विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 February 2023

भातवडीची लढाई

 


भातवडीची लढाई
शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या पराक्रमासाठी भातवडीची लढाई ओळखली जाते. याच लढाईत ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी शरीफजीराजे धारातीर्थी पडले.
..............
मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमत: फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणगोजी नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी उमाबाई उर्फ दीपाबाई मालोजीराजे यांना दिली होती. त्यांना दोन मुले. एक शहाजी व दुसरे शरीफजी.
मालोजीराजेंच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागीरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्तीही निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिकच झालेली होती.
शहाजीराजांच्या आई उमाबाई या एक धाडसी दूरदृष्टी असलेल्या स्त्री होत्या. त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते व वाढलेही होते. बालपणापासून राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कारही झाले होते. त्यामुळे ते फक्त योद्धा नसून, त्यांचे मन साहित्य-संगीत इत्यादी कलांकडेही आकर्षित झाले होते.
मालोजीराजांकडून शूरता, लढवय्येपण, द्रष्टेपण आणि रयतेच्या सुखाला प्राधान्य देण्याचे औदार्य हे गुण त्यांच्यात होते, तर आई उमाबाई राणीसाहेबांकडून धाडस, दूरदृष्टी, आणि गोरगरीब रयतेसाठी ‘करुणा’ हे गुण शहाजीराजांनी आत्मसात केले होते.
युद्धात त्यांची मदत मिळविण्यासाठी निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाही वेळप्रसंगी प्रयत्न करत होती. शहाजीराजे ध्येयधुरंदर व अत्यंत महत्त्वाकांक्षी होते. राजनीती व प्रशासनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. सत्ता ही खऱ्या अर्थाने सत्ताधीशांना नव्हे तर आम रयतेला सुखावणारी असावी हे ब्रीद त्यांनी मालोजीराजेंकडूनच शिकून घेतले होते.
मराठी मातीत स्वराज्यनिर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनी घातला. आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेण्याचा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता. स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती जिजाऊ-शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
भातवडीच्या युद्धामुळे शहाजीराजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण सिद्धीस नेणे अशक्य होते. भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजीराजेच होते. शहाजीराजांनी भातवडीच्या लढाईत फार मोठा पराक्रम गाजवला. अहमदनगरच्या पूर्वेस भातवडीची गढी सुमारे दहा मैलावर डोंगराळ प्रदेशात आहे. गनिमी काव्यासाठी येथे अनुकूल परिस्थिती होती. तेथे मुघल व विजापूरच्या सैन्याचा शहाजीराजांनी पूर्ण पराभव केला. या लढाईत शहाजीराजांनी मोठा पराक्रम केल्यामुळे मलिक अंबरला त्यांचा हेवा वाटू लागला. फक्त शहाजीराजांच्या पराक्रमाच्या दृष्टीने हे युद्ध अत्यंत महत्त्वाचे ठरले. या युद्धानंतर शहाजीराजे हे व्यक्तिमत्त्व राजकीय पटलावर विशेष चमकू लागले.
शहाजीराजे व शरीफजीराजे यांनी या लढाईत विशेष शौर्य दाखवले. आपल्या बाणांनी पडणाऱ्या मुघल सैन्यावर शहाजीराजे तुटून पडले व त्यांनी मुघलांची दाणादाण उडवून दिली. भातवडीच्या युद्धाने निजामशाहीचा बचाव झाला, म्हणून हा प्रसंग, ही लढाई महत्त्वाची मानली जाते. मुघल व विजापुरी फौजांचा जंगी पराभव करून शहाजीराजांनी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांना विजय मिळवून दिला.
निजाम व मलिक अंबरला खूप आनंद झाला. त्यांना कळून चुकले, की राजांच्या शौर्याचा दरारा चारही पातशाहीत विलक्षण वाढला. सर्वांना शहाजीराजांच्या सामर्थ्याचा, शौर्याचा धाक निर्माण झाला.
या युद्धात दुर्दैवाने शहाजीराजे यांचे बंधू शरीफजीराजे ठार झाले. खंडागळे हत्ती प्रकरणांमध्ये मलिक अंबर वजीर व निजाम शहा यांचा हात होता. लखुजीराजे यांचा काटा काढण्यासाठी हे प्रकरणपण निजामशहाने घडवून आणले. लखुजीराजे निजामशाही सोडून थेट शहाजहानला सामील झाले. हे कळताच विजापूरच्या आदिलशहाने जहांगीर बादशहाशी युती करून निजामशाहीवर आक्रमण करण्यासाठी मुघलांच्या सैन्यास मिळून नगरवर आक्रमण केले.
नगरजवळच्या भातवडी या गावी मोगल आदिलशहा यांच्या संयुक्त सैन्यावर मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली निजामशाही सैन्य चालून आले. निजामशहाने गनिमी काव्याचा कुशलतेने वापर करून शत्रुसैन्याची रसद तोडली व अचानक हल्ला करून ह्या बलाढ्य शत्रूंचा दणदणीत पराभव केला. ह्या लढाईत शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम गाजवला.
अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतातील इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे आणि शरीफजीराजे व वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते. त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.
शरीफजींच्या धर्मपत्नी म्हणजे देवगिरीच्या सोमवंशी यादव कुळातील यादवराजांची कन्या व सिद्धराजांच्या भगिनी दुर्गाबाईसाहेब. शरीफजीराजे यांना दोन मुले, एक महादजी आणि एक त्रिंबकजी. त्यांच्या मुलाचं नाव व्यंकटजी. त्यांना अहमदनगर भागातील जहागिरी मिळाली होती. त्यांना सहा मुले संभाजी, माणकोजी (खानवट घराणे) शहाजी, बेळवंडी घराणे शरीफजी, तुकोजी, बाबाजी. आज यातील भोसले वंशज वेगवेगळ्या विभागात राहत आहेत.
शरीफजीराजे यांचे भातवडी येथे स्मारक असून, राशीन येथील प्रसिद्ध देवी मंदिराशेजारी त्यांच्या पत्नीचे व पुत्र त्र्यंबकजी यांची समाधिस्थळे आहेत.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...