विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 February 2023

अहमदनगर जिल्ह्यातील भातवडीच्या लढाईचे एक आगळे वेगळे महत्त्व

 




अहमदनगर जिल्ह्यातील भातवडीच्या लढाईचे एक आगळे वेगळे महत्त्व
लेखन :एकनाथ वाघ
इतिहासाची पाने चाळली तर शहाजीराजे भोसले आणि शरीफजीराजे भोसले यांनी स्वराज्याची पहिली लढाई मलिक अंबर याला मदत करून लढली असे म्हणण्यास पुरेसे संदर्भ आहेत. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भातवडीच्या लढाईचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे, कारण याच लढाईत गनिमी काव्याचा जन्म झाला.
परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीस दख्खनच्या राजकारणात ज्यांनी आपले नाव कोरले ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले होते.
शहाजीराजे भोसले.
वेरुळचे भोसले घराणे पूर्वीपासून प्रसिद्ध होते. मालोजीराजे भोसले या घराण्यातील पराक्रमी सरदार होते. रयतेविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम व जिव्हाळा होता. मालोजीराजांकडे वेरुळची पाटीलकी होती. याच मालोजी राजे व दीपाबाई उर्फ उमाबाई यांना १८ मार्च १५९४ रोजी वेरुळ येथे पुत्रप्राप्ती झाली. तेच शहाजी राजे. ते पाच वर्षांचे असतानाच, वडील मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. वडीलाच्या मृत्युनंतर शहाजी राजांना जहागिरी देण्यात आली. लखोजी राजे जाधव यांची कन्या जिजाई यांच्याशी शहाजी राजांचा विवाह १६१०-११ मध्ये झाला. विवाहनंतर शहाजी राजे जहागिरीचा कारभार स्वत: पाहू लागले. लहान वयातच मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली. निजामशाही दरबारामध्ये त्यांचा दबदबा होता.
शहाजी राजे व जिजाऊंना सहा मुले झाली. त्यापैकी दोनच वाचली. त्यात थोरले संभाजी राजे व धाकटे शिवाजी महाराज होत. जिजाऊ व शिवराय बंगळुरुमध्ये शहाजीराजांबरोबर वास्तव्य करीत असताना शहाजी राजांनी आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनमध्ये शहाजी महाराजांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला. मग तो आदिलशाहीशी असो, निजामशाहीसी असो किंवा मोगलांशी, ते सतत लढत राहिले. शहाजी महाराज एक महत्त्वाकांक्षी मराठा सरदार होते. दुसऱ्यांची चाकरी करण्याचा त्यांचा मानस नव्हता.
मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे असे त्यांना वाटत होते. पण बलाढ्य मोगल असताना व दक्षिणेत आदिलशाही व निजामशाही प्रबळ असताना त्यांनी सुरुवातीला निजामशाहीत राहून आपल्या पराक्रमामुळे तेथे आपला दबदबा निर्माण केला.
निजामशाहीची मोगल व आदिलशाही या दोन सत्तांच्या विरोधात भातवडीमध्ये १६२४मध्ये झालेल्या लढाईत शहाजी राजांनी मोठा पराक्रम केला.
मलिक अंबर
या लढाईचे नेतृत्व ७५ वर्षीय मलिक अंबरने केले असले तरी युद्धामध्ये पराक्रम हा भोसले बंधूंनी केला. याच लढाईत शरीफजीराजे भोसले (शहाजी महाराजाचे धाकटे बंधू) यद्धात ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी मारले गेले. निजामशहाला मोठा विजय मिळाला. बृहदीश्वरी शिलालेखात आलेल्या उल्लेखानुसार भातवडीच्या युद्धानंतर दरबारी रिवाजानुसार मूर्तजाशहाने मलिक अंबरला मोठेपणा दिला, तरी त्याने खास आदरसत्कार आपल्या कर्त्या व आवडत्या शहाजीचा केला. या भातवडीच्या विजयापासून दख्खनच्या राजकारणात शहाजीराजे यांचे महत्त्व वाढले. शहाजीराजांच्या मोठेपणाचा गौरव जयराम पिंडे यांनी 'राधामाधवविलासचंपू' या काव्यात केला आहे.
शहाजीराजांनी निजामशाहीत एकही वयस्क निजामशहा नसताना एका दहा वर्षाच्या मूर्तजा नावाच्या निजाम वंशातील मुलावर छत्र धरुन स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला. शहाजी महाराजांनी चालवलेल्या या मोहिमेचा बंदोबस्त करण्यासाठी मोगल व आदिलशहांनी एकत्र होऊन शहाजी महाराजाच्या विरोधात मोहिम आखली. या दोन्ही सत्तांच्या विरोधात पेमगिरी ते माहुली असा जवळपास चार-पाच वर्षे संघर्ष केला. शहाजी राजे जोपर्यंत लढणे शक्य आहे, तोपर्यंत माहुलीच्या किल्ल्यावर त्यांनी मोगल व आदिलशाही सैन्याशी निकराचा लढा दिला. पण या दोन्ही बलाढय सत्तांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. पराभव झाला असतानादेखील रणदौलाखानाच्या मदतीने त्यांना आदिलशाहीची जहागिरी देण्यात आली. माहुलीच्या युद्धात शहाजी राजे यांचा पराभव झाला असला तरी, एक मराठा सरदार राज्य करु शकतो, तो राजा होऊ शकतो हा बाकीच्या दख्खनमधील सरदारामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शहाजीराजे भोसले यांनी केले. त्यांनी केलेला हा स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्नच होता.
शहाजीराजांना आदिलशहाने 'फर्जद' हा बहुमान दिला. कर्नाटक मोहिमेमध्ये शहाजी राजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. कर्नाटकमधील हिंदू संस्थानिकांचे संपूर्ण उच्चाटन न करता, त्यांच्याकडून खंडणी घेवून व स्वामित्व मान्य करायला लावून शहाजी महाराजांनी आपापल्या मुलखातील त्यांचे अस्तित्व कायम ठेवले. यावरुन शहाजी महाराजांच्या उदार धोरणाची व स्वकीयांच्याबद्दल त्यांना वाटत असलेल्या ममत्त्वाची प्रचीती येते. शहाजी महाराज आदिलशाही राजवटीचे ताबेदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता. शहाजी महाराजांचे आदिलशाहीतील वाढलेले वर्चस्व पाहून त्यांना दोन वेळेस अटकदेखील करण्यात आली. मात्र त्यांच्या दोन्ही मुलांनी (थोरले संभाजी राजे व धाकटे शिवराय) त्यांना सोडविले.
शहाजीराजे अतिशय विद्वान, सुसंकृत, धाडसी, शूर, धोरणी, पराक्रमी, दूरदृष्टी व कल्पक होते. राजनीती व समाजशास्त्रात पारंगत होते. मराठ्यांचे राज्य असावे असे त्यांना वाटत होते. सर्व समाजातील त्यांचे मित्र होते. मलिक अंबर, रणदौलाखान या सिद्दी सरदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. रणदौलाखान तर, त्यांचा मित्रच होता. शहाजी राजे कर्नाटकासारख्या ठिकाणी १५ ते २० हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शहाजीराजांना आपला आधारस्तंभ मानत होती.
शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहिम फत्ते करुन होदिगिरी गावी मुक्कामास आले होते. आदिवासी बांधवांनी त्यांना नरभक्षक वाघांनी माणसे मारल्याची तक्रार दिली. महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असता त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला. घोडा खाली कोसळला. राजांच्या डोक्याला मार लागला. त्यांचे २३ जानेवारी १६६४मध्ये मृत्युमुखी पडले.
स्रोत :

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...