विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही का बुडवली ?

 


औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही का बुडवली ?

सांभार ::श्री नागेश सावंत

छत्रपतींचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब अफाट सैन्य, दारुगोळा , तोफा व प्रचंड खजिना घेऊन १६८२ रोजी दक्षिणेत आला परंतु मराठ्यांच्या गनिमीकावा आणि गडांच्या अभेद्यतेमुळे औरंगजेबाचा स्वराज्य नामशेष करण्याचा मनसुबा धुळीस मिळाला. मराठा साम्राज्य बुडवणे शक्य नसल्याचे लक्षात येताच औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडे आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाहीकडे वळवला. औरंगजेब हा स्वतः मुसलमान बादशहा होता तसेच विजापूर आणि गोवळकोंड्याचे बादशहा देखील मुसलमान होते. असे असताना देखील औरंगजेबाने दोन्ही मुसलमानीशाह्या का बुडवल्या ?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपणास १६८४ व १६८५ मधील काश्मीर व गुजरात या दोन ठिकाणी झालेल्या शिया व सुन्नी मुसलमान तसेच खोजापंथीय व सुन्नी मुसलमान यांच्यात झालेल्या दंगलीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
  • काश्मीरमधील शिया मुस्लीम व सुन्नी मुस्लीम दंगल
काश्मीरमधील शिया मुस्लीम अबदुस शकूर व सुन्नी मुस्लीम सादिक यांच्यातील वैय्यत्तिक भांडण विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर शिया मुस्लीम व सुन्नी मुस्लीम अश्या जातीय दंगलीत झाले. अबदुस शकूरने मुस्लीम खलिफांनबद्दल अपशब्द वापरले त्याची तक्रार सादिक याने सुन्नी पंथीय काझी महमद युसुफ याच्याकडे केली . मोगल सुभेदार शिया पंथीय इब्राहीम खान याने अबदुस शकूर याची बाजू घेतली. त्यामुळे काझी महमद युसुफ याने सुन्नी पंथीय मुसलमानांना चिथावणी देऊन शिया मुस्लिमांच्या वस्तीत जाळपोळ घडवून आणली. शिया मुस्लिमांच्या मदितीसाठी मोगल सुभेदाराचा मुलगा फिदाईखान याने यात हस्तक्षेप केला . या दंगलीत अनेक शिया व सुन्नी मुस्लीम ठार व जायबंदी झाले. सुन्नी मुसलमानांच्या आक्रमतेमुळे मोगल सुभेदारास अबदुस शकूर यास काझी महमद युसुफ याच्याकडे शिक्षेसाठी सुपूर्त करावे लागले. मुस्लीम धर्मशास्त्राप्रमाणे त्यास दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात येऊन त्याची अंमल बजावणी करण्यात आली . सुन्नी पंथीय जमावाने आणखीन आक्रमक होऊन शिया पंथीय धर्मगुरूस ठार मारले. सदर घटनेमुळे हि दंगल आणखीनच चिघळली . मोगल सुभेदाराच्या मुलाने सुन्नी पंथीय दंगलखोर मुस्लिमांची कत्तल केली. सुन्नी धर्मगुरूच्या चिथावणीने सुन्नी पंथीय मुस्लीम जमावाने मोगल सुभेदार इब्राहीम खान याचा वाडा जाळून टाकला. मोगल सुभेदार इब्राहीम खान याने सुन्नी धर्मगुरू व काझी तसेच इतर सुन्नी जमावातील लोकांना पकडून तुरुंगात टाकले. यामुळे दंगल आटोक्यात आली पण सुन्नी पंथीय मुसलमानांनी सुन्नी पंथीय मोगल बादशाह औरंगजेब याच्याकडे तक्रार केली . औरंगजेबाने मोगल सुभेदार शिया पंथीय मोगल सुभेदार इब्राहीम खान याची सुभेदार पदावरून हकालपट्टी केली . कैदेतील सर्व सुन्नी पंथीय लोकांची सुटका करण्यात आली.
  • गुजरातमधील खोजा पंथीय मुस्लीम व सुन्नी मुस्लीम दंगल
गुजरातमधील खोजापंथीय मुस्लीम मुर्तीपुजेप्रमाणे धर्मगुरूची पूजा करत असत व त्याच्या चरणी नजराणे अर्पण करत असत. सुन्नी पंथीय मोगल बादशाह औरंगजेब याच्या आदेशाने खोजा धर्मगुरू सय्यद शाह यास अटक करून औरंजेबाकडे आणत असताना खोजा धर्मगुरू सय्यद शाह याने विषपान करून जीव दिला. त्यामुळे धर्मगुरूच्या मुलास अटक करून औरंजेबाकडे आणण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या खोजापंथीय मुस्लीम जमावाने भरुच शहरावर हल्ला करून तेथील फौजदारास ठार करून शहर आपल्या ताब्यात घेतले . सदर घटनेची माहिती गुजरातच्या मोगल सुभेदारास मिळताच त्याने भरूच शहरावर हल्ला केला त्यामुळे खोजापंथीय मुस्लीम जमावास भरुचच्या किल्याच्या आश्रयास जावे लागले व थेथून त्यांनी आपला लढा चालू ठेवला. काही दिवसांनी गुजरातच्या मोगल सुभेदाराने भरूच किल्ला जिंकला व किल्यातील सर्व खोजापंथीय मुस्लीमांची कत्तल केली.
  • सेतूमाधवराव पगडी लिहितात :- “ औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेची झळ हिंदूंना तर लागलीच पण त्याचबरोबर सुन्नी पंथीय नसलेले शिया मुसलमान , गुजरातेतील काही मुस्लीम पंथ , सुफी साधू आणि सत्पुरुष हेही त्याच्या तावडीतून सुटले नाही. “
