विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

कंठा , अकबर आणि संभाजी महाराज

 


कंठा , अकबर आणि संभाजी महाराज

लेखन :श्री नागेश सावंत

छत्रपती संभाजी महाराजांनी बंडखोर अकबरास स्वराज्यात आश्रय दिला . अकबराच्या सुरक्षिततेसाठी सैन्याची व्यवस्था केली. छत्रपती संभाजी महाराजांनी मैत्रीची भेट म्हणून अकबरास कंठा व हत्ती भेट दिला. परंतु अकबराने हि भेट एका वेश्येस दिली. संभाजी महाराजांना हि घटना कळताच त्यांनी अकबरास ह्या बाबत जाब विचारला . परंतु गर्विष्ठ अकबराने आम्ही शह्जादे आहोत आमच्या मर्जीने वागू असे प्रतुत्तर दिले. सदर घटनेमुळे संभाजी महाराज रागावले व त्यांनी अकबरास दिलेली सुरक्षा काढून घेतली . अकबरास हा त्याचा अपमान वाटला व त्याने रागाने स्वतःचा तंबू जाळून टाकला व गोव्यास पोर्तुगीज्यांच्या आश्रयास निघाला . संभाजी महाराजांना ह्याबाबत कळताच त्यांनी पोर्तुगीजांना तंबी दिली त्यामुळे अकबरास पौर्तुगीजांचा आश्रय न मिळाल्याने मान खाली घालून संभाजी महाराजांच्या आश्रयास परतावे लागले.
सदर घटनेची माहिती आपणास १७ फेब्रुवारी १६८३ च्या अखबारात आढळते ती पुढीलप्रमाणे
शेख अब्दुल्लाह वलद शेख निजाम याने अर्ज केला तों असा :- अंतुरचा ठाणेदार अहमदखान याने लिहिले आहे की, कृष्णा पंडिताने बातमी आणली की, अकबर बंडखोराने आपल्या अधिकारात नवीन २००० स्वार व २००० पायदळ चाकरीत ठेवले होते. त्यांचा पगार संभा देत असे. संभाने एक पोवळ्याची माळ व एक हत्ती बंडखोरास भेट म्हणून दिला होता. परंतु बंडखोराने एका वेश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेविले व तिला माळ वैगरे भेट म्हणून आलेले जिन्नस बक्षीस दिले. हि बातमी संभास समजली तेव्हा त्याने बंडखोरास निरोप पाठविला की ‘ मी माळ वैगरे तुझ्यासाठी भेट दिली होती’. बंडखोराने उत्तर पाठविले की, आम्ही बादशाहझादे आहो. मनास येईल ते करू. नंतर संभाने निरोप पाठविला की “ तुझ्याकडील जमेत मजकडे पाठवावी .” त्यामुळे बंडखोर लाचार झाला. त्याने डेरा जाळून टाकला व तो फकीर बनून , फिरांगांच्या मुलखातील गोव्याकडे निघाला होता. यावर संभाने फिरंग्याना लिहिले कि, “ बंडखोरास जाऊ देवू नये “ तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे बंडखोर परत येऊन संभाच्या मुलखात पूर्वी रहात होता तेथे रहात आहे. हे ऐकून बादशाह गप्प झाला.
ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ ( औरंजेबाच्या दरबाराचे अखबार )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...