबतीत सर्जेखान व संभाजी यांचे मत अनुकूल न्हवते . कैदी सोडावे त्यांचा विचार पडला आणि दिलेरखानाशी मतभेद होऊन त्या दोघांना विजापुरकडे पळून जावे लागले. त्यानंतर संभाजीराजा कोल्हापूरकडे ३०० घोडे व १०० पायदळ घेऊन आला आहे. इकडे येण्यात त्याचा हेतू काय आहे हे कळले नाही परंतु आपल्या बापाने ( शिवाजीने ) बोलविल्यामुळे तो आला आहे. अशी लोकांची समजूत आहे. ”
बसातीन – उस – सलातीन या साधनातील नोंदीनुसार “ दिलेरखान तीकोटयाहून कूच करून होणवाडास व तेलंग या गावांचे वाटेने लुटालुटी व खराबा करीत व गावोगावचे लोक कैद करीत अथणीस गेला. अथनिहून निघून ऐनापुरावर जात होता. तेव्हा वाटेत वर्तमान ऐकिले कि , संभाजी आपले लष्करातून पळून जाऊन विजापुरास निघोन गेला.
  • संभाजीराजे स्वराज्यात दाखल
दिलेरखानाने स्वराज्यात लुट माजवली व रयतेस त्रास दिला त्यामुळे संभाजी महाराज व्यथित झाले . दिलेरखानाशी या बाबत मतभेद होऊन दिलेरखानास सोडून स्वराज्यात आले. संभाजी महाराजांना स्वराज्यात परत आणण्याचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न चालू होते. काही गुप्तहेर संभाजी महाराजांशी गुप्तपणे भेट होते. भीमसेन सक्सेनाच्या नोंदीनुसार “ एका संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या माणसांनी संभाजी महाराजाना युक्तीने बाहेर काढले.संभाजी महाराज दहा स्वरानिशी निघुन गेले.
जेधे शाकावलीतील नोंदीनुसार “ मार्गशीर्ष मासी शके १६०१ संभाजीराजे मोगलाईतून पळोन पनालीयासी आले. “
  • संभाजीराजे व त्यांच्या पत्नी
औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबरीतील नोंद , मुगल इतिहासकार भीमसेन सक्सेना , ९१ कलमी बखर , बसातीन – उस – सलातीन , चिटणीस बखर याच्या नोंदीनुसार संभाजीराजे दिलेरखानाच्या भेटीस गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी दुर्गाबाई व एक बहिण व काही स्वार बरोबर घेतले होते. संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्यावेळी ते त्यांच्या पत्नीसह स्वराज्यात आल्याचे संदर्भ आढळतात . तसेच पत्नी दुर्गाबाई व एक बहिण दिलेरखानाच्या कैदेत असल्याचे उल्लेख आढळतात .
स्वराज्यात परत आल्याच्या नोंदी
९१ कलमी बखरीतील नोंद :- त्या उपर संभाजीराजे भेटले हे वर्तमान पतशाहास टाक ( डाके ) दाखल झाले. दिलेरखानानेही लिहून पाठवले होते . त्यावरून हुजुरची तलब आबादी आले. जे संभाजीराजे त्याबराबर फौज देवून बळकटीने हुजूर पाठवणे . हे तलब येताच संभाजीराजे यांजबरोबर फौज देवून रातोरात स्त्रीसह वर्तमान पळविले.
चिटणीस बखरीतील नोंद :- संभाजीराजे अनुताप होऊन स्त्रीसहवर्तमान युक्तीने निघोन आले.
बसातीन – उस – सलातीन :- संभाजीचा बाप शिवाजी यांनी संभाजीस नानाप्रकारे दिलभरवसा देवून आपले कडील पूर्ण विश्वासू लोकास संभाजीकडे पाठवले आणि संभाजीस हरएक प्रकारे समजूत करून चित्तसमाधान करून आपल्याकडे आणविले उभयता बापलेकांमध्ये वाकडेपणा आला होता त्यामुळे उभयतांचे सख्य होत न्हवते तो वाकडेपणा बापाचे कळवळ्याने व मित्रतेने दूर जाहला. शिवाजीने आपले पुत्राचे मन आपल्याकडे मिळवून घेतले. तेव्हा संभाजी यांनी फुरसतीची वेळ पाहून आपले स्त्रीस पुरुषाचा पोषाख पांघरून शुराचा वेष देवून पाच स्वारानिशी आपले स्त्रीसुद्धा दिलेरखानाचे लष्करातून पळाला.