म्हणजे सुन्नी मुस्लीम व्यतिरिक्त अन्य व्यक्ती हि सुन्नी पंथीय औरंगजेबासाठी काफर होती .
  • विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही बुडवली
मोगल न्यायाधीश शेख उल इस्लाम याने विजापूर व गोवळकोंडा शियापंथीय मुसलमानीशाही खालसा करू नये असा सल्ला औरंगजेबास दिला परंतु औरंगजेबाने त्याचा सल्ला नाकारल्याने त्याने न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला . मोगल न्यायाधीश म्हणून काझी अब्दुल्ला याने देखील मुसलमानीशाही राज्य खालसा करू नये असा सल्ला औरंगजेबास दिला परंतु त्याच्या सल्याकडेदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
विजापूरला मोगली सैन्याचा वेढा पडला त्यावेळी विजापूरच्या मुस्लीम धर्मगुरुंचे एक शिष्टमंडळ औरंगजेबाची भेट घेण्यासाठी त्याच्या छावणीत आले. धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाने औरंगजेबास निवेदन दिले “ तुम्ही सनातनी मुसलमान आहात . कुराणातील कायदा तुम्हाला पूर्णपणे अवगत आहे. धर्मगुरूंच्या अनुमतीशिवाय आणि कुराणाची संमती घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनात एकही पाऊल उचलत नाही. अशा परीस्थीतीत तुमच्याच मुसलमान बांधवानविरुद्ध तुम्ही हे जे अपवित्र युद्ध चालवले आहे त्याचे समर्थन कसे काय करता ते आम्हास सांगा. “
औरंगजेबाने या शिष्टमंडळास उत्तर दिले “ तुम्ही सांगता त्यातील एकही शब्द खोटा नाही. मला तुमच्या प्रदेशाची अभिलाषा नाही परंतु अत्यंत घातकी असा काफिर ( शिवाजी ) त्याचा काफिर मुलगा ( संभाजी ) हा तुमच्या शेजारी राहतो आणि त्याला तुम्ही आश्रय दिला आहे, तो येथल्या मुसलमानांपासून दिल्लीच्या मुसलमानांपर्यंत सर्वांनाच त्रास देत आहे आणि त्यांच्या तक्रारी मला रात्रदिवस पोहचत आहेत . तेंव्हा त्याला तुम्ही माझ्या स्वाधीन करा म्हणजे तुमचा वेढा मी ताबडतोब उठवतो . “
विजापूरच्या आदिलशाहीच्या पाडावानंतर औरंगजेबाने आपला रोख गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे वळवला. मोगल सैन्यातील शिया सैनिकांना हे शेवटचे शिया पंथीय मुस्लीम राज्य बुडू नये असे वाटत होते. त्यामुळे शियापंथीयांचा विरोध होता . आलमगीर औरंगजेब गोवळकोंड्याच्या दरबारातील आपल्या मुगल वकिलास लिहितो “ ह्या कमनशिबी माणसाने ( अबुल कुतुबशहा ) आपल्या राज्यातील सर्वोच्च सत्तापद एका काफिराकडे ( हिंदू ब्राम्हण मादण्णा आणि आकण्णा ) सोपवली . कुतुबशाहाच्या या निर्णयामुळे सय्यद , शेख , काझी यांना त्याच्या आज्ञेत राहावे लागत असे . कुतुबशाहाने त्याच्या राज्यात दारूचे गुत्ते , वेश्याव्यवसाय , जुगाराचे अड्डे अशा सर्व प्रकारच्या इस्लामविरोधी पापाचरणाला राजरोसपणे उत्तेजन देऊन स्वतःसुद्धा या पापचरणाचा उपभोग घेत त्यात मग्न असतो . इस्लाम, न्याय आणि पाखंडीपणा यातील फरक देखील त्याला ओळखता येत नाही. इस्लाम व अल्लाने दिलेली धर्माज्ञा व नीषेधाज्ञा याचे पालन न करता काफिर संभाजीला १ लाख होनांची मदत करून त्याने अल्ला व प्रजा यांचा तीरस्कार व अवकृपा संपादन केली आहे.”
अफझलखान १६५९ साली स्वराज्यावर चालून आला त्यावेळची आदिलशाहीची लष्करी ताकद व १६८६ मधील आदिलशाही बुडाली त्यावेळची आदिलशाही यात फरक होता. विजापूरच्या गादीवरील सिकंदर आदिलशाह अठरा वर्षांचा अनअनुभवी सुलतान होता तसेच अंतर्गत बंडखोरीमुळे आदिलशाही मोडकळीस आली होती . गोवळकोंड्याचा सुलतान अबुल हसन हा विलासी व चैनीचे जीवन जगण्यात मग्न होता. औरंगजेब दक्षिणेत आल्यापासून मराठ्यांशी युद्ध करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत होता परंतु रामसेजसारखा किल्ला देखील त्यास जिंकता येत न्हवता. त्यामुळे खचलेल्या मोगल सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आदिलशाही व कुतुबशाही जिंकून आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्याचे व आदिलशाही व कुतुबशाही पडल्याने मराठा सैन्याचे मनोबल खच्ची करून मराठा सैन्यावर मानसिक दबाव निर्माण करायचा असा औरंगजेबाचा हेतू होता . त्यानुसार सुन्नीपंथीय औरंगजेबाने कुराण व इस्लामचा आधार घेत दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची शियापंथीय कुतुबशाही बुडवली .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- औरंगजेबाचा संक्षीप्त इतिहास :- डॉ . जदुनाथ सरकार
औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका :- रवींद्र गोडबोले
छायाचित्र :- साभार गुगल

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...