विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपतींची दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा

 

छत्रपतींची दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा
 लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

  • छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांची दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा होती. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येताना शिवाजी महाराज बंकापुर येथे आले व इथे शिवाजी महाराजानी देवीजवळ प्रतिज्ञा केली “ दिल्लीवर स्वारी करून औरंगजेबाला कोंडून टाकेपर्यंत तलवार म्यान करणार नाही. “
त्यासंबंधीची एक नोंद आपणास मुंबईकर इंग्रजांच्या १६ जानेवारी १६७८ च्या पत्रात येते “ बंका व पूर घेतल्यावर त्यांच्या नजीकच असलेली दक्खनच्या राजाची राजधानी विजापूर ह्या किल्यावर तो स्वारी करणार आहे. तो घेतल्यावर मग थेट दिल्लीवर चाल करून जाऊन औरंगजेबाला तेथे कोंडून टाकीपर्यंत तलवार म्यान्यात न घालण्याची त्याने देवीजवळ प्रतिज्ञा केली आहे असे म्हणतात.”
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज पालथे जन्मास आले त्यावेळी शिवाजी महाराजानी “ राजाराम महाराज दिल्लीची पातशाही पालथी घालतील असे उदगार काढले.
समकालीन व विश्वासनिय सभासद बखरीत याविषयीची नोंद येते “ मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती. तीस पुत्र जाहला . तो पालथा उपजला. राजीयास वर्तमान सांगितले. राजे म्हणू लागले की “ दिल्लीची पातशाही पालथी घालील “ असे बोलिले
वरील इंग्रजी पत्रातील व सभासद बखरीतील नोंद हि आपणास शिवाजी महाराजांच्या मनात दिल्ली जिंकण्याची सुप्त इच्छा महत्वकांक्षा होती असे दर्शवितात.
  • छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांचा पुत्र रामसिंग याला पत्र पाठवले त्यात ते लिहितात “ त्या यवनधीपतीला ( औरंगजेबाला ) पकडून कारागृहात बंधिस्त केले पाहिजे. देवालयांची पुनस्थापना करून स्वधर्म रक्षून त्याप्रमाणे आचरण करावे असा आमचा हेतू आहे.
मिर्झाराजांनी या दुष्ट यवनाला ( औरंगजेबाला ) दिल्लीचा बादशहा केला. हे हिंदुस्थानचे सम्राटपद आहे. ते मुसलमानांच्या ताब्यात गेल्याने त्यांचे वर्चस्व वाढेल. त्यामुळे तुम्ही व आम्ही मिळून अकबराला बादशहा करावे. त्याजोगे स्वधर्म रक्षण होईल.
वरील पत्रातील आशयावरून संभाजी महाराज औरंगजेबाला यवनधीपती संबोधून त्यास तुरुंगात डांबण्याचे महत्वाकांक्षा बाळगून होते. दिल्लीचे सिंहासन हे हिंदूंचे असून परकीय आक्रमक मुसलमानांच्या ताब्यात गेल्याने धर्माची हानी होत आहे. त्यामुळे औरंगजेबाला दिल्लीच्या सिंहासनावरून पद्द्च्युत करण्याची तगमग छत्रपती संभाजी महाराजांची दिसून येते.
  • छत्रपती राजाराम महाराज
छत्रपती राजाराम महाराज यांनी सरदार हणमंतराव घोरपडे याला ४ जून १६९१ रोजी सनद दिली. हणमंतराव घोरपडे याला ५ लाख आणि कृष्णराव घोरपडे याला १ लाख असा ६ लाखांचा सरंजाम मंजूर केला. परंतु सरंजाम देताना काही प्रांत हस्तगत करण्याची जबादारी देखील दिली व त्यानुसार सरंजाम ठरवून दिला. शिवचरित्र साहित्य खंड ५ मधील सनद पुढीलप्रमाणे
हणमंतराव घोरपडे ६,००,००० सरंजाम
६२,५०० रायगड प्रांत हस्तगत केल्यावर
६२,५०० विजापूर प्रांत हस्तगत केल्यावर
६२,५०० भागानगर प्रांत हस्तगत केल्यावर
६२,५०० औरंगाबाद प्रांत हस्तगत केल्यावर
२,५०,००० दिल्ली प्रांत हस्तगत केल्यावर
एकूण ६,००,००० लाखांचा सरंजाम
कृष्णराव घोरपडे १, ००,००० लाखांचा सरंजाम
१२,५०० रायगड प्रांत हस्तगत केल्यावर
१२,५०० विजापूर प्रांत हस्तगत केल्यावर
१२,५०० भागानगर प्रांत हस्तगत केल्यावर
१२,५०० औरंगाबाद प्रांत हस्तगत केल्यावर
५०,००० दिल्ली प्रांत हस्तगत केल्यावर
एकूण १,००,००० लाखांचा सरंजाम
हणमंतराव घोरपडे याला २,५०,००० चा सरंजाम हा दिल्ली प्रांत हस्तगत केल्यावर तसेच कृष्णराव घोरपडे याला ५०,००० चा सरंजाम हा दिल्ली प्रांत हस्तगत केल्यावर मिळणार होता.
छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या सनदेवरून आपणास त्यांच्या मनातील दिल्ली जिंकण्याची सुप्त इच्छा दिसून येते.
  • मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाई यांनी देवी भद्रकालीचे रूप धारण करून मुगल साम्राज्याशी अविरत संघर्ष चालू ठेवला. महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमापुढे दिल्लीचे तख्त देखील हतबल झाले. शिवभारत व अनुपुराण यांचे लेखनकर्ते कवींद्र परमानंद यांचे पुत्र समकालीन कवी देवदत्त महाराणी ताराबाई यांना देवी भद्रकालीची उपमा दिली.
दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली । ।
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली ते विभंते | कुराणेही खंडली ||
निरंतर चाल केली | पातशाही तळा नेली |
दिल्लीचीही लज्जा गेली | म्लेंच्छ गवन गळला ||
रामराणी भद्रकाली ।रणरंगी क्रुद्ध झाली ।
प्रलयाची वेळ आली । मुगल हो सांभाळा । ।
महाराणी ताराबाई यांनीदेखील विषम परीस्थीतीत दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा मराठी सैन्यात जागृत ठेवली.
  • छत्रपती थोरले शाहू महाराज
छत्रपती थोरले शाहू महाराज हे औरंगजेबाच्या मृत्युनंतर स्वराज्यात दाखल झाले. परंतु दिल्ली जिंकण्याच्या ध्येयाचा त्यांना विसर पडलेला दिसतो. मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर स्वतःच्या वडिलांची निर्घुण हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले.
मोगल इतिहासकार काफिखान लिहितो “ शाहू प्रथम अहमदनगरला गेला . काहींचे म्हणणे असे आहे की औरंगजेब ज्या ठिकाणी मृत्यू पावला त्या स्थळी दर्शन घेऊन फाकीराना भोजन व दानधर्म केला. यानंतर २० हजार फौजेसह दौलतबाद जवळील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. तसेच इतर थोर अवलियांच्या कबरीचे दर्शन घेतले.नंतर तो आपल्या देशाकडे रवाना झाला.
चिटणीस बखरीतील नोंदीनुसार “ औरंगजेबाची मुलगी शाहूस आपला पुत्र मानीत असे. तिने शाहूस निरोप देताना काही सूचना शाहू महाराजांस केल्या. “ पादशहाशी वाकडे चालू नये. सनदा वैगरे देतील ते घ्यावेत . तुम्ही पादशहाचे ( औरंगजेबाचे ) नातूच आहात . तिने आपल्या नित्य पूजेत असणारे पंजे ( हज्रतअलीचा हात ) दिला. यांची भक्ती पूजा निष्ठेने राखावी
मोगली साम्राज्यावर आक्रमण झाल्यास त्याचे संरक्षण मराठ्यांनी करावे असे वचन छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबास दिले होते त्याविषयी ते थोरले बाजीरावांना लिहितात “ राजश्री स्वामींचे वचन पूर्वी औरंगजेब पातशहा होते त्यांसी गुंतले आहे की तुम्हावर कोणी परचक्र आले तर आपण तुमची कुमक ( मदत ) करावी. सर्वस्वे जेथोपावेतो होईल तोपर्यंत साहित्य करावे. विदित जाले पाहिजे . सेवेसी श्रुत होये हे विद्यापणा. “
पेशव्यांचा सातारा दरबारातील प्रतिनिधी मल्हार तुकदेव पुरंदरे बाजीरावांना ३१ मे १७३९ रोजी पाठविलेल्या बातमीपत्रात लिहितात महाराजांची इच्छा पातशाही बंदोबस्त करून द्यावा हा लौकिक मोठा, दुसरी गोष्ट हजारो चोरपोर खातील आणि पातशाही मोडल्याचा दोष आपल्यावर येईल “ पुढे ते असेही लिहितात. “ राज्यश्री स्वामी पातशाही इच्छित नाहीत, जिर्णोदार केल्यास संतोष मानतील
दिल्ली जिंकण्याचे स्वप्न महत्वाकांक्षा बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यासाठी मुगलांशी अविरत संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजराम महाराज आणि महाराणी ताराबाई .
छत्रपती संभाजी महाराज पत्रात लिहितात “ राजश्री आबासाहेबांचे ( शिवाजी महाराजांचे ) संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य “ परंतु त्यांचे पुत्र थोरले शाहू महाराज मात्र औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन , दिल्लीचे रक्षण करण्याचे वचन औरंगजेबास देतात .
  • मराठेशाहीची एक दुर्दैवी शोकांतिका !
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- सभासद बखर
शिवकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र. २००७
शिवचरित्र साहित्य खंड ५
ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ पत्र क्र. २
पेशवे दफ्तर 30 पत्र २२२
भा.इ.स.म. त्रैमासिक वर्ष ८८
छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे :- सदाशिव शिवदे
मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध :- सेतू माधवराव पगडी
थोरेले शाहू महाराज चरित्र :- चिटणीस बखर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...