दिलेरखानाच्या कैदेत असल्याच्या नोंदी :-
औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबरीतील नोंद २७ नोहेंबर १६८१ : - सीवाचा मुलगा संभा याची एक बायको व बहिण यांना पूर्वी दिलेरखानाने कैद केले होते त्यांना या किल्यात ( अहमदनगर ) ठेवले आहे. म्हणून शत्रूचे लोक ह्या किल्याभोवती आले. त्यांचा त्यांना किल्यातून बाहेर काढण्याचा विचार आहे .
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ यादव घराण्यातील पत्रातील नोंदीनुसार संभाजीराजे व गिरजोजी यादव यांनी दुर्गाबाई यांना सोडवण्याचे प्रयत्न केले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र १४३ गिरजोजी यादव यांना मिळालेली सनद ) :- मातोश्री दुर्गाबाईसाहेब ताम्राचे निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे तेव्हा प्ररामार्श करावयास संभाजीराजे काका यांणी तुम्हास पाठवले . तेथे तुम्ही जावून जीवाभ्य श्रम करून संकट प्रसंगात त्यांची भेटी घेऊन येऊन वर्तमान श्रुत केले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३२२ निवाडापत्र ) :- गिरजोजी यादव हे मातोश्री दुर्गाबाईसाहेब राजेश्री संभाजी राजे छत्रपती यांची राणी दौलताबादेस तांब्राचे निर्बंधी होती . तिथे धन्याच्या आज्ञेप्रमाणे जाऊन परमसंकटे त्याची भेटी घेऊन त्यास काढून आणावयाचा येत्न योजून येऊन वर्तमान धन्यास सांगितले.
ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३६१ ) :- “ त्या उपरी मातोश्री दुर्गाबाई साहेब ताम्राचे निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे. त्यांचा परामर्श करावयास राजश्री संभाजीराजे यांनी आपणास पाठविले. तेथे संकट प्रसंगात जाऊन त्यांची भेटी घेऊन आलो. ते समयी राजश्री संभाजीराजे व कवी कलश समागमे असता आपण येऊन दुर्गाबाई यांचे वर्तमान सांगितले. “
वरील सर्व साधनाचा विचार करता अस्सल पत्रांच्या आधारे दिलेरखानाच्या कैदेत संभाजीराजांच्या पत्नी दुर्गाबाई व एक बहिण कैदेत होत्या.
  • छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे भेट
सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हे वर्तमान राजीयास ( शिवाजी महाराज ) पुरंधरास कळताच संतोष पावून पुत्राच्या भेटीस पन्हाळ्यास आले. मग पितापुत्राची भेट झाली. बहुत रहस्य जाहले. त्या उपरी राजे म्हणू लागले कि लेकरा मला सोडून जाऊ नको. औरंगजेबाचा आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाले. आता तू जेष्ठ पुत्र थोर झालास आणि सचंतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणास कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुजलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण एक तू संभाजी व दुसरा राजाराम. येसियास हे सर्व राज्य आहे., यास दोन विभाग करतो एक चांदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद कावेरी हे ऐक राज्य आहे. दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत एक राज्य आहे. ऐसी दोन राज्य आहेत. त्यास तू वडील पुत्र , तुजला कर्नाटकीचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र दोन राज्य करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थ करीत बसतो . असे बोलिले तेव्हा संभाजी राजे बोलिले कि “ आपणास साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दुधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन ”. असे उत्तर दिधले. आणि राजे संतुष्ट झाले.
शिवकालीन पत्रसार संग्रह २ पत्र २२३६ शिवाजी महाराज व्यंकोजीराजे यांना लिहिलेल्या पत्रात लिहितात “ चिरंजीव राजश्री मोगलाईत गेले होते. त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला . त्याशी कळो आले कि ये पातशाही अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानरूप चालणार नाही . ऐसे जाणोन त्यांनी आमचे लिहिण्यावरून`स्वार होऊन आले. त्याची आमची भेट झाली. घरोब्याच्या रीतीने जैसे समाधान करून ये तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणोन लिहिले असे . कळले असावे.”
श्री. नागेश सावंत.
संदर्भ :- जेधे शकावली , परमानंदकाव्यम , शिवकालीन पत्रसार संग्रह २ , सभासद बखर , चिटणीस बखर, ९१ कलमी बखर , ताराबाई कालीन कागदपत्रे खंड १ , ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या दरबाराचे अखत्यार , बसातीन – उस – सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) , संभाजी महाराजांची पत्रे
छायाचित्र साभार बाबासाहेब पुरंदरे राजा शिवछत्रपती

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...